श्री.अंबाबाई डोंगर,जत.

दोन शब्द संपादकीय
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ll
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोsस्तुते ll
           जत नवरात्र उत्सव म्हणजे जतकरांचा एक महोत्सव असल्यासारखेच आहे. जतचे पूर्वी 'जयंती नगरी' असे नाव होते. रामायण महाभारत काळापासून येथे संदर्भ सांगितला जातो. जतला छ.श्री शिवाजी महाराज विजापूर ला जाताना त्यांचा पद स्पर्श झाला आहे, समर्थ रामदासांचा पद स्पर्श झाला आहे, छ.संभाजी महाराजांचा सुद्धा पद स्पर्श झाला आहे. संत तुकडोजी महाराज, सोनपंत दांडेकर, १०८ हरिहरजी महाराज, मुकुंदराव करंदीकर, अमलानंद महाराज, माता विद्यादेवी, करवीर श्री शंकराचार्य, परम पूज्य सिध्देश्वर स्वामीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी सर्व प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागत असूनही एक उच्च नैतिकतेची पातळी कायम टिकवून आहे! बाराही महिने येथे कुठे ना कुठे आध्यात्मिक सेवा सुरूच असते! जयंती नगरीच्या नैऋत्य दिशेला डोंगरावर विराजमान श्री आंबा माता, गावावर आपली कृपा कायम ठेवून अमंगला पासून दूर ठेवून या नगरीचे सदैव रक्षण करीत असते. म्हणूनच तिचा 'सर्वमंगल मांगल्ये' असा गौरव येथे साकारलेला दिसतो आहे. महाराष्ट्रात चालणारी देवी मातेची नवरात्र शक्ती उपासना, ही परंपरेने फार पुरातन काळापासून चालू झालेली आहे. तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई, नाशिक जवळ सप्तशृंगी, माहूरची रेणुका आणि मुंबईची मुंबादेवी, आणि या आमच्या जयंती नगरीची अंबाबाई ! या साऱ्या गावोगावच्या संरक्षण देवता ! यांची यात्रा ही सारी सांस्कृतीक जीवनातील शक्ती केंद्रे आहेत. आताची परिस्थिती पूर्वी नव्हती! मात्र डोंगरावरची ही देवी पूर्वीपासून तिथे वास करत होती. घरी नवरात्र बसले की देवीला जाण्याची प्रथा फार पूर्वीची! पण तिचे पुनर्जीवन करावे, एखादे मंदिर बांधावे, सेवा मंडळ तयार करावे, इथे पाण्याची सोय करावी, पायऱ्या बांधाव्यात, याबाबत तिथे सोय करावी, हा परिसर झाडे लावून नटवावा असे स्वप्न काही तरुण मंडळींनी पाहिले! आणि मग श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना झाली. शासन दरबारी कोणतीही मागणी न करता जतकऱ्यांच्या विश्वासावर, श्रमदानावर व त्यांनी दिलेल्या वर्गणीतून हे मंडळ उभे राहिले. या गावाच्या ग्रामदेवतेचा नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमा यात्रा ही पन्नास वर्षापासून सुरू झाली.
               नवरात्राच्या वेळी या ठिकाणी एक वेगळाच अनुभव आनंद प्रत्येकाला लाभतो. केवळ एकदा जरी येथे आपण जाऊन आलो तरी वेगळे समाधान प्राप्त होईल!
डोंगराच्या चारी बाजूला फॉरेस्ट खात्याने लावलेली झाडे आहेत. परिसर अतिशय निसर्ग रम्य झाला आहे. नवरात्रीच्या कालावधीत तर नवचैतन्य भरलेले असते. प्रत्येकजण प्रेमाने व आनंदाने सामील होत असतो. नवरात्रात बरोबर ठराविक साडेसात वाजता वेळीच सुरू होणारी पंचारती व जोगवा असतो. त्यावेळी हजेरी लावणारे अनेक भाविक आता तयार झाले आहेत. काही वेळा तर संपूर्ण परिसर हा भरून जातो. यामध्ये बाल, तरुण, स्त्रिया वृद्ध, सर्वांचीच हजेरी लावण्यासाठी एक रेलचेल चालू असते. अतिशय गंभीर आवाजात असणारे ते मंत्र सुरू झाले की सर्वजण मंत्रमुग्ध होतात! सर्व भक्तांना केळी, साखर- खोबरे यांचा प्रसाद मिळतो. देवालयातील स्वच्छता, विद्युत रोषणाई, रंग -रंगोटी, पताका यांनी जतकरांची मनं भारांवून जातात. रोजच पुन्हा-पुन्हा असा अनुभव घ्यावा असे प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहत नाही. श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ हे दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम राबवतच असते. एखाद्या मंडळाच्या आयुष्यातील पन्नास वर्षाचा कालखंड हा कार्यकर्त्यांना आनंदित करणाराच असतो. या आनंदाची वाटचाल पुढील अनेक वाढत्या जबाबदाऱ्यांची जाणीव देते, त्या पूर्ण करण्यासाठी विश्वासही देते. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भविष्यात काही आव्हाने पण असणार आहेत, याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांना आहे.
