साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती
साने गुरुजी शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती
रूढी विरुद्ध बंडाचे झेंडे घेऊन उभे राहतील ते मानव जातीचे उपकारकर्ते होतील असे एके ठिकाणी व्हॉल्टेयर म्हणतो. म्हणूनच साने गुरुजी सारख्या संत साहित्यिकाने सर्व बुरसटलेल्या रूढीवर हल्ले चढवायला उभे रहा असे आवाहन शंभर वर्षांपूर्वी केले होते. आपल्याला सरंजामशाही नको, जमीनदारी नको, खोती नको,पिळवणूक नको,खाजगी नफेबाजी नको, कोणाची मिरासदारी नको यासाठी लेखणी हातात घेऊन उभे रहा अशी हाक देणारे साहित्यिक लढाऊ क्रांतिकारक म्हणजे साने गुरुजी. खरंतर साहित्यिक म्हणजे सहानुभूतीचा सागर.साने गुरुजींनी सांगितले निसर्गावर प्रेम करा. निसर्ग आपली माता आहे. वादळात फिरायला जा. उंच डोंगरावर चढा. दरयात उतरा प्रत्येक गोष्ट बोलताना विवेकाचा ब्रेक लावा. लिहिताना विवेकाचा ब्रेक लावा. तुम्ही जे लिहाल त्यातून जनतेच्या मनोबुद्धीला वळण मिळेल असे लिहा. लिहिलेला अथवा बोललेला प्रत्येक शब्द पेरणी असतो म्हणून वेडे वाकडे लिहिले तर आपला खेळ होईल आणि राष्ट्राचा प्राण जाईल.असा सल्ला लिहिणाराला देऊन ते म्हणतात की तुम्हाला अमृत देता येत नसेल तर दूध द्या. तेही जमलं नाही तर निर्मळ जीवन द्या.जनतेचे हृदय हलवून त्यांच्या बुद्धीला धक्के देऊन क्रांती करायची असते हे सांगणारे साने गुरुजी भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये आपली शिक्षकी पेशाची नोकरी सोडून महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये उतरले.त्यांनी लोकांना आवाहन केलं की धगधगीत आगीचे आणि स्फूर्तीचे पुतळे बनून प्रत्येक कार्यक्षेत्रात क्रांती घडवून आणा. अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्र्य युद्ध अशा बहुविधक्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे या महाराष्ट्रातील आदर्श व्यक्तिमत्व साने गुरुजींनी मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले व अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, समाजामध्ये एकता निर्माण व्हावी, शेतकरी कामकरी कष्टकऱ्यांचे दुःख दैन्य दारिद्र्य दूर व्हावे आणि सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या उदात्त हेतूने आयुष्यभर जनजागृती करणारे आणि जनलढ्यात स्वतःला झोकून देणारे साने गुरुजींनी सर्वांसाठी अत्यंत संस्कारक्षम साहित्य निर्माण केले.पांडुरंग सदाशिव साने हे व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पालघरला आजपासून एकशे पंचवीस वर्षांपूर्वी 24 डिसेंबर 1899 ला जन्माला आलं आणि आयुष्याच्या केवळ पन्नास वर्षात 73 पुस्तके लिहून, स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करून, तुरुंगवास भोगून, राष्ट्रसेवा दलाच्या स्थापनेत पुढाकार घेऊन, आंतरभारती ची स्थापना करण्याचा विचार करून, बोले तैसा चाले हे तत्व जीवनात अंगीकारुन सर्वत्र लौकिकात पात्र ठरलं..विद्यार्थी मासिक काढणारे साने गुरुजी, आणि काँग्रेस हे साप्ताहिक सुरू करणारे साने गुरुजी,साधना साप्ताहिक सुरू करणारे साने गुरुजी यांच्या वरती महात्मा गांधींच्या राजकीय विचारांचा सर्वात मोठा प्रभाव होता. धुळेच्या तुरुंगात असताना विनोबा भावे यांचा सहवास गुरुजींना लाभला व तुरुंगामध्ये विनोबा भावे यांनी गीता या ग्रंथावर दिलेली प्रवचन गुरुजीनी लिहून काढली. त्याचेच पुढे 'गीता प्रवचने' हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि भारतातील अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली. 