जीवनात आनंद शोधता आला पाहिजेल!


जीवनात आनंद शोधता आला पाहिजे...! ❤️
✍️ लेखक : श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर, जत हायस्कूल, जत.
कधी कधी आपल्याला वाटतं, आपल्या वाट्यालाच सर्व दुःख आलं आहे. पण आयुष्य शिकवतं की दुःख कायमचं नसतं आणि आनंद विकत मिळत नाही; तो आपल्या मनात असतो.
माझं बालपण गरिबीत गेलं. शाळेत जाताना अंगावर फाटका गणवेश असायचा. पँटवर ठिगळे असायची. पण मन मात्र स्वप्नांनी भरलेलं होतं. प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हायचो, शिक्षकांचं कौतुक मिळायचं आणि त्यातच माझा आनंद दडलेला असायचा.
एक दिवस स्पर्धेत मला बक्षीस मिळालं. पण फाटक्या गणवेशामुळे स्टेजवर जाऊन ते स्वीकारण्याचं धाडस झालं नाही. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी मला बोलावलं. त्यांनी माझ्या पँटवरील ठिगळे पाहिले. काहीही न बोलता प्रेमाने पाठीवर हात ठेवला.
प्रार्थनेनंतर त्यांनी मला सर्वांसमोर स्टेजवर बोलावलं. बक्षीस दिलंच, पण नवीन शाळेचा गणवेशही भेट दिला.
त्या क्षणी मला जाणवलं...
देव कधी कधी एका आनंदाऐवजी दोन आनंद आपल्या पदरात टाकतो.
घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. चार बहिणी, आई-वडिलांचे कष्ट आणि शिक्षणाची ओढ. दिवसा महाविद्यालय, रात्री दैनिक केसरीच्या कला विभागात काम, त्यासोबत पेंटिंगची कामं... झोप कमी, कष्ट जास्त; पण स्वप्नांवरचा विश्वास कधी कमी झाला नाही.
मी दुःखाला शत्रू मानलं नाही. त्यालाच माझा शिक्षक मानलं. प्रत्येक संघर्षाने मला अधिक मजबूत केलं.
आज मागे वळून पाहताना वाटतं...
गरिबीने मला नम्रता दिली. संघर्षाने धैर्य दिलं. शिक्षकांनी आधार दिला. समाजाने सन्मान दिला. आणि आयुष्याने शिकवलं—आनंद हा बाहेर नसतो; तो आपल्या विचारांत, आपल्या कष्टांत आणि आपल्या समाधानात असतो.
म्हणूनच...
जीवनात किती दुःख आहे हे मोजू नका; प्रत्येक दिवसात किती आनंद दडलेला आहे, तो शोधण्याचा प्रयत्न करा.
कारण...
"आनंद शोधावा लागत नाही; तो जगावा लागतो." ❤️🙏

Comments