चित्रकार आणि रंगिवलीकार शांताराम कमते
दैनिक सकाळ , सांगली
रविवार दिनांक : ७/०४/२०२४
कलासंचित | लेख क्रमांक : १२
चित्रकार आणि रंगावलीकार शांताराम कमते
- प्रा बाळासाहेब पाटील
…........................................
चित्रकार आणि रंगावलीकार शांताराम भरमा कमते यांचा जन्म ५ एप्रिल १९२४ रोजी झाला . त्यांचे मूळ गाव गिजवणे ( ता. गडहिंग्लज , जि. कोल्हापूर ). स्वातंत्र्यपूर्व काळातील पारतंत्र्याचे चटके सहन करीत ते लहानाचे मोठे झाले . त्यांच्या मामाच्या घरी स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण असल्यामुळे बालपणातच त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे बाळकडू मिळत गेले . महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता . विशेषतः १९४२ च्या ' चले जाव ' चळवळीचा त्यांच्यावर दूरगामी परिणाम झाला . आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले . कमते यांचे अक्षरलेखन चांगले असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी चळवळीचे बोर्ड रंगवणे , पोस्टर्स चिकटविणे यासारखी कामे केली . चळवळीला पोषक ठरतील अशी व्यंगचित्रे , अर्कचित्रे रेखाटली . १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तेंव्हा कमते २३ वर्षांचे होते . तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता .
स्वातंत्र्य लढ्याचा संघर्ष संपताच ते पुन्हा चित्रकलेकडे ओढले गेले . चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले . कोल्हापुरात त्यांना चित्रकार गणपतराव वडणगेकर गुरु म्हणून लाभले . त्यानंतर चित्रकार बाबा गजबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोल्हापूरच्या टेक्निकल हायस्कूल मधून ड्रॉईंग ग्रेड परीक्षा दिली . ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी चित्रकलेतील पदविका ( जी. डी. आर्ट , पेंटिंग ) , आर्ट मास्टर्स ( ए.एम.) आणि कलानिकेतन महाविद्यालयातून कला शिक्षक पदविका ( डी.टी.सी ) संपादन केली . कोल्हापुरातील वास्तव्यात चित्रकार बाबुराव पेंटर , माधवराव बागल , रा.शी. गोसावी , माधव कृष्ण परांडेकर , महादेव विश्वनाथ धुरंदर , चांगदेव वासुदेव शिरगावकर , जी. कांबळे , चंद्रकांत मांढरे यासारख्या दिग्गज कलावंतांचा सहवास आणि त्यांची कला प्रात्यक्षिके जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली . या काळात त्यांनी निसर्गचित्रणाचा आणि व्यक्तीचित्रणाचा खूप सराव केला . चित्रकलेचा पायाभूत आणि शास्त्रशुद्ध अभ्यास असल्याने त्यांच्या चित्रणात कलेची तत्त्वे , यथादर्शन , रंग आणि रंगछटा ठळकपणे दिसतात . मूलतः त्यांचा स्वभाव काहीतरी नवं शोधण्याचा आणि रंगवण्याचा असल्याने त्यांनी अनेक माध्यमात स्वतःला सिद्ध केलं आहे . अपार कष्ट , नित्य नवे शोधण्याची धडपड आणि स्वातंत्र्य चळवळीचा व साने गुरुजींच्या वाङमयीन लेखनाचा प्रभाव यामुळे त्यांच्यातील कलावंत बहरत गेला . या काळात कमते यांनी विद्यापीठ हायस्कूल , कोल्हापूर आणि बालमोहन विद्यामंदिर , दादर , मुंबई येथे काही वर्षे कला शिक्षक म्हणून काम केले . तर सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयामध्ये १९७० ते १९८४ अशी १४ वर्षे अधिव्याख्याता म्हणून सेवा केली . त्यानंतर ते अखेर पर्यंत सांगलीतच राहिले . कमते यांचा पिंड शिक्षकाचा होता . कला निर्मिती पेक्षा कला अध्यापन करण्यात त्यांना अधिक रस होता . त्यांच्यातील शिक्षक हा प्रयोगशील , उपक्रमशील आणि सर्जनशील होता . विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल कमालीचा आदर असल्याने ते विद्यार्थी ' प्रिय शिक्षक ' होते . त्यांच्या दैनंदिन जगण्यात कमालीची शिस्त असायची . त्यांच्या स्वभाव परखड आणि मिश्किल होता . सडपातळ शरीरयष्टी आणि बेताची उंची असलेले कमते सर स्वतःच्या विश्वात मश्गुल असायचे . गुरू शर्ट , ढगळी पँट , खांद्याला शबनम आणि एका हाताने धरलेली सायकल असे . त्यांच्यासोबत नेहमी सायकल असायची मात्र त्या सायकलीवर बसलेले मी कधीच पाहिले नाही . प्रेमळ , पारदर्शी स्वभावामुळे त्यांचे कोणाशीही पटकन जमायचे . त्यांच्यातला ' माणूस ' आणि ' कलावंत ' जलरंगासारखा पारदर्शी , नितळ वाहणारा होता .
कमते सरांचा काळ हा ब्रिटिशांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या वास्तववादी शैलीच्या आकर्षणाचा होता . त्या काळात पाश्चिमात्य वास्तववादी चित्रशैली परमोच्च स्थानावर स्थिरावलेली होती . अशा काळात कमते रांगोळी या कला प्रकाराकडे वळले . आणि त्यामध्येच त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले . त्या काळात रांगोळी या कला प्रकाराला फारसे कोणी गांभीर्याने घेत नव्हते . १९४० ते १९९० अशी सुमारे ५० वर्षे त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे . आज रांगोळी मध्ये जे प्रयोग पहावयास मिळतात ते त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात करून ठेवले आहेत . वास्तविक रांगोळी ही अतिशय अल्पायुषी कला आहे . ती लोककलेचा आणि भारतीय संस्कृतिक परंपरेचा वारसा आहे . या कलेचा संबंध थेट चित्रकलेशी येतो . तिचं माध्यम भिन्न आहे म्हणूनच ती दृश्यकलेत स्वतःचे वेगळेपण जपून आहे . कमते यांच्या रांगोळीने पंडित नेहरू , इंदिरा गांधी , यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राज कपूर , व्ही. शांताराम अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्याकाळी भूल घातली आहे . ' झनक झनक पायल बाजे ' या चित्रपटाच्या टायटल्स साठी कमते यांच्या रांगोळीने धमाल केली आहे . त्या काळात त्यांना ' रंगावली विशारद ' म्हणून ओळखले जायचे . सांगलीच्या कलापुष्प संस्थेने १९९९ मध्ये राज्याचे तत्कालीन कला संचालक श्री मुरलीधर नांगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला होता .
कमते यांचे व्यक्तिचित्रण उत्कृष्ट होते . त्या काळात त्यांनी कमिशन वर्क करिता विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींची पोर्ट्रेट साकारली आहेत . त्यांची अनेक तैल चित्रे मुंबईच्या बालमोहन विद्या मंदिरातील सभागृहात विराजमान आहेत . गुरुवार दिनांक २ एप्रिल २००९ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे सांगलीत निधन झाले .
( लेखक दृश्य कलेचे अभ्यासक , प्राध्यापक आणि चित्रकार आहेत . )
🔹
Comments
Post a Comment