*सेवानिवृत्तीचा शिक्षक,आज आणि उद्या*
आज…
शाळा नाही, घर आहे—
पण त्या घरामध्ये शाळा नाही…
फळा नाही, खडू नाही,
हजेरीचा आवाज नाही…
दररोज भेटणारी ती लेकरं,
आज दाराशी येत नाहीत…
“सर…!” म्हणून धावत येणारे स्वर,
आता फक्त आठवणीत राहतात…
नियमित जीवनाचा तो ठरलेला ताल,
घड्याळाशी बांधलेले प्रत्येक पाऊल—
आज मोकळं झालंय सगळं,
पण मन मात्र अजूनही वेळेवरच धावते…
शाळेची घंटा कानात वाजते,
आणि नकळत पाय वळतात त्या दिशेने…
वर्गाच्या दाराशी थांबलेली सवय,
आजही मनात तशीच उभी आहे नेहमीसारखीच…
पुस्तकांच्या पानांत हरवलेले दिवस,
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांत सापडलेलं आयुष्य—
आज शांत आहे सगळं,
पण आत कुठेतरी गोंगाट सुरूच आहे…
आणि उद्या…
उद्या पुन्हा उगवेल नवा दिवस,
नव्या अर्थाने जगायला शिकवणारा…
शाळा नसेल कदाचित,
पण समाज एक मोठं विद्यालय असेल,
विद्यार्थी बदलतील,
पण शिकवण्याची ओढ तशीच राहील…
अनुभवांची शिदोरी घेऊन,
कथा-कवितांतून वाट मोकळी करीन,
जिथे जाईन तिथे
ज्ञानाची छोटीशी ज्योत पेटवीन…
कारण—
शिक्षक कधीच निवृत्त होत नाही,
तो फक्त वर्गातून बाहेर पडतो…
पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तो पुन्हा “शिक्षक” बनतच राहतो…
आज थोडं रिकामं वाटतंय,
पण उद्या अर्थपूर्ण होईल…
कारण—
सेवानिवृत्ती ही शेवट नाही,
तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे… 🌼 श्री.सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर: जत हायस्कूल, जत.
Comments
Post a Comment