            गर्दीवर नियंत्रण व स्वच्छता यांचा संगम विशेषता कोठेही आढळला नसेल पण या ठिकाणी मात्र या दोन्ही गोष्टी बाबत कार्यकर्ते फारच दक्ष असतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला देवस्थानात जाऊन आल्याचे समाधान प्राप्त होते.
प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचा परिणाम हा मानवी मनावर होत असतो. पण त्यालाही काही पूर्वसंस्कार, पूर्वसंगती लागत असते. मंदिराच्या गाभाऱ्यात आपण मेणबत्ती लावल्या तर कसे दिसेल? मेणबत्ती प्रकाश देते पण समईच्या शांत प्रकाशाचा आपल्या मनावर काही संस्कार होतो, निरंजनाची तेवणारी ज्योत आपणास मनःशांती देते, या संस्कारांची अनुभूती श्री अंबाबाई डोंगरास एक दिवस भेट दिली तरी याची प्रचिती नक्की येते!
                 आलीकडील काळात पर्यटन विकास निधीच्या माध्यमातुन व वनविभागाचे माध्यमातुन विकास कामे झाली आहेत. तसेच भक्तांकडुन आर्थिक मदतीचा, अन्नदानासाठी लागणाऱ्या साहित्याच्या मदतीचा ओघ सर्वच स्तरांमधून वाढतोय. त्यामुळे अनेक सेवा मंडळास करता आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मंगल कार्यालय उभा राहिले, मंदिरा समोर सभामंडप तयार झाला, कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन सुरू करता, आले, तसेच संपूर्ण वर्षभर पौर्णिमा अभिषेक व प्रसाद नंतर कार्तिक पौर्णिमा, दीपोत्सव, देव दीपावली, मकरसंक्रांत, गणेश जयंती, दत्तजयंती, शिवरात्र, गुढी पाडव्याचा पहाटेचा भक्ती संगीताचा कार्यक्रम वसंत उत्सव, नवरात्र उत्सव, हे सारे सण मंडळास उत्साहाने साजरे करणे शक्य झाले.
               पुढील मंदीरातील नवीन मूर्ती बसवल्यानंतर काही नियम, काही समित्या बनविल्या. प्रत्येक समितीची जबाबदारी मंडळाने ठरवली. त्यामध्ये प्रामुख्याने पूजा समिती, बांधकाम समिती, अर्थं समितीमध्ये रंगकाम समिती, सांस्कृतिक समिती, विद्युत रोषणाई, महाप्रसाद समिती, छापाई समिती, स्वच्छता समिती, नियोजन समिती, सांस्कृतिक समिती, अलंकार समिती इ. समितींच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाच्या आधी पंधरा दिवस नियोजन बैठक बोलावली जाते आणि तिथून या नवरात्र उत्सवाच्या लगबगीला सुरुवात होते.
             पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला प्रारंभ म्हणून घटस्थापना व अखंड दिप प्रज्वलन होते. पहिला दिवसाचा मान हा कै. श्रीमंत अनिल राजे डफळे घराण्याकडे आहे. विजयादशमी दिवशी श्रीमंत श्री. इंद्रजितराजे डफळे यांचा हा मान असतो. त्याचबरोबर अष्टमी व कोजागिरी पौर्णिमे दिवशी श्रीमंत सुनेत्रा राजे डफळे यांचा मान असतो. तसेच भक्तगणामध्ये सुद्धा पहिल्या दिवशीची ओटी श्री. सुरेश मोगली यांच्यातर्फे असते. विजयादशमी दिवशी रेवणसिध्द मोगली साडीचोळी देतात. आणि कोजागिरीला कै. राजन जाधव परिवार यांच्यातर्फे! या कोजागिरी पौर्णिमे दिवशी दुपारच्या महा नैवेद्याचा मान हा  कै. आनंदराव माने पाटील कुटुंबीयांचा आहे.
