पूज्य साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जत मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन....
जत, प्रतिनिधी : पूज्य साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. सुभाष शिंदे (संघटक, कथामाला, राष्ट्र सेवा दल व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई यांचे सदस्य) यांच्या पुढाकाराने जत शहरात विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. साने गुरुजींचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचावेत आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले.
कलाश्री निवास, विधानगर, जत येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कलाशिक्षक व स्काऊट मास्टर श्री. सुभाष शिंदे यांनी स्वतः साकारलेल्या पूज्य साने गुरुजी यांच्या तैलचित्राचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. कोष्टी सर, श्री. कुलकर्णी सर, श्री. पंडित कांबळे सर, श्री. अमोल जोशी यांच्यासह अनेक साने गुरुजी प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक स्वरात “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” ही प्रार्थना सादर केली. प्रास्ताविक श्री. अमोल जोशी यांनी केले, तर डॉ. श्रीपाद जोशी यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्य, साहित्य, समाजसेवा आणि मानवतावादी विचारांचा प्रेरणादायी आढावा घेतला.
आपल्या मनोगतात श्री. सुभाष शिंदे यांनी साने गुरुजींप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करत कथामाला, राष्ट्र सेवा दल आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांच्या कार्याची माहिती दिली. श्री. कोष्टी सर यांनी तैलचित्राचे कौतुक केले, तर श्री. पंडित कांबळे यांनी कार्यक्रमातून साने गुरुजींबाबत अनेक प्रेरणादायी गोष्टी जाणून घेतल्याचे सांगितले.
याच पुण्यतिथीनिमित्त श्री. सुभाष शिंदे यांनी जत तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या लहान व मोठ्या आवृत्त्यांचे वाटप केले. अल्फान्सो स्कूल, लायन्स स्कूल आणि यश शाळा येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी “खरा तो एकचि धर्म” ही प्रार्थना सादर केल्यानंतर साने गुरुजींच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
ज्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नव्हत्या, त्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनाही ‘श्यामची आई’च्या प्रती भेट देण्यात आल्या. या उपक्रमात श्री. शिंदे यांचे विद्यार्थी ऋतुराज कुलकर्णी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे वाटप करण्यात आलेली सर्व पुस्तके श्री. सुभाष शिंदे यांनी स्वतः खरेदी करून विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात दिली.
या उपक्रमाबाबत बोलताना श्री. शिंदे यांनी सांगितले की, “साने गुरुजींचे प्रेम, समता, संस्कार आणि मानवतेचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.”
पूज्य साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित तैलचित्र अनावरण, विचारप्रबोधन आणि ‘श्यामची आई’ पुस्तक वाटप या उपक्रमांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मनापासून स्वागत व कौतुक केले.
Comments
Post a Comment