श्यामची आई काव्यामृत ..

"श्यामच्या आईचे काव्यामृत" संस्कारधन जपणारा काव्यानुवाद- श्री.रमेश मोहिते. मुख्याध्यापक संत नामदेव नूतन मराठी ज्ञान प्रबोधिनी तासगाव.
 आजच्या मोबाईलच्या गतिमान जगात माणसं एकमेकांच्या खूप जवळ आली आहेत आणि तेवढीच दुरावली पण आहेत. माणसांच्या मोठेपणाचे निकष बदलत आहेत.आईची जागा मम्मीने घेतली आहे.नाती कोरडी होत आहेत. चारित्र्य,नैतिकता आणि संवेदनशीलता अशी जगण्याची मूल्ये हरवत आहेत.प्रामाणिकपणा दुर्मिळ होतो आहे.
 समाज व्यवस्थेत शिक्षण व्यवस्था खूपच महत्त्वाची आहे.या शिक्षणातून आज ध्येयवाद हरवत आहे. गुणांचे डोंगर बालकांच्या हाती येत आहेत पण सुसंस्कार होत नाहीत. बुद्ध्यांक वाढतो आहे पण भावांक विकसित होत नाही. संवेदनशीलता जीवन सुंदर करण्याचा पाया मानला जातो. पण हा पायाच भुसभुशीत झाला आहे.मग बालकांचे आणि पालकांचे जगणे कसे सुंदर म्हणायचे?२१व्या शतकात युवकांचे जगणे भरकटत चालले आहे.जगण्यातला प्रेमळपणा आटतो की काय?असे वातावरण
 चोहोबाजूला आहे.
 अशा अंधार वाटेवर आपण चाचपडतो आहोत.या वाटेवरचा लखलखित संस्कार दीप म्हणजे महाराष्ट्र माऊली साने गुरुजी होत.गुरुजींची वाणी आणि लेखणी म्हणजे संस्काराचा प्रेमळ झराच.गुरुजींनी आयुष्यभर बलसागर भारताचा ध्यास घेतला. लेखणी मुलांसाठी लिहीती ठेवली.मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र, संस्काराचा अमृतकुंभ,प्रेमज्ञान आणि बळ ही जीवनाची शाश्वत संस्कार,मूल्ये रुजवणारे गुरुजींनी लिहिलेले विश्वकल्याणाचा ध्यास घेतलेले पुस्तक म्हणजे "श्यामची आई". ज्ञानेश्वरी प्रमाणे गुरुजींची ही सानेश्वरी!समाजाला जगण्याचे  पावित्र्य दाखवणारे मंगलगान! घर आणि नाती जपणारा रसाळग्रंथ!आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरं श्यामची आई देते आहे.
 श्यामची आई या पुस्तकातील सर्व कथा गुरुजींनी डोळ्यांतील अश्रूमध्ये लेखणी भिजवून लिहिल्या आहेत.या सर्व कथांचा काव्यानुवाद माझे स्नेही,उपक्रमशील शिक्षक,संत नामदेव नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि एक संवेदनशील कवी श्री. रमेश मोहिते सर यांनी अतिशय सुंदर केला आहे. या पुस्तकातील सर्व ४२ कथा मोहिते सरांनी काव्यबद्ध केल्या आहेत. एका बैठकीमध्ये या सर्व कविता वाचून होत आहेत त्यामुळे श्यामची आई कादंबरी पूर्णपणे वाचल्याचा एक आत्मिक आनंद आणि समाधान मिळते आहे.
 प्रत्येक कथेचा काव्यानुवाद करतेवेळी श्री रमेश मोहिते सरांनी त्या कथेचे संस्कार व आशय प्रयत्नपूर्वक जपला आहे.कथेचा मुख्य धागा जपला आहे.त्यामुळे प्रत्येक कविता वाचताना ती कथा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते आहे. श्री रमेश मोहिते सरांचा शब्दशंचय  समृद्ध आहे त्यामुळे त्यांनी विद्यार्थी घटक केंद्रस्थानी मानून काव्यांनुवाद केलेला दिसून येत आहे. सोपे,अर्थपूर्ण शब्द वापरलेले आहेत.मोहिते सर मातृहृदयी आहेत हे काव्यांनुवाद  वाचतेवेळी प्रकर्षाने जाणवते आहे पहिल्याच सावित्री व्रत या कथेतील संस्कार सांगताना मोहिते सर काव्यांनुवादात लिहितात, "पाप करण्याची धरावी रे लाज || 
देवाच्या कामाची कसली रे लाज"||
 अशाच अळणी भाजी या कथेच्या अनुवादातील खालील दोन ओळी आपल्या हृदयास भेटतात.
