शाहीर सम्राट शाहीर तिलक कवी विशारद बापूराव वीरपक्ष विभुते यांचे काव्य पोवाडा खंड एक प्रकाशन सोहळा समारंभ...

बुधगाव : श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात, शाहीरसम्राट,शाहीरतिलक, कवीविशारद
बापूराव विरुपाद विभूते यांच्या काव्य खंड -१
या पुस्तकाचे प्रकाशन सौहळा संपन्न झाला.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री.इंगळे साहेब, उपाध्यक्ष श्री. विभूते साहेब, श्री.आनंदा पाटील, श्री.दशरथ पाटील, रामदास पाटील, श्री.अवधूत विभूते, शाहीर बापूराव विरुपाद विभूते यांच्या शिष्यगण, श्री .सुभाष शिंदे,सर यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
     या कार्यक्रमाला शाहीराच्या कुटुंबातील नातलग,मित्र परिवार,बुधगावातील नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.
'शाहिराचं गाणं लोककलेतील सोनं' या ओळीचा अनुभव शाहीरसम्राट शाहीरतिलक कवीविशारद बापूराव विरूपाक्ष विभूते यांच्या शाहिरी काव्यातून येतो. महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि कलावंतांची भूमी आहे. कलावंतामध्ये प्रामुख्याने शाहीर येतात. 'शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण' ही शाहिरीबद्दलची मराठी माणसाची प्रामाणिक भावना आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी निर्माण केला हे जेवढे खरे आहे तेवढेच हा महाराष्ट्र तेव्हापासून आतापर्यंत शाहिरांनी गाजत वाजत-चेतवत-पेटवत ठेवला हेही खरेच आहे. इतिहास घडवला मावळ्यांनी आणि प्रेरणा जागवली शाहिरांनी हे सांगताना प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून आल्याशिवाय राहत नाही. मराठी पुरुषार्थाचा गौरव, खरे कार्यवर्णन जर कोणी केले असेल तर ते फक्त शाहिरांनी. स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर व समकाळातही हे काम धीरोदात्तपणे केले आहे करत आहेत. परंतु आज मराठी वाचकांच्या मनात आणि ध्यानात नोंद आहे ती केवळ आगीनदास, अनंत फंदी, होनाजी बाळा, परशराम, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ, पठे बापुराव या शिवकाळ, पेशवेकाळातील शाहिरांचीच. त्यांचे कार्य आदर्शवत आहे यामध्ये दुमत नाही. परंतु इतर शाहिरांची ओळख देखील क्रमप्राप्त आहे.
जुलमी इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे काम इथल्या वीरपुरुषांपासून ते सामान्य माणसापर्यंत अनेकांनी केले आहे. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत करण्याचे कामशाहिरांनीच केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची तर स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीची ज्योत कायमपणाने पेटवत ठेवण्याचे काम या महाराष्ट्र शाहिरांनी केले आहे. अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी-परंपरा, वाईट विचार-कृती, लोकशाही आणि राष्ट्रविरोधी बाधक विचाराला धगधगता पलिता लावण्याचे काम आजही शाहीर मंडळी करताना दिसून येत आहेत. त्यामुळेच या शाहीरांचे त्यांच्या परंपरेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गव्हाणकर, आत्माराम पाटील, शाहीर कृष्णराव साबळे यांच्या इतकंच सशक्त पोवाडा साहित्य आणि कला असणारे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वपूर्ण शाहीर म्हणून
शाहीरसम्राट बापूराव विरुपाक्ष विभूते यांचे पोवाडे - खंड १
 शाहीर बापूराव विरुपाक्ष विभूते यांचा जीवन व शाहीरीविषयक कार्य परिचय या निमित्ताने देणे गरजेचे आहे.
'शाहीरसम्राट' ही बिरुदावली खऱ्या अर्थाने सार्थ करणारे शाहीर म्हणून शाहीर बापूराव विभूतेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. एका गरीब घराण्यात बापूरावांचा जन्म ७ ऑक्टोबर १९३० साली झाला. शिक्षण फक्त २ री पर्यंत झाले होते. बापूरावांचे वडील विरुपाक्ष विभूते हे कलगी पक्षाचे भेदीक शाहीर होते. घरात चालणाऱ्या भेदीक गायनांचे शाहिरांनी बालपणापासून मनन आणि अध्ययन सुरू केले. यातूनच महाराष्ट्राला एक देखणा खड्या आवाजाचा रुबाबदार शाहीर मिळाला.
भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जोमाने सुरु होती, त्यावेळी सांगलीचे सुप्रसिद्ध शाहीर कै. ग. द. दीक्षित यांचे पोवाडे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत होते. त्यांच्या अप्रतिम डफ वादन आणि जोषपूर्ण पोवाड्यांमुळे स्वातंत्र्य लढ्यासाठी हजारो तरुण पेटून उठत होते. तरुण बापूरावांना या मर्दानी कला प्रकाराची मोहिनी पडली. तत्काळ त्यांनी शाहीर दीक्षितांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांची साथ करीतच या बाल शाहिराने धडे गिरवायला सुरुवात केली.