1936 साली जळगाव जिल्ह्यात फैजपूर या खेडेगावात राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातले अधिवेशन भरलं ते यशस्वी व्हावं म्हणून साने गुरुजीनी अपार कष्ट घेतले. याच जळगाव जिल्ह्यात,खानदेशात दुष्काळ पडला. शेतकऱ्यांची पिकं बुडाली.म्हणून शेतकऱ्यांचा सारा माफ करावा ही मागणी घेऊन गुरुजींनी जळगावला शेतकरी परिषद भरवली. गुरुजी नेहमी लोकांच्या मध्ये फिरायचे संवाद साधायचे. साने गुरुजींनी खेडोपाडी फिरून स्त्रियांच्या तोंडी असणाऱ्या अनेक ओव्यांचे संकलन केले आणि पत्री हा पहिला काव्यसंग्रह छापला. पण ब्रिटिश सरकारने तो जप्त केला. कारण पत्री या काव्यसंग्रहात असणारी "बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो"या कवितेचा असलेला समावेश आणि जनमानसात पडणारा त्याचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा काव्यसंग्रहच सरकारने जप्त केला. साने गुरुजींनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्रिचनापल्ली धुळे नाशिक अशा वेगवेगळ्या तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगलेला आहे. 1946 साली पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर हरिजनांना खुले करावे म्हणून प्राणांतिक उपोषण करणारा साने गुरुजी सारखा महामानव मंदिर हरिजनांना खुले झाल्यानंतरच स्वस्थ बसला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली त्यांनी राष्ट्रीय सभेतून अर्थात काँग्रेस मधून बाहेर पडून समाजवादी पक्षात प्रवेश केला.त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापन दिली म्हणजे 15 ऑगस्ट 1948 ला साधना साप्ताहिक सुरू केलं. त्या पहिल्या साप्ताहिकात संपादकीय लिहिताना पहिले वाक्य साने गुरुजींनी लिहिलेले आहे की वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर 'साधना' आपणास करावयाची आहे. हे 'साधना' साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे. (त्या अंकाचा सोबत फोटो टाकतोय ते पहा)साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई कादंबरी लिहिली ज्या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. त्याला राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला. आचार्य अत्रे एके ठिकाणी म्हणतात की मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी, अमृताचे पुत्र म्हणजे साने गुरुजी. एक गांधीवादी शिक्षक,उत्कृष्ट समाज सुधारक, आणि प्रतिभावंत लेखक साने गुरुजी हे नेहमी खादीचे कपडे वापरत असत. बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण अशी आर्त हाक आपल्या कवनातून देत समाजातील अन्याय,विषमता,जातीभेद, अस्पृश्यता ,अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करत राहिले. आंतरभारती सारख्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. या देशातील विविध राज्यातील संस्कृती आणि भाषा समजून घेतली पाहिजे म्हणून ते स्वतः मराठी शिवाय हिंदी इंग्रजी तमिळ आणि बंगाली भाषा शिकले. मानवतावाद सामाजिक सुधारणा आणि देशभक्ती ही मूल्ये साहित्यातून पेरणाऱ्या हा महान साहित्यिकाच्या नावावर 73 पुस्तके आहेत. अशा या महान साहित्यिकाने, लढवय्या क्रांतिकारकाने, समाज सुधारकाने 11 जून 1950 ला अखेरचा श्वास घेतला. जो करी मनोरंजन मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या तत्त्वाने मुलांच्यासाठी तरुणांच्यासाठी अनेक संस्कारक्षम पुस्तके साने गुरुजींनी लिहिली.त्यातील श्यामची आई हे पुस्तक तर साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे. अशा या गांधीवादी शिक्षकास महाराष्ट्रातील अग्रगण्य समाज सुधारकास आणि प्रतिभावंत लेखकास जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏
Comments
Post a Comment