सेवानिवृत्ती नंतरचा जून महिना... एका शिक्षकाच्या मनातील भावविश्व
सेवानिवृत्तीनंतरचा जून महिना…
एका शिक्षकाच्या मनातील भावविश्व
३१ मार्च २०२६…
माझ्या शिक्षक जीवनातील तो शेवटचा दिवस…!
जवळपास चार दशकं विद्यार्थ्यांच्या सहवासात, शाळेच्या प्रार्थनेत, घंटानादात, वर्गखोल्यांच्या गजबजाटात आणि संस्कारांच्या पवित्र वातावरणात रमलेला मी त्या दिवशी औपचारिकपणे सेवानिवृत्त झालो.
निरोप समारंभ झाला…
विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, सहकाऱ्यांच्या शब्दांत प्रेम होतं आणि माझ्या मनात मात्र एक विचित्र शांतता होती.
“आता उद्यापासून शाळा नाही…”
हे वाक्य कानावर पडत होतं, पण मन ते स्वीकारायला तयार नव्हतं.
एप्रिल आणि मे महिना कसा गेला ते समजलंच नाही.
उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे फारसा फरक जाणवला नाही.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळा बंद होती. त्यामुळे “मी सेवानिवृत्त झालो आहे” ही भावना मनाच्या खोलवर पोहोचलीच नाही.
पण…
खरा क्षण जवळ येत होता…
जून महिना…
शाळा सुरू होण्याचा महिना…
नवीन प्रवेश, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन स्वप्नं आणि नवीन उत्साह घेऊन विद्यार्थी शाळेकडे धाव घेणारा महिना…!
पूर्वी जून जवळ आला की मनामध्ये एक वेगळीच धावपळ सुरू व्हायची.
गावी गेलो तरी शाळेची ओढ लागायची.
“लवकर निघायला हवं… शाळा सुरू होणार…”
असं सतत वाटायचं.
पण आता…
आता कुठेही राहा, कोणतीही घाई नाही.
कोणी विचारणार नाही,
“सर, आज उशीर झाला का?”
कोणी धावत येऊन म्हणणार नाही,
“सर, माझं चित्र बघा…”
“सर, आज परिपाठ माझा आहे…”
“सर, स्काऊटचा सराव कधी आहे?”
हे “सर… सर… सर…” म्हणणारे आवाज आता आठवणींतच ऐकू येणार होते.
घरातील वातावरणही आता वेगळं असणार…
पूर्वी घरातील मंडळी म्हणायची,
“सरांना वेळ नाही… शाळेचे काम आहे…”
आता मात्र म्हणतील,
“अहो, तुम्ही तर सेवानिवृत्त झालात… जरा बाजारातून सामान आणा…”
“दुकानात जाऊन या…”
“नातवाला शाळेत सोडा…”
मुलंही आता हक्काने कामं सांगतील.
“बाबा, जरा हे घेऊन या…”
“आजोबा, आमच्यासोबत बसा…”
आणि खरं सांगायचं तर, त्या सगळ्या कामांमध्येही एक वेगळाच आनंद असेल.
पण तरीही…
मनाचा एक कोपरा मात्र शाळेतच अडकलेला असेल.
कारण शाळा ही केवळ इमारत नसते…
ती शिक्षकासाठी मंदिर असते.
ज्ञानमंदिर…!
त्या मंदिरात प्रवेश करताच मनातील सर्व दुःख, चिंता आणि थकवा नाहीसा होत असे.
विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं की स्वतःचं वय विसरून जायचो.
जरी वय अठ्ठावन्न असलं तरी मन मात्र पंधरा-सोळा वर्षांच्या मुलासारखं उत्साही होतं.
शाळेची प्रार्थना…
परिपाठ…
घंटेचा आवाज…
वर्गातील गोंधळ…
चित्रकलेच्या तासातील रंगांची उधळण…
स्काऊटचे उपक्रम…
प्रदर्शनांची धावपळ…
विद्यार्थ्यांचे प्रश्न…
पालकांच्या भेटी…
हे सगळं आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं होतं.
आता मात्र स्वतःचाच परिपाठ स्वतःला तयार करायचा आहे.
सकाळ होईल…
पण शाळेची घंटा नसेल.
दप्तर नसेल…
हजेरी नसेल…
तरीही आठवणी मात्र रोज हजेरी लावतील.
खरं तर सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा थोडासा धक्कादायक असतो.
कारण अनेक वर्षे आपण एका विशिष्ट वातावरणात जगत असतो.
ते वातावरण अचानक बदलतं आणि मग सुरू होतो एक नवीन प्रवास.
त्या दोन जगांमधलं अंतर…
हेच सर्वांत कठीण असतं.
एकीकडे शाळेच्या गजबजलेल्या आठवणी…
तर दुसरीकडे शांत घर…
एकीकडे विद्यार्थ्यांचा सहवास…
तर दुसरीकडे निवांतपणा…
कधी कधी वाटतं, शाळा थोडी लांब असलेलीच बरी…
कारण जवळून जाताना मन पुन्हा तिथेच धाव घेईल.
पुन्हा वर्गात जावंसं वाटेल…
फळ्यावर लिहावंसं वाटेल…
विद्यार्थ्यांसोबत हसायला, गाणं म्हणायला, चित्र काढायला मन आतुर होईल.
शाळेत गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतील…
आपल्या टेबलाकडे पाहताना डोळे पाणावतील…
प्रार्थनेचा आवाज ऐकून मन भरून येईल…
कारण शिक्षक कधीच पूर्णपणे सेवानिवृत्त होत नाही.
तो फक्त शाळेच्या सेवेतून निवृत्त होतो;
पण विद्यार्थ्यांवरील प्रेम, संस्कारांची ओढ आणि ज्ञानदानाची भावना आयुष्यभर जिवंत राहते.
आजही मन सांगतं —
“एकदा तरी पुन्हा त्या वर्गात जावं…
एकदा तरी पुन्हा ‘सर’ म्हणून हाक ऐकावी…”
आणि मग लक्षात येतं…
सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नसतो,
तो आठवणींच्या नव्या पर्वाची सुरुवात असते…! 🙏
-श्री.सुभाष शिंदे,सर
Comments
Post a Comment