श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर, जत हायस्कूल, जत.
कलेच्या विश्वात जगणारा, वावरणारा साने गुरुजींच्या विचाराचा वारसा नव्या पिढीला देणारा, एक आदर्श, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून, सुभाष शिंदे सर यांच्याकडे पाहिले जाते. जत हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जत मधील चित्रकलेचे अध्यापक, उत्कृष्ट छायाचित्रकार, स्काऊट मास्टर, उत्कृष्ट कवी व साहित्यिक अशी ख्याती, श्री सुभाष शिंदे सर यांची आहे. बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे, सन -१९६८ मध्ये एका गरीब कुटुंबात श्री. सुभाष शिंदे सर यांचा जन्म झाला. वडील संगीत प्रेमी व पेटीवादक. पोवाडा या कलाप्रकारात शाहिराला पेटीची साथ देणारे, भजन गाणारे कलाप्रेमी होते. उदरनिर्वाहासाठी माधवनगर सांगली येथे कॉटन मिलमध्ये ते काम करत होते. त्यांना कलेची विलक्षण आवड होती. दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी आपली कला सादर केली. आणि तसाच कलेचा वारसा, श्री सुभाष शिंदे सर यांनी, जोपासला चित्रकलेची विलक्षण आवड असल्यामुळे, बुधगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संपवून, श्री सुभाष शिंदे सर सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय येथे आले. तेथे त्यांनी, कॉमर्स शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व पुढे कला शिक्षक पदविका सांगली येथे पूर्ण करून मुंबई या ठिकाणी त्याच्या परीक्षा देऊन प्रथम श्रेणीत श्री. शिंदे सर उत्तीर्ण झाले. पुढे नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे शिवसेनेचे मुखपत्र सामना साठी कला विभागात आर्टिस्ट व दैनिक केसरी मध्ये आर्टिस्ट म्हणून काम केले. पुढे शिंदे सर १९९१ मध्ये. दि. फ्रेंडस् असोसिएशन जतचे, जत हायस्कूल जत येथे कला शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून त्यांच्या अविरत कार्याला सुरुवात झाली. शिंदे सर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. आपल्या अध्यापन बरोबरच मुलांना गोष्टी सांगणे, त्यांना गाणी म्हणून दाखवणे, त्यांना कविता ऐकवणे, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, त्यांना उत्तम चित्रे काढायला शिकवणे, त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा घेणे, स्काऊट आणि गाईड या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनवणे, असे असंख्य उपक्रम स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य सरांनी केले आहे. कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा मध्ये गेले नऊ वर्षे अॅड व्सहास पार्टी सदस्य सक्रिय आहेत. स्काऊट, गाईड विविध गाठी व गॉझेट प्रात्यक्षिक जिल्ह्याच्या विविध ठिकाणी व्याख्यान, प्रात्यक्षिके यांनी दिली आहेत. शिंदे सरांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य त्यांना प्राप्त झाला.
शाळेतील अध्यापनाचे कार्य करताना बी.ए. ए.एम. डिग्री घेऊन शैक्षणिक ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न हे विशेष! शाळेच्या फलकावर सुंदर हस्ताक्षरात शिंदे सर लेखन करत राहिले. शाळेत कोणताही कार्यक्रम असो स्टेज सजावट शिंदे सर आवडीने करत राहिले. खरेतर शिंदे सर यांचे कार्य शब्दात मांडणे अवघड आहे.
Comments
Post a Comment