माझ्या मनातील एक प्रसंग: माझा गणवेश
माझ्या मनातील एक प्रसंग : माझा गणवेश
संघर्ष, स्वाभिमान आणि माणुसकीची जपलेली आठवण
– श्री. सुभाष शिंदे, जत
मी जत हायस्कूल, जत येथे कलाशिक्षक म्हणून सेवेला रुजू झालो, तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. हातात स्वप्ने होती; पण खिशात पैसे नव्हते. राहण्याची, जेवणाची, कपड्यांचीही मोठी चिंता होती.
नोकरीसाठी शाळेत गेलो तेव्हा मी तत्कालीन मुख्याध्यापक डॉ. श्रीपाद जोशी यांना मनातील व्यथा सांगितली.
मी म्हणालो,
"साहेब, मी नोकरी करण्यास तयार आहे; पण माझ्याकडे फक्त ऐंशी रुपये आहेत. पगार सुरू होईपर्यंत मी कुठे राहू? खानावळीसाठी पैसे नाहीत. जतमध्ये माझी तुमच्याशिवाय कोणाशीही ओळख नाही."
माझे बोलणे ऐकून डॉ. जोशी सर खुर्चीवरून उठले. त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले,
"सुभाषराव, काळजी करू नका. मी आहे ना! उद्यापासून सेवेत रुजू व्हा. पगार सुरू होईपर्यंत मी तुम्हाला दरमहा तीनशे रुपये देतो."
त्या क्षणी मला जणू देवच भेटला होता. घरच्यांकडूनही ज्या वेळी मदतीची अपेक्षा नव्हती, त्या वेळी एका मुख्याध्यापकांनी माझा हात धरला. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे स्थान माझ्या मनात गुरूसमान आणि प्रेरणादायी आहे.
मी अध्यापन सुरू केले. दर महिन्याला साहेबांनी ठरल्याप्रमाणे तीनशे रुपये दिले. त्यातील शंभर रुपये मी आई-वडिलांना पाठवत असे. उरलेल्या पैशांत राहणे, जेवण आणि इतर गरजा भागवाव्या लागत होत्या.
त्या काळात माझ्याकडे फक्त दोन गणवेश होते. त्यांपैकी एक फाटला. नवीन गणवेश घ्यायची इच्छा होती; पण आर्थिक परिस्थिती आडवी येत होती.
एकदा गावी जाताना सांगली येथे बसमधून उतरलो. रस्त्याच्या कडेला जुन्या कपड्यांचा बाजार दिसला. माझ्याजवळ असलेल्या पन्नास रुपयांत मी एक जुना गणवेश विकत घेतला आणि तोच घालून शाळेत जाऊ लागलो.
तो सदरा थोडा वेगळ्या प्रकारचा, आधुनिक पद्धतीचा होता.
दोन दिवसांनी मुख्याध्यापकांनी मला बोलावले.
"शिंदे सर, हा गणवेश शाळेसाठी योग्य नाही. तो बदला."
मी काहीच बोललो नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशीही तोच गणवेश घालून गेलो.
यावेळी साहेब थोडे नाराज झाले.
"शाळा सुटल्यानंतर ऑफिसमध्ये भेटा," असे त्यांनी सांगितले.
शाळा सुटल्यानंतर मी ऑफिसबाहेरील बाकावर बसलो होतो. तेव्हा शाळेचे सेवक गुरव मामा माझ्याजवळ आले.
"सर, काय झालं? साहेबांनी का बोलावलं?"
मी हसत म्हणालो,
"काही नाही... फक्त माझ्या गणवेशाचा प्रश्न आहे."
ते म्हणाले,
"सर, नवीन कपडे शिवून घ्या."
त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनात एकच प्रश्न आला—"पैसे कुठून आणू?"
तेवढ्यात ऑफिसमधून बेल वाजली.
"शिंदे सरांना आत पाठवा."
मी आत जाऊन नमस्कार केला.
साहेब म्हणाले,
"बसा."
मी उभाच राहिलो.
ते पुन्हा म्हणाले,
"पहिल्यांदा बसा."
मी बसलो.
ते शांतपणे म्हणाले,
"दोन दिवसांपासून मी तुम्हाला गणवेश बदलायला सांगत आहे. कारण काय आहे?"
यावेळी मात्र मी मन मोकळं केलं.
"साहेब, माझ्याकडे फक्त दोनच गणवेश आहेत. त्यांपैकी एक फाटला आहे. नवीन कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत. तुम्ही राहण्यासाठी आणि जेवणासाठी जी तीनशे रुपयांची मदत करता, त्यातूनच माझा सगळा खर्च भागतो. उरलेल्या पन्नास रुपयांत मी जुन्या बाजारातून हा गणवेश विकत घेतला आहे. म्हणून तोच घालून येतो. पैसे मिळाल्यावर योग्य गणवेश नक्की घेईन."
माझे बोलणे ऐकून डॉ. जोशी सर काही क्षण नि:शब्द झाले.
त्यांच्या डोळ्यांत माणुसकी होती, समजूत होती आणि माझ्या परिस्थितीची जाणीव होती.
ते फक्त एवढेच म्हणाले,
"शिंदे सर, आता घरी जा."
मी त्यांना नमस्कार करून बाहेर पडलो.
आजही "गणवेश" हा शब्द कानावर पडला की हा प्रसंग जिवंत होतो. त्या गणवेशाची किंमत पन्नास रुपये होती; पण त्याने मला आयुष्यभराचा धडा दिला—स्वाभिमानाने जगण्याचा, संघर्षाला सामोरे जाण्याचा आणि माणुसकीची कदर करण्याचा.
जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते; वेळोवेळी आधार देणारी माणसेही तितकीच महत्त्वाची असतात. डॉ. श्रीपाद जोशी यांच्यासारखे आश्रयदाते लाभले नसते, तर कदाचित मला जत हायस्कूल, जत येथे ३५ वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवा करण्याचे भाग्य लाभले नसते.
आज समाजात अशी माणुसकी जपणारी, संकटात हात देणारी माणसे वाढली, तर अनेकांचे जीवन उजळून निघेल. कारण एखाद्या माणसाला दिलेला आधार हा केवळ त्याच्या आयुष्यालाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाही नवी दिशा देऊ शकतो.
– श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक व स्काऊट मास्टर
जत हायस्कूल, जत, जि. सांगली
Comments
Post a Comment