          जतमधील सर्वांचे सहकार्य लाभते. सभासद, भक्तगण, सेवेकरी, उदार देणगीदार, या स्मरणिका प्रकाशनास लाभलेले जाहिरातदार,हितचितंक तसेच  वनविभाग, नगर परिषद, पोलीस विभाग, विद्युत मंडळ, राज्य परिवहन मंडळ व शासकीय यंत्रणा यांचे विशेष सहकार्य लाभते! या सर्वांचे मनापासून आभार !
 
ही स्मरणिका करत असताना श्री अनिल देशपांडे यांनी माहिती संकलन करून लेखन केले. त्यास डॉ.श्री श्रीपाद जोशी सर व सौ.साधना हुल्याळकर यांचे मार्गदर्शन लाभले.  श्री नितीन एकूंडे व अमर जाधव तात्रिक सहकार्य लाभले.जाहिरात संकलनासाठी श्री भारत गायकवाड व श्री अजित शिंदे प्रयत्न केले  कै.आशोक दादा चे पाठीमागे श्री सुजय उर्फ नाना शिंदे यांनी या  स्मरणिकचे प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी घेतली  त्यांचे सुद्धा आभार!
सर्व भक्तांना 
या सुवर्ण मोहत्सवी वर्षा निमित्त हार्दिक शुभेछा!!
संपादक 
श्री रामचंद्र बाबुराव भोसले 
दिनांक २२/१०/२०२३

जतचा पुरातन इतिहास
             जत ही पूर्वाश्रमीची जयंती नगरी होय. या नगरीचा रामायण महाभारत काळापासून संदर्भ सांगितला जातो; इतका प्राचीन इतिहास जतचा आहे. असे अनेक पुरावे यासंदर्भात उपलब्ध आहेत. त्यामुळे जत नगरीला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. रामायण, महाभारत काळातील अनेक पुरावे उपलब्ध आहेत. रामायण काळातील म्हणावे तर, प्रभू श्रीराम वनवासात असताना माता सीतेचे हरण झाल्यानंतर, प्रभू श्रीराम व बंधू लक्ष्मण शोध घेत घेत लंकेकडे निघाले होते. यावेळी अनेक आरण्ये लागली. त्यातून जाताना वाट चुकू नये म्हणून वाटेवरून जाताना काही खुणा ते करत असत. तेव्हा वाटेवरून जात असताना ठिकठिकाणी महादेवाची लिंगे स्थापन केली होती. त्यातील एक म्हणजे रामतीर्थ! श्रीरामाने या ठिकाणी महादेवाचे लिंग स्थापन करून, तिथे तीर्थकुंडाचे उत्खलन केले व तीर्थ प्राशन केले. या ठिकाणाला रामतीर्थ म्हणून  संबोधले जाते. सध्या हे ठिकाण कर्नाटक मध्ये अथणी तालुक्यात आहे. हा संदर्भ जतचे रामायणकालीन वास्तव सांगतो.
         महाभारतातील संदर्भ तर अनेक आहेत. ज्या शहराचे पूर्वीचे नाव जयंती असे होते, तिथेच असताना भीमाने बकासुराचा वध केला होता. पूर्वी अशी एक प्रथा होती की, एखाद्या भयंकर असूराचा वध केल्यानंतर प्रायश्चित्त म्हणून त्याच्या नावाने श्री शंकराचे लिंग स्थापन करून प्रार्थना करायची. यानुसार भीमाने हे लिंग स्थापन केले. त्या मंदिराचे नाव बकासुराच्या नावानेच
श्री बंकेश्वर असे पडले. या मंदिरातील महादेवाची पिंड ही भीमाला शोभेल अशीच महाकाय आहे. असे मंदिर फक्त जतमध्येच पहायला मिळते. आज ते जतचे ग्राम दैवत 'श्री बंकेश्वर' म्हणून ओळखले जाते.
जतचा शिवकालीन इतिहास
       छत्रपती श्री.शिवाजी महाराजांची इच्छा आणि निर्धार होता की विजापूर जिंकायचे आणि आदिलशाही नष्ट करायची. केवळ आदिलशाहीच नव्हे तर मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही पण संपवायची. यासाठीच महाराज बळ वाढवीत होते .
