माझे प्रेरणास्थान: आदरणीय कला गुरू...!

माझे प्रेरणास्थान – आदरणीय कला गुरु
एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान किती मोठे असते, हे शब्दांत मांडणे कठीण आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट उजळून टाकतात. माझ्या आयुष्याला दिशा देणारे असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय सुभाष शिंदे सर.

मी, रश्मी पवार–शितोळे, जत हायस्कूल, जत ची माजी विद्यार्थिनी. माझ्या आयुष्याचा पाया ज्या शाळेत रचला गेला आणि ज्या गुरुंनी मला घडवलं, त्यात शिंदे सरांचं स्थान अतिशय मानाचं आहे.

लहानपणापासून मला रंग, रेषा आणि चित्रांच्या दुनियेत रमायला खूप आवडायचं. कागदावर माझं छोटंसं विश्व साकारताना मला वेगळ्याच आनंदाची अनुभूती मिळायची. शाळेत असताना शिंदे सर आम्हाला चित्रकला आणि कार्यानुभव हे विषय शिकवत होते. त्यांचा चित्रकलेचा तास म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा सोहळाच असायचा. तो तास कधी सुरू होईल याची मी आतुरतेने वाट पाहायचे.

रंगांमधील भावना, रेषांमधील जिवंतपणा आणि कलेतील सौंदर्य त्यांनी इतक्या जिव्हाळ्याने शिकवलं की चित्रकला ही केवळ कला नसून ती मनाची भाषा आहे, हे मला त्यांच्या मार्गदर्शनातून उमगलं.

शिंदे सर सुरुवातीपासूनच अत्यंत कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत. विद्यार्थ्यांप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा, संयम आणि आपुलकी आजही तशीच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं मूल मानून त्यांना घडवण्याचं कार्य त्यांनी आयुष्यभर निष्ठेने केलं.

माझ्या वडिलांनी चित्रकलेतील माझी आवड ओळखली आणि माझ्या स्वप्नांना खंबीर पाठिंबा दिला. माझं पुढील शिक्षण आणि भविष्य घडवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.

बारावीनंतर मी चित्रकला महाविद्यालय, लातूर येथे प्रवेश घेतला. तेथे मी कला शिक्षक पदविका आणि चित्रकला पदविका पूर्ण केली. पुढील शिक्षणासाठी मी कलाविश्व महाविद्यालय, माधव नगर येथे शिक्षण पूर्ण केलं.

माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे सर जे. जे. कला महाविद्यालय, मुंबई येथे कला शिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी मिळालेला प्रवेश. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ पंचवीस विद्यार्थ्यांची निवड होत होती आणि त्यात माझी निवड झाली. त्या क्षणी आनंदाने अक्षरशः आकाश ठेंगणे झाल्यासारखं वाटलं. तो क्षण आजही आठवला की डोळ्यांत आनंदाश्रू येतात.

आज मी पुण्यात कलाकार आणि कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तसेच एक कलाकार म्हणून अनेक कला प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी मला लाभली. विद्यार्थ्यांना शिकवताना प्रत्येक क्षणी शिंदे सरांची आठवण मनात दाटून येते. त्यांच्या सहवासातूनच मला कलाशिक्षणातील समर्पण, शिस्त आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता शिकायला मिळाली.

आज सर निवृत्त होत आहेत. हा क्षण आनंदाचा असला तरी मनाला हुरहूर लावणारा आहे. आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या महान गुरुंप्रती कृतज्ञतेने माझं मन भरून येतं.

देवाचरणी मनःपूर्वक प्रार्थना —
सरांना उत्तम आरोग्य, आनंदी, निरोगी आणि समाधानमय आयुष्य लाभो.

मी आयुष्यभर त्यांची कृतज्ञ विद्यार्थिनी राहीन.

— रश्मी पवार–शितोळे.

Comments