 "स्वयंपाक्याचे मन कधी न काही बोलून दुखवावे || अळणी,तिखट,खारट, आंबट सारेच गोड मानावे|| तसेच या संग्रहातील स्वावलंबनाची शिकवण,भूतदया, तीर्थयात्रार्थ पलायन, मुकी फुले,सावित्री व्रत, स्वाभिमान रक्षण,भस्ममय मूर्ती आनंदाची दिवाळी, सारी प्रेमाने नांदा,आईचा शेवटचा आजार,अब्रूचे धिंडवडे,तेल आहे तर... गरिबांचे मनोरथ, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक.... ,तू वयाने मोठा नाहीस,सांब सदाशिव पाऊस दे..उदार पितृहृदय अशा कथाचा अनुवाद अतिशय वाचनीय,भावुकपणे मोहिते सरांनी केला आहे. 'शेवटची निरवानिरव'कथा ४०वी या कथेचा काव्यानुवाद तर सरांनी खूपच चांगला केलेला आहे. कवितेच्या शेवटी तुकोबारायांचा अभंग वापरून भाव अधिक स्पष्ट केला आहे. कथा ४२ वी "आईचे स्मृतीश्राद्ध" या कथेचा काव्यांनुवाद ही असाच सुंदर आशय जपणारा झाला आहे.   
"भारतभू चे निशाण आता 
घेतो माझ्या खांद्यावरी || आईच्या स्मृतीश्राद्धाचे लेतो गोंदन हृदयावरी||
 या ओळी श्यामच्या आईचे राष्ट्रभक्तीचे संस्कार उत्तमपणे दर्शवितात.ही कविता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते.
 श्री रमेश मोहिते सरांनी अतिशय परिश्रमपूर्वक, अभ्यासपूर्वक हा काव्यांनुवाद केला आहे. काव्यांनुवाद करताना कथेतील भाव,संस्कार, आशय,प्रसंग जपले आहेत.हा काव्यानुवाद श्रेष्ठ असा भावानुवाद ही आहे. प्रासादिकता हा काव्याचा ओजस गुण आहे.सर्व काव्यांनुवाद  प्रासादिक,रसाळ व प्रेममय आहे. मोहिते सर बाळांना प्रेमाने जवळ घेऊन श्यामच्या आईच्या कथा मातृहृदयाने कथन करीत आहेत असा भाव हा प्रसंग वाचताना होतो आहे.कथांची शीर्षके हीच कवितांची शीर्षके जशीच्या तशीच ठेवलेली आहेत.
 थोड्याच दिवसांमध्ये त्यांचे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.महाराष्ट्राच्या शाळांशाळा मधून हे पुस्तक वाचले जावे. विद्यार्थी,शिक्षक व पालकांच्या हाती जावे. सर्वांनी या  कविता वाचाव्यात.शाळेच्या परिपाठाच्या वेळी रोज एक कविता वाचून दाखवावी.परिश्रमपूर्वक चाल लावून विद्यार्थ्यांनी या कवितांचे गायन ही करावे."श्यामची आई" या पुस्तकातील संस्कार धन हा काव्यांनुवाद सर्व शिक्षक,पालकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. 
 श्री रमेश मोहिते सरांनी संवेदनशीलपणे परिश्रमपूर्वक काव्य अनुवाद करून हा काव्यसंग्रह साकारला आहे.या "श्यामच्या आईच्या काव्यामृताचे" सर्वजण स्वागत करतील याची खात्री आहे.श्री रमेश मोहिते सरांना मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा!! 
सुभाष कवडे 
बालसाहित्यिक
 भिलवडी.
मोबा.९६६५२२१८२२.

Comments