माझ्या स्वप्नातील बाल वारकरी दिंडी सोहळा: श्री.सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल, जत.


स्वप्नातील बाल वारकरी दिंडी
 सोहळा
श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर, जत हायस्कूल, जत
रात्रीची वेळ होती. आकाशात चंद्र मंद प्रकाश टाकत होता. वातावरणात विलक्षण शांतता होती. दिवसाचा सारा थकवा संपवून मी विठ्ठलाचे नामस्मरण करत निजलो होतो.
“राम कृष्ण हरी... विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...”
नामस्मरणाच्या त्या पवित्र लयीमध्ये कधी डोळा लागला, हे मलाच कळले नाही.
अचानक स्वप्नात मला कुणीतरी हाक मारल्याचा आवाज आला.
“शिंदे सर... शिंदे सर... उठा लवकर!”
डोळे उघडून पाहतो तर काय! माझ्या शाळेतील एक विद्यार्थी आणि त्याचे काही मित्र समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.
“सर, आज आपल्या जत हायस्कूलमध्ये बाल वारकरी दिंडी सोहळा आयोजित केला आहे. तुम्हाला माहिती नाही का? सगळे तुमची वाट पाहत आहेत!”
क्षणभर माझ्या मनात आनंदाची लहर उसळली. मी घाईघाईने म्हणालो,
“अरे हो! मी तर विसरलोच. थांबा, मी लगेच वेशभूषा करून येतो.”
मी तत्परतेने वारकरी पोशाख परिधान केला. कपाळावर गंध लावला, गळ्यात तुळशीची माळ घातली, हातात टाळ घेतली आणि मनामध्ये विठ्ठलभक्तीचा महासागर घेऊन शाळेकडे निघालो.
पहाटेचे पाच वाजले होते.
मी शाळेच्या पटांगणात पोहोचलो... पण तिथे कोणीच नव्हते!
ना विद्यार्थी... ना शिक्षक... ना पालक...
संपूर्ण पटांगण शांत होते.
क्षणभर मला विचित्र वाटले. पण पुढच्याच क्षणी माझ्या मनाने एक वेगळीच दुनिया उभी केली.
मला वाटू लागले — इथे सारे उपस्थित आहेत!
विद्यार्थी टाळ-मृदुंगाच्या तालावर उभे आहेत... विद्यार्थिनी भगव्या फेट्यात आणि नऊवारी साडीत दिंडी सजवत आहेत... शिक्षक, शिक्षिका आनंदाने अभंग गात आहेत... पालक भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत...
आणि मी...
मी त्या भक्तीमय वातावरणात हरवून गेलो.
मी स्वतःच अभंग म्हणू लागलो —
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...”
टाळांच्या तालावर मी वारकरी ठेका धरला. माझे पाय आपोआप नाचू लागले. विठ्ठलनामाच्या आनंदात मी देहभान विसरलो.
त्या क्षणी मला असे जाणवले की, पटांगणातील झाडे, झुडपे, पानांची सळसळ सुद्धा माझ्या तालावर डोलत आहे. जणू निसर्गही त्या भक्तीसोहळ्यात सहभागी झाला होता.
काही वेळाने मी थकून कट्ट्यावर बसलो.
डोळ्यासमोर एकामागून एक आठवणी तरळू लागल्या.
सेवेत असताना मी किती प्रेमाने बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करायचो!
विद्यार्थ्यांना संतांची शिकवण मिळावी... त्यांच्या मनात संस्कार रुजावेत... भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश त्यांच्या आयुष्यात फुलावा...
यासाठी मी पूर्ण मनाने झटत असे.
माझी स्वतःची वारी कधीकधी चुकली असेल, पण शाळेतील बाल वारकरी दिंडी कधी चुकू दिली नाही.
त्या दिंडीत कितीतरी लहान विठ्ठल दिसायचे... कितीतरी छोट्या रुक्मिणी... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई अशा संतांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी व्हायचे...
जत हायस्कूलचे पटांगण भक्तीने भारून जायचे.
त्या आठवणींनी माझे मन भरून आले.
डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले.
इतक्यात अचानक कुणीतरी हाक मारली —
“कोण बसलंय झाडाखाली...?”
“सकाळ झाली हो!”
मी दचकून जागा झालो.
समोर शाळेचे शिपाई मामा उभे होते.
पहाट उजाडली होती.
मामा आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाले,
“अरेच्या शिंदे सर! तुम्ही वारकरी पोशाखात रात्रीपासून इथे काय करताय? तब्येत ठीक आहे ना?”
मी हळू आवाजात म्हणालो,
“मामा... तसं काही नाही. मला एक स्वप्न पडलं होतं... विद्यार्थ्यांनी मला बाल वारकरी दिंडी सोहळ्यासाठी बोलवायला आले होते. मी तयारी करून इथे आलो... पण इथे आल्यावर कळालं की तो फक्त स्वप्नातील सोहळा होता...”
हे सांगताना माझा गळा दाटून आला.
मामा शांतपणे माझ्या जवळ बसले. त्यांनी माझ्या हातावर प्रेमाने हात ठेवला आणि मंद स्वरात म्हणाले —
“राम कृष्ण हरी... राम कृष्ण हरी...”
त्या नामस्मरणात माझे डोळे पुन्हा भरून आले.
मामा म्हणाले,
“जावा आता घरी... पण शिंदे सर, तुमच्यासारख्या माणसांच्या मनातली भक्ती आणि विद्यार्थ्यांवरचे प्रेम कधीच संपत नसतं. म्हणूनच तुम्हाला हे स्वप्न पडलं असेल.”
मी आकाशाकडे पाहिले.
पहाटेच्या त्या मंद प्रकाशात मला जणू विठ्ठलाचे स्मित दिसत होते...
आणि मनात पुन्हा एकदा शब्द उमटले —
“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...”

Comments