         विजापूरची आदिलशाही मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांना शह देणारा असा माणूस शोधत होती. तेव्हा त्यांना 'अब्दुल करीम बोहलोल खान' दिसला. यावेळी महाराजांच्या फौजा सातारा प्रांतावर चढाई करीत होत्या. बोहलोल खान थोड्या फौजेनिशी उमराणी कडून चढाई करण्यासाठी येत होता . त्याचा बंदोबस्त जत तालुक्यातील उमराणी जवळच करण्याचे ठरले. सरसेनापती प्रताप गुजर आणि सर्वांना तो विचार पटला. महाराजांनी लगेच प्रतापराव गुजर यांना विडा दिला. प्रतापराव गुजर हे उमराणी जवळ अगदी गुपचूप येऊन पोहोचले. खानाला काहीही त्याची कल्पना नव्हती. ते दिवस उन्हाळ्याचे होते. खानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला पिण्यासाठी लागणारे पाणी उमराणी मध्ये फक्त एका मोठ्या जलाशयात होते. ते पाणीच काबीज केले. त्यामुळे खानाच्या सैनिकांची तारांबळ उडाली त्यातच खानाच्या फौजेतला एक हत्ती एकाएकी बिथरला, त्याला ज्या साखळी दंडाने बांधले होते, त्या साखळदंडासह तो उलट दिशेने त्यांच्या सैनिकावर चालून गेला. पाण्याने व्याकुळ झालेले पठाण सैनिक, हत्ती, घोडे पाण्यासाठी रणरण करत होते. खान पाण्याविना कासावीस झाला. पाण्याचा थेंब ही मिळेना! खानाला पाणी मिळत होते ते फक्त मराठ्यांच्या तलवारीचे! खानाने भविष्य ओळखून, 'मी शरण आलो आहे', असा निरोप घेवून वकील पाठीवला. 'मी छ. शिवाजीराजांशी पुन्हा दावा करणार नाही', असा त्याने तह केला. प्रतापरावांना खानाची दया आली. स्वराज्याकडे वाकडी नजर करणार नाही, अशी खात्री झाल्यानंतर त्यांनी उदार मनाने बोहलोल खानास सोडून दिले. तो दिवस होता १५ एप्रिल १६७३ चा. त्याला सोडून दिले ही बातमी ऐकून महाराज भयंकर रागावले. महाराजांनी ताबडतोब प्रतापराव गुजर यांना कडकडीत पत्र पाठवले. "खानास गाठून ठार मारा किंवा ताब्यात घेऊन स्वारी फत्ते करा! नाहीतर तोंड दाखवु नका !" अशा आशयाचे हे पत्र होते. महाराजांचे हे पत्र प्रतापराव गुजरांच्या अतिशय जिव्हारी लागले. तेव्हा त्यांनी एकच पण केला की आता महाराजांना तोंड दाखवायचे, ते बोहलोल खानास पकडूनच!
                 राज्याभिषेकांपूर्वी बोहलोल खानास जर उडवला नाही तर, राज्यभिषेक घटना प्रसंगी महाराजांना प्रतापरावांचा मानाचा पहिला मुजरा घडणे अशक्य होते. माघ चतुर्दशी दिनांक २४‍ फेब्रुवारी १६७४ शिवरात्रीच्या दिवशी प्रतापराव आपल्या छावणी पासून दूर असताना त्यांना खबर आली की, बोहलोल खान फौज घेऊन नेसरी कडून येत आहे. खानाचे नाव ऐकल्यावर प्रतापराव बेभान झाले. आज बोहलोल याला गर्दीत मिळवल्याशिवाय महाराजांना मुजरा नाही! प्रतापराव देहभान विसरले आणि ते एकदम बेहोषपणे घोड्यावर स्वार झाले. त्यांच्या मागोमाग त्यांचे सहा सैनिक सुटले. बोहलोल खान पठाणावर हे सातही जण तुटून पडले. जे त्यांच्या तडाख्यात सापडले, ते मेलेच! विजेसारखी त्यांची हत्यारे फिरू लागली. पठाणाच्या एवढ्या प्रचंड फौजेत अवघे सात! पठाणांचे घाव सातावर कोसळत होते. नेसरीची खिंड रक्ताने शिंपडून निघाली. शत्रूचा गराडा या सातावर भोवऱ्यासारखा पडला. इतक्या विरुद्ध परिस्थितीत हे सात किती वेळ टिकतील? एक एक मोहरा धरणीवर कोसळू लागला. शर्थीचे समशेर करून अखेर प्रतापराव ही ठार झाले. दख्खनचे सात तारे तुटले. महाराजांना त्यानी अखेराचा मुजरा केला तो स्वराज्याच्या यज्ञ कुंडात स्वता: च्या प्राणांची आहुती देऊन!
