जीवनपरिचय पुस्तक संकल्पना: कलाश्री श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर : जीवन परिचय....

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बुधगाव हे सुभाष शिंदे सरांचे जन्मगाव. १२ मार्च १९६८ रोजी बुधगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत साधी आणि बेताची होती. घरात चार बहिणी आणि ते, तसेच आजी, आई आणि वडील असे एकूण आठ जणांचे कुटुंब होते. वडील दिवसभर कष्टाची कामे करीत आणि आई जनावरे सांभाळून घरातील सर्व कामकाज पार पाडत असे. पाचही भावंडे शाळेत जात असल्यामुळे घरचा खर्च भागवताना अनेक अडचणी येत असत.
कधी कधी जेवणाचीही अडचण निर्माण व्हायची. तरीही त्यांच्या आईने अपार कष्ट करून संसाराचा गाडा पुढे नेला. सर्व भावंडांना शिक्षणाची आवड होती. पुस्तकं, वह्या किंवा इतर साहित्य घेण्यासाठी पैसे नसतानाही त्यांनी कधी वडिलांकडे हट्ट केला नाही. मित्रांकडून पुस्तकं आणि वह्या मागून अभ्यास सुरू ठेवला.
शिंदे सरांच्या दोन मोठ्या बहिणी अत्यंत हुशार होत्या. शाळेतील विविध स्पर्धांमध्ये – नृत्य, गायन, वादन – त्या सहभागी होत असत. परंतु त्यासाठी लागणारी वेशभूषा किंवा साहित्य मिळत नसल्यामुळे अनेकदा त्यांना संधी मिळत नसे. हे पाहून सरांना खूप वाईट वाटत असे. घरातील सर्व भावंडांमध्ये कौशल्य होते, पण साधनांची कमतरता होती.
त्यांच्या वडिलांना हार्मोनियम वादनाचा छंद होता. ते उत्कृष्ट हार्मोनियम वाजवत आणि सुंदर गायनही करत. त्यामुळे शिंदे सरही लहानपणापासून त्यांच्या बरोबर भजनात जात असत. भजनामध्ये अभंग, गवळण तसेच विविध विषयांवरील सोंग घेऊन सोंगी भजनात ते भाग घेत असत. घरातील वातावरण धार्मिक असल्यामुळे लहानपणापासूनच हरिपाठ, भजन आणि अभंग म्हणण्याची आवड त्यांना लागली.
त्यांचे वडील दिवसभर कष्टाची कामे करून रात्री भजन करीत. इतके कष्ट करूनही त्यांनी भजनाची सेवा कधी सोडली नाही. त्यांचा आवाज अत्यंत सुरेल होता. बेसूर गायन त्यांना अजिबात आवडत नसे. काही वेळा सर सुरात चुकले तर ते रागावत असत; परंतु आज त्या गोष्टींचा विचार करता जीवनातील प्रत्येक गोष्ट शास्त्रशुद्ध आणि नीटनेटकी असावी, हा धडा त्यातून मिळाला.
शिंदे सरांना लहानपणापासूनच चित्रकलेची विशेष आवड होती. ते सतत चित्रे काढत आणि रेखाटन करत असत. मात्र त्यांच्या बहिणींना वाटत असे की त्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे आणि पुढे सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स शाखेत जावे. पण सरांनी चौथीमध्ये असतानाच ठरवले होते की पुढे जाऊन कलाशिक्षक व्हायचे.
त्या काळात समाजात चित्रकला विषयाला दुय्यम स्थान दिले जात असे. तरीही सरांच्या मनात ठाम जिद्द होती – चित्रकलेचा अभ्यास करायचा आणि कलाशिक्षकच व्हायचे. त्यांच्या या निर्णयाला सर्वांची संमती नव्हती; तरीही त्यांनी धैर्याने कलेचा अभ्यास सुरू ठेवला.
- श्रीकांत माळी, सांगली 

Comments