सेवानिवृत्तीचा वाटेवर..... - श्री.सुभाष शिंदे,सर
सेवानिवृत्तीच्या वाटेवरती…
सेवानिवृत्तीच्या वाटेवरती पाऊल टाकताना,
मन मागेच कुठेतरी थांबून पाहतंय…
घंटानाद, वर्गखोल्या, ती धावपळ सारी,
आठवणींच्या रूपानं आजही जगतंय…
जीवनगाणं गात गात चाललो कित्येक वर्षे,
विद्यार्थ्यांच्या हास्यातच माझं सुख सापडलं…
स्वतःचं जगणं कधी मागे पडलं कळलंच नाही,
त्यांच्या भविष्यातच माझं आयुष्य रंगवलं…
मीच एक वारकरी होतो त्या ज्ञानपंढरीचा,
दररोजची वारी होती शाळेच्या दारी…
हातात खडू, मनात सेवा, ओठांवर धडा,
अशीच चालली माझी आयुष्यभरची तयारी…
एक घंटा… दुसरी घंटा…
त्या तालावर दिवस नाचत होते…
प्रत्येक तासात नवं स्वप्न उगवत होतं,
प्रत्येक क्षणात जीवन फुलत होतं…
आज ती घंटा शांत झाली,
आणि वेळेची साखळी तुटून गेली…
आता ना धावपळ, ना ती गडबड,
मन मात्र त्या लयीला शोधत राहिलंय अजूनही…
आज, उद्या, परवा…
काळ आता माझा झालाय…
बंधनं नाहीत, घाई नाही,
पण तरीही मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय…
घरात बसलेला हा निवांतपणा,
कधी सुखावतो, कधी बोचतो…
कोणी “सर” म्हणून हाक मारत नाही,
हेच मनाला हळवं करून टाकतं…
पाय नकळत मंदिराकडे वळतात,
विठ्ठलासमोर शांत उभा राहतो…
तो काही बोलत नाही, मीही शांतच,
पण मनात मात्र संवाद सुरू राहतो…
“देवा, आता पुढे कसं जगायचं?”
हा प्रश्न हळूच ओठांवर येतो…
आणि घंटानादाच्या त्या नादात,
उत्तर कुठेतरी अंतर्मनात मिळतं…
“थांबू नकोस… चालत राहा,
सेवा बदलली, पण अर्थ तोच आहे…
आता स्वतःसाठीही थोडं जग,
हीच खरी तुझी नवी दिशा आहे…”
आवडीनिवडी, स्वप्नं अजूनही जिवंत आहेत,
फक्त त्यांना नवा मार्ग द्यायचा आहे…
पेन्शनच्या मर्यादेत का होईना,
मनाच्या श्रीमंतीने जगायचं आहे…
नवीन छंद, नवीन रंग,
पुन्हा एकदा जीवन रंगवायचं आहे…
आता स्वतःचाच मी विद्यार्थी बनून,
स्वतःलाच नवं काही शिकवायचं आहे…
सेवानिवृत्तीच्या या शांत वाटेवर,
एक नवं मंदिर उभं करायचं आहे…
अनुभवांच्या वीटा, आठवणींचं छप्पर,
आणि समाधानाचा दीप लावायचा आहे…
कारण…
ही समाप्ती नाही, ही सुरुवात आहे,
एका नव्या, शांत, सुंदर प्रवासाची…
सेवानिवृत्तीच्या वाटेवरती,
आता स्वतःला शोधण्याची वेळ आली आहे…!
-श्री.सुभाष शिंदे, सर
Comments
Post a Comment