विद्यार्थ्यांनी केलेल्या माझा साजरा केला वाढदिवस...एका शिक्षकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण

विद्यार्थ्यांनी साजरा केलेला माझा वाढदिवस
एका शिक्षकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण
— श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर, जत हायस्कूल, जत
शिक्षकाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात. काही प्रसंग क्षणिक असतात, तर काही आयुष्यभर हृदयात कोरले जातात. विद्यार्थ्यांचे प्रेम, त्यांची निरागसता आणि शिक्षकांविषयी असलेली आत्मीयता हे शिक्षकाच्या जीवनातील सर्वांत मोठे धन असते. माझ्या शिक्षक जीवनात असे अनेक प्रसंग आले, पण विद्यार्थ्यांनी साजरा केलेला माझा वाढदिवस हा प्रसंग आजही आठवला की डोळे नकळत पाणावतात.
मी नुकताच जत हायस्कूल, जत येथे सेवेत रुजू झालो होतो. नवीन शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांशी अजून फारशी ओळख झाली नव्हती. मी वर्गात विद्यार्थ्यांशी परिचय करून घेत होतो. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे नाव, छंद, आवड, स्वप्ने याविषयी विचारत होतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात मला नेहमीच आनंद वाटायचा.
गप्पागोष्टी सुरू असतानाच एका विद्यार्थिनीने अचानक विचारले,
“सर, तुमचा वाढदिवस कधी असतो?”
मी सहजपणे उत्तर दिले,
“बारा मार्च.”
त्यानंतर मी हसतच तिला सांगितले,
“पण मी माझा वाढदिवस साजरा करत नाही. त्या दिवशी मी फक्त एक नवीन संकल्प करतो आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत तो पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. ही सवय मी इयत्ता पाचवीपासून आजपर्यंत जपली आहे.”
मुलांनी ते ऐकले आणि विषय तिथेच संपला असे मला वाटले.
त्या काळात माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. मी खानावळीत जेवायला जात असे. दुपारच्या वेळेस एक भाकरी आणि भाजी कागदात बांधून शाळेत आणत असे. सुट्टी झाली की एखाद्या रिकाम्या वर्गात बसून गुपचूप जेवत असे. मला वाटायचे की कुणाचे लक्ष माझ्याकडे नसते, पण विद्यार्थ्यांचे डोळे खूप निरागस आणि निरीक्षक असतात. ते शांतपणे सगळं पाहत होते, हे मला तेव्हा कळलं नव्हतं.
११ मार्च रोजी काही विद्यार्थी माझ्याकडे आले आणि म्हणाले,
“सर, उद्या नवीन ड्रेस घालून या.”
मी फक्त हसून “बरं” म्हणालो; पण मनामध्ये एक वेदना होती. माझ्याकडे नवीन कपडे नव्हते. खरं तर त्या काळात माझ्याकडे फक्त दोनच ड्रेस होते.
दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणेच साधे कपडे घालून शाळेत गेलो. विद्यार्थी माझ्याकडे पाहत होते. त्यातील एका विद्यार्थ्याने हळूच विचारले,
“सर, नवीन ड्रेस नाही घातला?”
मी त्याला जवळ बोलावले आणि शांतपणे म्हणालो,
“बाळा, माझ्याकडे फक्त दोनच ड्रेस आहेत.”
हे ऐकून तो मुलगा काही क्षण शांत झाला. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना दिसत होती. तो हळूच मित्रांकडे गेला आणि त्यांना काहीतरी सांगितले. सगळ्या वर्गात एक शांतता पसरली.
मी वर्गात गेलो. नेहमीप्रमाणे फळा पुसायला हातात डस्टर घेतला, तेवढ्यात संपूर्ण वर्ग एकदम ओरडला,
“सर… थांबा!”
मी आश्चर्यचकित झालो. फळ्याकडे पाहिले आणि काही क्षण स्तब्धच झालो.
फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिले होते —
“आदरणीय सुभाष सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
फळ्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर नक्षीकाम, चित्रे आणि रंगीत सजावट केली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी संपूर्ण वर्ग जणू उत्सवमय करून टाकला होता.
मी थोडासा घाबरलो. त्या काळात शाळेत वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नव्हती. मी मुलांना म्हणालो,
“अरे, हे काय करता? मुख्याध्यापक आले तर आपल्याला रागावतील.”
मी फळा पुसण्याचा प्रयत्न केला, पण काही विद्यार्थ्यांनी प्रेमाने माझ्या हातातून डस्टर काढून घेतला आणि म्हणाले,
“सर, आज नाही… आज हा फळा राहू द्या.”
इतक्यात कुणीतरी सांगितले,
“सर, मुख्याध्यापक वर्गात येत आहेत!”
हे ऐकताच माझ्या मनात धडधड सुरू झाली. “आता काय होणार?” अशी भीती वाटू लागली.
काही क्षणातच मुख्याध्यापक वर्गात आले. मी त्यांना नमस्कार केला आणि घाबरतच म्हणालो,
“सर, हे सगळं मुलांनी केलं आहे. मला काही माहिती नव्हतं. चूक झाली असेल तर माफ करा.”
मुख्याध्यापक माझ्याकडे पाहून हसले. त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले,
“सुभाषराव, काळजी करू नका. मी तुम्हाला रागावणार नाही. या मुलांनी गेल्या आठवड्यापासून तुमच्या वाढदिवसाची तयारी केली आहे. त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.”
हे ऐकताच माझा जीव भांड्यात पडला.
त्यानंतर वर्गात छोटासा कार्यक्रम सुरू झाला. कुणी स्वागतगीत म्हटले, कुणी मनोगत व्यक्त केले, कुणी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंद होता, आणि माझ्या मनात कृतज्ञतेची भावना.
इतक्यात वर्गप्रमुख विद्यार्थिनी उभी राहिली आणि म्हणाली,
“सर, आज आम्ही आमच्या आवडत्या शिक्षकांना एक भेट देणार आहोत.”
तिने एक सुंदर स्टीलचा डबा माझ्या हातात दिला.
तो डबा पाहताच माझे डोळे भरून आले. मला लगेच समजले — विद्यार्थ्यांनी मला कागदात भाकरी खाताना पाहिले होते… आणि त्या वेदनेतूनच त्यांनी ही भेट दिली होती.
त्या क्षणी मला बोलवत नव्हते. शब्द हरवले होते. फक्त डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
मी तो डबा हातात घेतला आणि विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापकांना मनापासून धन्यवाद दिले.
त्या दिवशी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली —
विद्यार्थी ही देवाची फुलं असतात.
त्यांच्या मनात प्रेम, करुणा आणि माणुसकीचा सुगंध भरलेला असतो.
त्या छोट्याशा डब्याची किंमत पैशांत मोजता येणार नव्हती. तो डबा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांविषयी असलेले प्रेम, आदर आणि जिव्हाळा होता.
आज मी सेवानिवृत्त झालो आहे. अनेक वर्षांचा शिक्षक जीवनाचा प्रवास मागे पडला आहे. पण जेव्हा मी शाळेकडे पाहतो, तेव्हा त्या वर्गाची आठवण अजूनही डोळ्यांसमोर उभी राहते.
तो सजवलेला फळा…
ते निरागस विद्यार्थी…
ते प्रेमळ मुख्याध्यापक…
आणि माझ्या हातात दिलेला तो डबा…
सगळं काही आजही ताजं वाटतं.
खरंच, शिक्षक होणं ही केवळ नोकरी नसते; ती विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याची एक पवित्र साधना असते.
माझ्या आयुष्यात अशा अनेक आठवणी आहेत. त्या आठवणीच आता माझी खरी संपत्ती आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही त्या आठवणी मला जगण्याची नवी ऊर्जा देत राहतील…! 🙏

Comments