दि फ्रेंडस् असोसिएशन, जत संस्थेचे राज्यात आदर्श काम!



दि फ्रेंड्स असोसिएशनने विद्यार्थी घडविले..!
पालकमंत्री सुरेश खाडे :  
फ्रेंड्स असोसिएशनचा सुवर्ण महोत्सव : शिक्षण, संस्कार आणि स्मृतींचा अविस्मरणीय सोहळा
जत, ता. २७ : दि फ्रेंड्स असोसिएशन, जत आणि जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुवर्ण महोत्सव सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले,
"दि फ्रेंड्स असोसिएशनने गेल्या अनेक दशकांत हजारो विद्यार्थी घडविले आहेत. निष्कलंक, गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम संस्था म्हणून तिने तालुक्यात मानाचे स्थान निर्माण केले आहे. शिक्षकांचे समर्पित कार्य आणि पालकांचा विश्वास हीच संस्थेच्या यशाची खरी ताकद आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना घडविण्याचे व्रत या संस्थेने सातत्याने जपले आहे."
या सुवर्ण महोत्सव प्रसंगी 'सुवर्ण मुद्रा' स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समारंभास खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, तम्मनगौडा रविपाटील, मारुती पवार, आप्पासाहेब सरगर, अन्सार शेख, डॉ. मदन बोर्गीकर, डॉ. एस. वाय. तंगडी, डॉ. चंद्रशेखर हिट्टी, देवेंद्र पोतदार, बाळेशा मंगसुळी, डॉ. श्रीशैल कन्नुरे, संभाजी माळी, गुरुनाथ बिज्जरगी, चनवसू तंगडी तसेच मुख्याध्यापक श्री. अजितकुमार होवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार संजय पाटील यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत, दि फ्रेंड्स असोसिएशननेही समाजात शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवत ध्येयवादी आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य पुढेही सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, संस्थेच्या उभारणीत पहिल्या आणि दुसऱ्या पिढीचे मोलाचे योगदान आहे. या परंपरेचा वारसा जपत संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.
समारंभाच्या प्रारंभी डॉ. मदन बोर्गीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
'फ्रेंड्स स्मृती छायाचित्र प्रदर्शन' ठरले विशेष आकर्षण
सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित 'फ्रेंड्स स्मृती छायाचित्र प्रदर्शन' हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनाची संकल्पना, नियोजन व सादरीकरण विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. सुभाष सदाशिव शिंदे यांनी केले. प्रदर्शनामध्ये संस्थेच्या पन्नास वर्षांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक आणि विविध उपक्रमांचा इतिहास जपणारी एक हजारहून अधिक दुर्मीळ छायाचित्रे आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती.
याप्रसंगी आमदार मा. श्री. विक्रमसिंह सावंत, संस्थेचे सचिव डॉ. एस. वाय. तंगडी, व्हाइस चेअरमन डॉ. मदन बोर्गीकर आणि मुख्याध्यापक श्री. ए. बी. होवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जत शहरातील नागरिक, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने प्रदर्शनाला भेट देऊन संस्थेच्या सुवर्णमय वाटचालीचा अनुभव घेतला. या प्रदर्शनाने संस्थेच्या समृद्ध इतिहासाला उजाळा देत उपस्थितांच्या मनात अभिमान आणि कृतज्ञतेची भावना जागवली.
सुवर्ण महोत्सव हा केवळ उत्सव नव्हता; तो संस्थेच्या पन्नास वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचा, संस्कारांचा आणि समाजसेवेच्या अविरत प्रवासाचा प्रेरणादायी सोहळा ठरला.

Comments