प्रा.अरविंद देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! शोक सभा..



सांगली : येथील श्रीमती पुतळाबेन
शाह शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे कार्यरत असणारे, जिल्हा विस्तार सेवा केंद्राचे सेवानिवृत्त समन्वयक प्रा. अरविंद देशपांडे यांचे २७जुलै रोजी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना शिक्षणशास्त्र महाविद्यालयात, महाविद्यालय, मराठी अध्यापक संघ, सांगली व कलाध्यावक संघ यांच्या वतीने आयोजित शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना मान्यवर म्हणाले, प्राध्यापक अरविंद देशपांडे हे शिक्षण क्षेत्रातले दीपस्तंभ होते. अनेक शिक्षकांना वाचतं, लिहितं व बोलतं करण्याचं काम सरांनी
सदैव केलं. नवोपक्रमासाठी अनेक शिक्षकांना प्रेरित केलं. जिल्हास्तर, राज्यस्तरावरती अनेकांना यामध्ये बक्षीसंही मिळाली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमध्ये तसेच अभ्यासक्रम निवड मंडळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने काम करण्याची संधी अनेक शिक्षकांना सरांच्या प्रेरणेने मिळाली. शिक्षकांसाठी विविध विषयांच्या स्वतंत्र कार्यशाळा, उद्बोधन वर्ग, कृतीसत्रे, शासकीय प्रशिक्षणे,
नवोपक्रम प्रशिक्षणे आदींचे अत्यंत नेटकं आयोजन सर खुबीने करत असत. चतुरस्र अभ्यासक, प्रेमळ, सुसंवादी स्वभावामुळे अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षण संस्था, अधिकारी यांच्याशी त्यांचं आपुलकीचं नातं निर्माण झालं.
या सर्वांमध्ये उत्तम समन्वय साधून, विस्तार सेवा केंद्राचं कार्य 'समन्वयक' या नात्याने अधिक विस्तारण्याचं कार्य सरांनी अखंडपणे
केलं. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यामधून लेखन केलं. काही पुस्तके प्रकाशित झाली. आकाशवाणीवरून काही भाषणं प्रसारित झाली. परंतु २७ जुलै रोजी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला. त्यांच्या रूपाने शिक्षण क्षेत्रामध्ये तळमळीने काम करणारा एक हाडाचा शिक्षक, अभ्यासक, लेखक, समन्वयक हरवल्याची भावना सर्वांच्या मनामध्ये आहे.
या शोकसभेमध्ये प्राचार्य डॉ. सुशील कुमार, विठ्ठल मोहिते, शाहीर पाटील, प्रकाश वायदंडे, श्रीकांत माळी, एल.एम. गडगे, वंदना हुळबत्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रा. संध्या यादव,   सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक,नंदू नार्वेकर, दत्तात्रय खोराटे तसेच शिक्षक, कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

Comments