विनम्र अभिवादन!
दिवंगत श्री. ए. एम. स्वामी सरांना विनम्र अभिवादन!
दि फ्रेंड्स असोसिएशन, जतचे माजी सेक्रेटरी, कर्तबगार मार्गदर्शक व संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे दिवंगत श्री. ए. एम. स्वामी सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
दि फ्रेंडस् असोसिएशन, जतच्या स्थापनेपासून संस्थेच्या वाटचालीत श्री ए. एम. स्वामी सर यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजही अनेक संस्था आणि कार्यकर्ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संस्थेची वाटचाल थांबू न देता त्यांनी तिच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले.
जत शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एका मोठ्या शाळा संस्थेचे प्राबल्य असताना त्या काळात निर्माण झालेल्या अलिखित स्पर्धेच्या वातावरणातही स्वामी सर डगमगले नाहीत. जत हायस्कूल, जत ही शाखा उभी करून तिला सक्षमपणे घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. संस्थेच्या विकासासाठी धाडसी निर्णय घेण्याचे धैर्य आणि ते निर्णय अचूकपणे अंमलात आणण्याची त्यांची हातोटी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती.
स्वामी सरांचा निर्णय हा नेहमी अचूक, स्पष्ट आणि धाडसी असायचा. मात्र निर्णय घेताना त्यांनी कधीही माणसांना दुरावले नाही. प्रत्येक व्यक्तीसोबत सलोख्याचे आणि आपुलकीचे नाते कायम ठेवणे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे आणि संस्थेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होती.
संस्थेच्या शाळांच्या इमारती उभारताना त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. बांधकामाच्या कामाची अचूक माहिती, आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन बांधकाम कामगारांपर्यंत स्पष्टपणे पोहोचत असे. त्यामुळे संस्थेच्या उभारणीतील प्रत्येक वीट त्यांच्या नियोजनशील आणि दूरदृष्टीच्या कार्याची साक्ष देत आहे.
शाळा आणि संस्था भविष्यात आणखी मोठी कशी करता येईल, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील आणि संस्थेची वाटचाल अधिक सक्षमपणे कशी सुरू ठेवता येईल, याचा विचार त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत केला. संस्थेच्या प्रगतीची चिंता आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याची त्यांची तळमळ हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी ओळख होती.
आज ते आपल्यात प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. अशा कर्तबगार गुरुवर्यांना मनःपूर्वक मानाचा मुजरा!
त्यांनी दाखवलेल्या मार्गावर, त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवत दि फ्रेंडस् असोसिएशन, जत ही संस्था अधिक सक्षम, भक्कम आणि प्रगत करण्याचे कार्य आपण सर्वांनी एकजुटीने पुढे सुरू ठेवूया. हीच त्यांच्या पवित्र स्मृतींना खरी आदरांजली ठरेल.
दिवंगत श्री. ए. एम. स्वामी सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण व विनम्र अभिवादन!
— नम्र आदरार्थी
श्री. सिद्धू घेजी सर व परिवार
जत.
Comments
Post a Comment