सेवानिवृत्ती झालो तरी, आठवणी असे माझ्या मनी...!@@बाल वारकरी दिंडी सोहळा: भक्ती , संस्कार आणि आनंदाचा उत्सव -श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल, जत (सेवानिवृत्त-कलाशिक्षक)
बाल वारकरी दिंडी सोहळा : भक्ती, संस्कार आणि आनंदाचा उत्सव
— श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक व स्काऊट मास्टर(सेवानिवृत्त कलाशिक्षक)
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत या शाळेमध्ये वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व उपक्रमांमध्ये विशेष आकर्षण ठरतो तो म्हणजे बाल वारकरी दिंडी सोहळा.
या सोहळ्याशी माझे अतूट नाते आहे. मी स्वतः माळकरी असल्यामुळे लहानपणापासून भजन, कीर्तन आणि वारकरी परंपरेत रमलेलो आहे. त्यामुळे या उपक्रमात सुरुवातीपासूनच मी सक्रिय सहभाग घेत आलो आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने साजरा होणारा हा उपक्रम वर्षानुवर्षे अधिक समृद्ध आणि देखणा होत गेला आहे.
दिंडी सोहळ्याची चाहूल लागताच विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता निर्माण होते. “सर, दिंडी सोहळा केव्हा आहे?” असा प्रश्न ते आनंदाने विचारतात. बाल वारकरी वेशभूषा, अभंगांवर आधारित नृत्य, टाळ-मृदुंगाचा नाद—या सर्वांची तयारी सुरू होते आणि शाळेचे वातावरण भक्तिमय बनते.
कार्यक्रमाच्या दिवशी शाळा जणू पंढरपूर नगरीच भासते. विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी वेशभूषेत सजून येतात. यावेळी मा. मुख्याध्यापक श्री. पी. एम. कांबळे यांनी सर्व शिक्षक-शिक्षिकांनाही वारकरी वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली.
टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानबा तुकाराम!”, “पंढरीनाथ महाराज की जय!” अशा जयघोषात दिंडीची सुरुवात झाली. शाळेच्या प्रवेशद्वारातून दिंडी प्रस्थान करताच रांगोळ्यांनी सजलेल्या परिसरात विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. स्टेजजवळ विठ्ठल-रुक्माईच्या वेशात उभे असलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
पालखी आगमनानंतर संपूर्ण वातावरण अधिकच भारावून गेले. टाळ, तुळशीचे रोप आणि भक्तिभावाने सजलेली दिंडी पाहताना जणू पंढरपूरच शाळेत अवतरले आहे, असा अनुभव सर्वांना आला. त्यानंतर भजन, अभंग गायन, प्रतिमापूजन आणि प्रथमच शिक्षक-शिक्षिकांचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका यांनी टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर फुगडी खेळत सहभाग घेतला, तेव्हा विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, “विठ्ठल-विठ्ठल”चा घोष आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम अधिकच रंगला. शेवटी आरतीने सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमास दि फ्रेंडस् असोसिएशन, जत चे जॉईंट सेक्रेटरी श्री. बिज्जरगी साहेब उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या यशस्वी आयोजनामागे कु. हल्याळ मॅडम, माळेकर मॅडम, सौ. कुलकर्णी मॅडम तसेच सर्व शिक्षकवर्ग यांचे सहकार्य लाभले. मा. मुख्याध्यापक श्री. पी. एम. कांबळे व उपमुख्याध्यापक श्री. एस. डी. चौगुले यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.
या दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, सहकार्य, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार रुजतात. हा उपक्रम केवळ सांस्कृतिक नसून मूल्यसंस्कारांचा एक सशक्त माध्यम आहे.
यावर्षीचा हा दिंडी सोहळा माझ्यासाठी विशेष भावनिक ठरला. कारण दि. ३१ मार्च २०२६ रोजी मी सेवानिवृत्त झालो आहे. त्यामुळे पुढील वर्षी या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही, ही भावना मनाला स्पर्शून गेली. विद्यार्थ्यांनी “सर, पुढच्या वर्षी नक्की या!” अशी विनंती केली. मीही शक्य असल्यास नक्की येईन, असे त्यांना आश्वासन दिले.
या उपक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्रण करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले, ज्यामुळे या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळाली.
खरंच, शालेय जीवनातील असे प्रसंग मनात कायमचे घर करून राहतात. जत हायस्कूल ही केवळ शाळा नसून संस्कारांची पवित्र भूमी आहे. येथे राबविले जाणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात, हीच माझ्या संस्थेची खरी ओळख आहे.
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक स्काऊट
Comments
Post a Comment