रिकाम्या वर्ग....
— श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल, जत
आज पुन्हा एकदा मी वर्गात आलो…
पण आजचा वर्ग काहीसा वेगळाच होता…
ना गडबड, ना गोंधळ, ना “सर… सर…” ची हाक…
फक्त शांतता… आणि आठवणींचा आवाज होता…
दार हलकेच उघडलं,
आणि नजर सरळ त्या बाकांकडे गेली…
जिथे कधीकाळी भविष्य बसायचं,
आज तिथे रिकामेपण निवांत बसलेलं दिसलं…
मी हळूच एका बाकाजवळ गेलो…
हात ठेवला त्याच्या कडेला…
जणू तोही मला ओळखून म्हणाला—
“सर, इतक्या उशिरा का आलात आज?”
मी हसलो… पण डोळे ओलावले…
“आज शेवटचं आलाय रे…
तुमच्याशी बोलायला… निरोप द्यायला…”
दुसरा बाक जणू म्हणाला—
“सर, आठवतंय?
मीच ना तो… जो नेहमी गोंधळ घालायचो…
आणि तुम्ही रागावूनही शेवटी हसायचात…”
तिसरा बाक हळूच कुजबुजला—
“सर, माझ्यावर बसलेली ती शांत मुलगी…
तुमच्या एका शब्दानं उभी राहिली होती…
आज ती कुठे असेल?”
क्षणभर वर्ग जिवंत झाला…
हसणं, बोलणं, प्रश्न, उत्तरं…
सगळं पुन्हा कानात घुमायला लागलं…
फळ्याकडे पाहिलं…
खडू नसतानाही तो भरलेला वाटत होता…
प्रत्येक रेषेत माझं आयुष्य होतं,
प्रत्येक शब्दात विद्यार्थ्यांचं भविष्य होतं…
मी शिट्टीचा आवाज आठवला…
मैदान, स्काऊटचे धडे, शिस्त…
“तयार रहा” म्हणताना
मी स्वतःलाच तयार करत होतो कदाचित…
पण आज…
ना कोणी उभं राहिलं “गुड मॉर्निंग सर” म्हणायला…
ना कोणी वही घेऊन धावत आलं…
ना कोणाचा निरागस प्रश्न…
फक्त शांतता…
आणि माझं भरून आलेलं मन…
मी हळूच म्हणालो—
“कुठे गेलात सगळे…?
एकदा तरी या ना…
मला पुन्हा एकदा ‘सर’ म्हणून हाका मारा…”
पण उत्तर आलं नाही…
फक्त भिंतींनी माझा आवाज परत दिला…
मी वर्गाच्या मधोमध उभा राहिलो…
डोळ्यांतून दोन थेंब अलगद गळाले…
आणि मनात एकच जाणवलं—
आज मी एकटा नाही…
माझ्यासोबत हजारो आठवणी आहेत…
पण तरीही…
हा वर्ग आज खूप रिकामा आहे…
मी शेवटचा एक कटाक्ष टाकला…
त्या बाकांकडे… त्या फळ्याकडे…
आणि हलक्या आवाजात म्हणालो—
“धन्यवाद…
मला शिक्षक बनवल्याबद्दल…”
पाऊल मागे वळलं…
दार हळूच बंद झालं…
आणि त्या क्षणी—
एक शिक्षक…
आपल्या वर्गाचा निरोप घेऊन गेला…
Comments
Post a Comment