म्हणूनच म्हटले आहे-म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात l
जत संस्थानाचा इतिहास
          आपल्या जतच्या डफळे संस्थानाचा इतिहास खूप अतुलनीय आहे; शौर्याने व पराक्रमाने भरलेला आहे. शिवपूर्व काळात व मराठीशाहीत दरारा निर्माण करण्याऱ्या
सरदारांमध्ये या घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या घराण्यातील शूर सरदारांनी मोगलांशी अनेक वर्षे झुंज देऊन त्यांना सळो की पळो करून सोडले होते. मुत्सद्दीपणाने व पराक्रमाने महाराष्ट्राच्या इतिहासात त्यानी ठसा उमटवला होता. इतिहासकाळात पराक्रम गाजविणाऱ्या जत संस्थांनाचे डफळे संस्थानिक हे राजस्थानातील तत्कालीन दुडावत-हाडा - चौहान या रजपूत घराण्याचे वंशज आहेत. या घराण्यातील वीर पुरुषांनी तत्कालीन सम्राट यांना तलवारीचे पाणी पाजले होते. त्यांनी मोगलांशी लढून देशभक्ती व शौर्याची चुणूक दाखवली होती. या घराण्यातील दुडावत उर्फ दुलादेव, भाऊबंदकीमुळे राजस्थान सोडून महाराष्ट्रात जाण्याच्या उद्देशाने ते निघाले. वाटेत मोगलांशी लढत असताना दुलादेव व त्यांचे ज्येष्ठ पुत्र धारातीर्थी पडले. दुला देवांचे धाकटे सुपुत्र शामलसिंह होते. त्यांचे सुपुत्र शार्दुलसिंह यांनी विजापूरच्या तत्कालीन सरदार बोहलोल खानाच्या मदतीने आदिलशाही दरबारात प्रवेश मिळवला. शार्दुल सिंह यांचा विवाह सिंदखेडच्या लाखोजी जाधव यांच्या नातीशी झाला होता. त्यांना येलदोजी नावाचा पुत्र होता. त्यांचा विवाह डफळापूरचे पाटील लखोजी मोरे यांच्या मुलीशी झाला. लखोजी मोरे हे निपुत्रिक असल्यामुळे त्यांचा सर्व कारभार हा यलदोजींचे पुत्र लखोजी यांना मिळाला. तेव्हापासून म्हणजे साधारण १६६५ पासून या घराण्याला डफळे नामाभिधान प्राप्त झाले. यापुढे हा सर्व कारभार त्यांचे धाकटे बंधू सटवाजी यांनी पाहिला. नंतर सटवाजी हे सुद्धा पराक्रमी असल्यामुळे आदिलशाही मध्ये त्यांना जत ची जहागिरी बहाल केली होती. १६७२ पासून ते १७०६ पर्यंत सटवाजी राजेंनी कारभार सांभाळला.
          पुढे १७०६ ते १७५४ राणी येसूबाई यांनी हे संस्थान  पाहिले. १७५४ ते १७५९ या काळात यशवंतरावांनी हे संस्थान सांभाळले. नंतर १७५९ ते १७९९ मध्ये पहिले अमृतराव, त्याचबरोबर १७९९ ते १८१६ मध्ये खानाजिराव, नंतर १८१६ ते १८२२ साली राणी रेणुकाबाई साहेब, १८२२ ते १८२३ राणी सालुबाई, १८२३ ते १८२५ राजे रामराव पहिले, १८२५ ते १८४५ राणी भागीरथीबाई, १८४५ ते १८९२ राजे अमृतराव दुसरे व पुढे १८९२ ते १९२८ राजे रामराव दुसरे व त्यानंतर १९२८ ते १९४८ पर्यंत राजे विजयसिंह राजे डफळे यांनी हे संस्थान पाहिले.