शाहिराला आवश्यक अशी धिप्पाड शरीरयष्टी, पिळदार मिशा, डोक्यावर शाहिरी फेटा, छातीवर शाहीर सम्राट असा आडवा पट्टा, तंग सरवार आणि हातात डफ अशा अविभार्वात स्टेजवर प्रवेश करताच शाहिरांची प्रेक्षकांवर छाप पडत असे. एकदा डफ कडकडायला लागला आणि अधून-मधून दिमडी (खंजिरी) वरचे नाजूक बोल उठू लागले म्हणजे तमाम प्रेक्षक कधी विभूतेमय होऊन जायचे ते समजायचेही नाही अशी त्यांची ख्याती होती. संपूर्ण जीवनच शाहिरीमय होवून गेलेले. शाहीर आकंठपणे शाहिरीतच रमले. कोणतीही कला दुसऱ्याला देण्याने वाढते हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. त्यामुळे त्यांनी अनेकांना ही शाहिरी कला शिकविली. आज संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी शिक्षण दिलेले ५० हून अधिक शाहीर पथके स्वतंत्रपणे शाहिरी कार्यक्रम करीत आहेत. याशिवाय त्यांच्या पुढील पिढ्या संपूर्ण कुटुंबच शाहिरी कलेत झोकून देऊन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर देश, परदेशात ही आपल्या विभूते शाहिरी घराण्याचा पताका फडकवताना दिसून येतात. सुरेल खडा आवाज, चालीतील फेरबदल, आवश्यक कमी अधिक तालातील गती, काव्यातील वीररस, करूणरस, आनंदरस या रसांचे सामर्थ्यशाली
शाहीरसम्राट बापूराव विरुपाक्ष विभूते यांचे पोवाडे सादरीकरण, त्याला जोडून प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणारे आणि त्यांना चिमटे घेणारे गद्य प्रतिपादन, रंगतदार विनोद यामुळे समोर कितीही मोठा जमाव असला तरीही तो बापूरावांच्या शाहिरी गायनाशी एकरूप होऊन जात असे. अशी ताकद शाहिरीत अभावानेच पहायला मिळते.
शाहिरांनी १००० हून अधिक कार्यक्रम केले आहेत, १०० हून अधिक पोवाडे रचले, २५ हून अधिक पाळणे, वगनाट्ये, ५ ग्रामीण नाटके व शाहिरी फटके आणि असंख्य शाहिरी कथने लिहून शाहिरी क्षेत्रात समृद्ध योगदान दिले आहे.
१९५६ साली त्यांच्या शाहिरी कलेबद्दल शृंगेरीचे शंकराचार्य यांनी त्यांना 'कवीविशारद, शाहीरसम्राट' अशी पदवी बहाल केली. १९९५ साली नानिवडेकर शाहिरी संगम तथा शाहीर ग. द. दीक्षित लोककला विद्यापीठ, मुंबई या संस्थेने 'शाहिरीतिलक' अशी पदवी दिली. १९९२-९३ साली 'शाहीर सगनभाऊ पुरस्कार', २००० साली 'पट्टे बाबूराव पुरस्कार' अशा अनेक पुरस्कारांनी या शाहिराचा महाराष्ट्राने गौरव केला आहे. मुंबईच्या आय. एन. टी. या संस्थेने त्यांना जपानमध्ये कार्यक्रमाची संधी दिली आणि शाहिरांनी त्याचे सोने केले. जपानमध्ये रंगतदार पोवाडा सादर करून शाहिरीचा सन्मान केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध लोककला महोत्सवातून त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांचे असंख्य कार्यक्रम झाले आहेत. अनेक शाहिरी प्रशिक्षण शिबीरातून त्यांनी संचालक आणि व्याख्याते या भूमिकेतून शाहिरी विद्यार्थी प्रशिक्षित केले आहेत.
निवडणूका, साहित्य संमेलने, निरनिराळे महोत्सव यातूनही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत, शिवाय अनेक शाहिरी विषयक संस्थावर सन्मानपूर्वक कार्यरत होते. महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे या संस्थेचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष, सांस्कृतिक कार्य संचालनालय या संस्थेचे सल्लागार सदस्य अशा पदांवर त्यांनी काम केली आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधील शाहिरी विभागात व्याख्याते म्हणूनही त्यांनी अध्यापन कार्य केले आहे.
शाहीरसम्राट बापूराव विरुपाक्ष विभूते यांचे पोवाडे त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार समारंभही झाले आहेत. कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतराव पाटील, कै. राजारामबापू पाटील आदी अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळीकतेचे संबंध होते. दिल्लीच्या एशियाडमध्ये व दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे भारतातील अनेक शहरे व ग्रामीण परिसरात त्यांना कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे.
या संपादित ग्रंथाच्या माध्यमातून मराठी भाषेतील, महाराष्ट्रातील या महान परंतु काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या शाहिराचा शारदा पुत्राचा शाहिरी साहित्यिक अंगाने परिचय करून देऊन त्यांचे अनमोल पोवाडे प्रकाशित करताना विशेष आनंद होतो आहे. सत्तर ऐशी वर्षापूर्वी रचलेल्या या रचना जीर्ण झालेल्या कागदावर उपलब्ध झाल्या आहेत. काही ठिकाणी कागद तुटल्यामुळे ओळी विसंगत झाल्या आहेत परंतु त्यांच्या कुटुंबियांकडून व्यवस्थित तपासून घेऊन संपूर्ण रचना देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही त्रुटी आढळतात त्या पुढील आवृत्यांमध्ये दूर करता येतील. कलाप्रेमी महाराष्ट्र उभं राहून दोन्ही हात जोडून नम्र पणे त्यांच्या पोवाड्यांचा स्वीकार करेल त्यातून आलेल्या विचाराचा अंगीकार करेल याबद्दल खात्री बाळगतो.
संपादक: डॉ.सयाजीराव गायकवाड 
संकलन: शाहीर अवधूत विभूते 
ज्ञानमंगल
प्रकाशन  
मूल्य -१०००/-



 

Comments