पथनाट्य: चला मतदानला जाऊ...! : लेखक -श्री.सुभाष शिंदे,सर
पथनाट्य : चला करू या मतदान !
मतदार जागृती मोहिम : (जत तालुका)
जत हायस्कूल, जत, जि. सांगली
पिन – ४१६४०४
भ्रमणध्वनी – ८००७२२७५९७
पथनाट्य : चला करू या मतदान !
पात्रे :
गण्या
ताई
दृश्य १
गण्या :
काय ताई, कुठे चाललात तुम्ही?
ताई :
गणू, तुला अजून काहीच माहिती नाही का?
गण्या :
असं काय करता ताई? सांगा ना!
ताई :
अरे गणू, मी लोकांना जागं करायला चालले आहे.
गण्या :
म्हणजे लोक झोपलेत की काय?
ताई :
असं झोपलेतच म्हणायचं!
गण्या :
ते कसं काय? समोर बघा, सगळे जागेच आहेत.
ताई :
अरे गणू, झोपलेत म्हणजे त्यांना आपल्या महाराष्ट्रात दि. ______ रोजी निवडणूक होणार आहे, याची जाणीव नाही.
गण्या :
ताई, असं म्हणू नका. सगळीकडे एवढी धावपळ चालू असताना लोकांना माहिती नाही, असं कसं होईल?
ताई :
अरे, लोकांना निवडणूक आहे हे माहिती आहे; पण...
गण्या :
पण काय ताई?
ताई :
लोकांना मतदान करणे हा आपला हक्क आहे, आपण मतदान करून देशाच्या विकासाला मदत केली पाहिजे, याची जाणीव नाही.
गण्या :
ते कसं ताई?
ताई :
मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे. पण लोक याचा मनापासून विचार करत नाहीत.
दृश्य २
गण्या :
ताई, तुम्ही थोडं चुकताय असं मला वाटतं.
ताई :
ते कसं? सांग बरं.
गण्या :
अहो ताई, वर्षभर लोक आपल्या नावाची मतदार यादीत नोंद करून घेतात. चुकलेल्या नावांची दुरुस्तीही मतदान केंद्रावर जाऊन करून घेतात.
ताई :
गणू, तुझं अगदी बरोबर आहे; पण...
गण्या :
पण काय ताई?
ताई :
हे सगळे लोक मतदान करण्यासाठी नोंदणी करून घेत नाहीत.
गण्या :
मग कशासाठी?
ताई :
अरे, काही तरुण नोकरीसाठी, बँकेसाठी मतदान ओळखपत्र काढतात; तर काही लोक...
गण्या :
काही लोक कशासाठी करतात? सांगा पाहू!
ताई :
काही लोकांना मोफत एस.टी. पाससाठी ते लागते म्हणून.
गण्या :
ताई, मग याचा एवढाच फायदा असतो?
ताई :
गणू, तसं नसतं.
गण्या :
मग कसं असतं?
ताई :
अरे गणू, मतदार यादीत असणारे सर्व लोक मतदानाच्या दिवशी एक दिवसाचे राजे असतात.
गण्या :
म्हणजे “मतदार राजा” म्हणा की!
ताई :
होय, मतदार राजा!
गण्या :
त्याने काय होणार?
ताई :
गण्या, हा मतदार राजा एका दिवसात खूप मोठा बदल करू शकतो.
दृश्य ३
गण्या :
काय करावं म्हणता ताई?
ताई :
सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.
गण्या :
अहो ताई, बरेच लोक मतदान करायला जातात, मला माहिती आहे.
ताई :
अरे गणू, बरेच लोक मतदान करायला जातात; पण बाकीचे काय करतात?
गण्या :
काय करणार? आपली नेहमीची कामं करत असतात. कुणी शेतावर कामाला जातं, कुणी मजुरीला जातं.
ताई :
अरे, मतदानाच्या दिवशी तर शासकीय सुट्टी असते.
गण्या :
अहो ताई, सुट्टी असते ती सरकारी कर्मचाऱ्यांना. गरीब, कष्टकरी लोकांना कुठे असते सुट्टी? त्यांच्या नशिबी राबणंच असतं. त्यांनी सुट्टी घेतली तर त्यांची पोटं कशी भरणार?
ताई :
अरे गणू, राष्ट्रीय कामाला प्रत्येकाचा हातभार लागलाच पाहिजे. आपलं भविष्य घडवण्यासाठी आपण एक दिवस खर्च केला पाहिजे. एक दिवस सर्व कामं बाजूला ठेवून मतदानाचा हा राष्ट्रीय सण साजरा करायला काय हरकत आहे?
दृश्य ४
गण्या :
अहो ताई, खरं आहे तुमचं. आमच्या गावातले नोकरी करणारे लोक हा सण खूप चांगला साजरा करतात.
ताई :
काय करतात?
गण्या :
अहो ताई, मतदानाच्या दिवशी सुट्टी असते म्हणून गावाला जातात, सहलीला जातात, फिरायला जातात!
ताई :
अरे, हेच तर नको व्हायला!
गण्या :
मग काय करावं?
ताई :
अरे गणू, सुशिक्षित लोकांनी असा अख्खा दिवस वाया घालवण्यापेक्षा...
गण्या :
पेक्षा काय?
ताई :
आपण स्वतः प्रथम मतदान करावं आणि इतरांनाही मदत करावी.
गण्या :
ती कशी करायची?
ताई :
अंध, अपंग लोकांना मतदान केंद्रावर घेऊन जावं. मतदान न करणाऱ्या लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं. कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करावं. अशिक्षित लोकांना मतदान कसं करावं याची माहिती द्यावी.
गण्या :
अमिष कसले ताई?
ताई :
कोणत्याही गाडीत न बसता स्वतः चालत अथवा स्वतःच्या गाडीने मतदान केंद्रावर जावं. मतदान करावं आणि देशाच्या कामासाठी थोडा वेळ द्यावा.
ताई :
चला, जाऊ या मतदानाला!
गण्या :
असं म्हणतेस ताई! ताई, चल मीही येतो तुझ्याबरोबर मतदान जागृतीसाठी!
समारोप गीत / घोषणा
“कुणी राहू नका घरी,
आपण सगळेच जाऊ मतदान केंद्रावरी!”
समाप्त
Comments
Post a Comment