रक्षाबंधन एक अविस्मणीय बालपणीची आठवण..!

रक्षाबंधन… एक अविस्मरणीय बालपणीची आठवण! ❤️

रक्षाबंधन जवळ आले की आजही माझ्या मनात बालपणीच्या त्या सुंदर आठवणी अलगद जाग्या होतात. त्या काळात रक्षाबंधन हा सण म्हणजे आमच्या घरातील एक वेगळाच आनंदाचा दिवस असायचा.
मला चार बहिणी होत्या. त्यापैकी दोन माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. रक्षाबंधन काही दिवसांवर आले की घरामध्ये बहिणींची लगबग सुरू व्हायची. प्रत्येक जण आधीच ठरवायची—भावाला सकाळी कोण आंघोळ घालणार? कोण नवीन कपडे घालणार? आणि भावाला सर्वांत आधी कोण ओवाळणार?
“मी मोठी आहे, त्यामुळे माझा मान पहिला!”
“नाही, मी आधी ओवाळणार!”
अशा गोड भांडणांना सुरुवात व्हायची. प्रत्येक जण आपापली योजना आधीच दुसरीला सांगायची. त्यावेळी घरची परिस्थिती साधी होती; सुखसोयी फारशा नव्हत्या. पण घरातला आनंद मात्र खूप मोठा.      रक्षाबंधनाच्या दिवशी मला सकाळी लवकर उठवले जायचे. बहिणी मोठ्या प्रेमाने मला आंघोळ घालायच्या. नवीन कपडे घालायचे. अंगणात सुंदर रांगोळी काढायची. सणासाठी घर सजायचे.
ताटामध्ये राखी, कुंकू, अक्षता, आरती आणि साखरेचा किंवा गुळाचा खडा ठेवलेला असायचा. माझ्या चारही बहिणी माझ्याभोवती असायच्या. त्या दिवशी मला अक्षरशः राजा झाल्यासारखे वाटायचेमाझ्या बहिणी माझे खूप लाड करायच्या. पण त्यांच्यामध्ये पहिल्यांदा मला ओवाळण्यावरून पुन्हा चर्चा सुरू व्हायची.
“मी मोठी आहे, माझा मान मोठा!”
“मी लहान आहे, मला पहिल्यांदा ओवाळू द्या!”
या चर्चेत बराच वेळ जायचा आणि मी मात्र वैतागून म्हणायचो“लवकर ओवाळा, नाहीतर मी खेळायला निघून जा.                                   माझे हे शब्द ऐकल्यावर शेवटी मोठी बहीण मला पहिल्यांदा ओवाळायची आणि त्यानंतर एकामागून एक सर्व बहिणी मला ओवाळायच्या.
माझ्या हाताला मोठमोठ्या, रंगीबेरंगी राख्या बांधल्या जायच्या. त्या राख्या पाहून मला खूप मजा वाटायची. हातभर राख्या बांधलेल्या पाहताना मन आनंदाने भरून जायचे.
ओवाळणी देण्याची वेळ आली की आणखी एक गंमत व्हायची. बहिणी म्हणायच्या,
“पैसे दे!”मग मी माझ्याकडचे पैसे काढायचो आणि प्रत्येक बहिणीला प्रेमाने ओवाळणी द्यायचो. त्या पैशांची किंमत किती होती, यापेक्षा त्या क्षणातील प्रेमाची किंमत माझ्यासाठी अमूल्य होती.
त्यावेळी रक्षाबंधन या सणाचे खरे महत्त्व मला समजत नव्हते. राखी म्हणजे फक्त हातावर बांधायची एक सुंदर दोरी, एवढेच मला वाटायचे. पण आज आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना जाणवते की, त्या राखीमध्ये बहिणीचे प्रेम, आपुलकी, काळजी, माया आणि भावासाठीच्या शुभेच्छा गुंफलेल्या होत्या.
काळ पुढे गेला…
बालपण मागे राहिले…
घरातील ते दिवसही मागे पडले…
आणि माझ्या चारही बहिणी आपापल्या संसारात निघून गेल्या.
आज रक्षाबंधनाचा दिवस आला की हातावर राखी बांधण्यासाठी माझ्याजवळ माझी बहीण नसते. अंगणात बहिणींची लगबग नसते. “मी आधी ओवाळणार!” म्हणून होणारे ते गोड भांडण नसते. माझ्यासाठी नवीन कपडे काढून ठेवणारे ते प्रेमळ हात नसतात.
पण मनाच्या एका कोपऱ्यात त्या सगळ्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.
कधी कधी मनाला वाटते—
पुन्हा एकदा लहान व्हावे…
पुन्हा तेच बालपण जगावे…
पुन्हा बहिणींचे ते गोड भांडण ऐकावे…
पुन्हा त्यांच्या हातून ओवाळून घ्यावे…
आणि हातभर राख्या बांधून घ्याव्यात!
आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आणि मन नकळत भावूक झाले.
खरंच, भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो; तो नात्यांना जपणारा, भावना जागवणारा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक सुंदर क्षण असतो.
रक्षाबंधन हा तर भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा सण आहे.
आज माझ्या बहिणी माझ्याजवळ नसल्या, तरी त्यांच्या प्रेमाची राखी माझ्या मनगटावर नाही, तर माझ्या हृदयावर कायमची बांधलेली आहे.
त्या बालपणीच्या आठवणी माझ्या आयुष्यातील अमूल्य ठेवा आहेत.
माझ्या सर्व बहिणींना आणि जगभरातील प्रत्येक भाऊ-बहिणीला रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भाऊ-बहिणीचे हे प्रेमाचे नाते असेच अखंड, अतूट आणि सदैव जिवंत राहो, हीच मनापासून प्रार्थना! 🙏❤️
— श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर

Comments