           'श्रीमंत अमृतराव दुसरे' यांचे निधन झाले नंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी उमराणे येथील भाऊ बंदकी पैकीच 'बुवाजी राजे' यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव 'रामराव' असे ठेवण्यात आले.श्रीमंत राजे रामराव महाराजांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. ते प्रजेमध्ये अतिशय प्रिय होते. त्यांच्यासोबत लोकाभिमुख निर्णय घेण्यामध्ये त्यांच्या पत्नी पुतळा राजे उर्फ भागीरथी बाई यांचा सुद्धा लाख मोलाचा सहभाग होता. त्या माँ साहेब म्हणून प्रजेमध्ये  खूप प्रिय होत्या! त्या देव, देश, धर्म यासाठी सर्वांना मदत करीत. त्यांनी मुलीसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली होती.वसती गृहे बांधली होती.डफळे घराण्याचा सातारचे व कोल्हापूर चे छत्रपती घराण्याशी निकटचे संबंध आहेत.
          श्रीमंत राजे रामराव महाराजांना चार मुले थोरले श्रीमंत प्रतापसिंह डफळे त्यांचे तरुणपणीच निधन   श्रीमंत विजयसिंह डफळे, श्रीमंत उदयसिंह डफळे आणि श्रीमंत अजितसिंह डफळे!  १९४७ नंतर राजे विजयसिंह राजे डफळे यांनी हे संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन केले. त्यानंतर संपूर्ण सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून त्यांनी दहा वर्ष लोकसभेमध्ये काम पाहिले. जत च्या एकूण विकासामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. 
जतचा स्वातंत्र्यकालीन इतिहास
             इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र व्हावा यासाठी हजारो ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली. जत सारख्या दुष्काळी भागातूनही अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. स्वातंत्र्याचे वारे त्यावेळेला जोरात वाहत होते. जत मध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले; ज्याच्या बैठका श्री अंबाबाईच्या डोंगरांमध्ये निर्मनुष्य जागी होत. त्यावेळी अशा स्वातंत्र्य सैनिकांची गाठभेट जिथे होत होती, काही गुप्त खलबते होत होती तो परिसर म्हणजे अंबाबाईचा डोंगर!
         याच काळात 'सिंदूर लक्ष्मण' नामक युवकाने इंग्रज अधिकाऱ्यांना व त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेला सळो की पळो करून सोडले होते .जतचा पहिला क्रांतिकारक म्हणून 'वीर सुंदर लक्ष्मण' याला ओळखले जाते. जत पासूनच जवळ असलेल्या 'सिंदूर' येथील लक्ष्मण नाईक हा अतिशय गरीब शेतकरी. त्यांच्या घरात एकदा रात्री दरोडेखोरांनी प्रवेश केला व आश्रय घेतला. हे दरोडेखोर गोरगरिबांना लुटतात म्हणून त्यांने त्यांची खरडपट्टी केली. त्यापेक्षा अन्याय करणाऱ्यांना लुटा, असा सल्लाही दिला.
त्या वेळी इंग्रज, श्रीमंत सावकारकी, ब्रिटीश प्रशासन हे गोरगरिबांना लुटत, घरादारवर वाईट नजर ठेवत. हे एक उच्च्य प्रकाराचे दरोडेखोरच आहेत. म्हणून त्याने सुद्धा या सर्वांचा विरोध करावा यासाठी स्वतः एक दरोडेखोरांची टोळी तयार केली. आसपासचा सावकार जो कोणी गरिबांवर अन्याय करेल, या सगळ्यांना धाक देणारा म्हणजे सिन्दुर लक्ष्मण! तो गरिबांचा वाली व श्रीमंतांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जायचा ! महाराष्ट्र, कर्नाटका मध्ये त्याचा दबदबा निर्माण झाला. या टोळीला जेरबंद करण्याचा फौजदार मामुलाल यांनी विडा उचलला होता. ही माहिती लक्ष्मणाला कळताच, चौताळलेल्या लक्ष्मणाने फौजदार मामुलालला गाठले व त्याचे मुंडके धडावेगळे करून वेशीला टांगले होते! दोन-तीन वेळा पकडून ही जेल तोडून तो पसार झाला होता. गोरगरिबांची मदत करत होता. या कामांमध्ये त्याला पत्नीची ही साथ लाभली होती. 
        स्वातंत्र्य काळात त्याने घेतलेली भूमिका अतिशय योग्य होती हेच म्हणावे लागेल. असेच अनेक क्रांतिकारक जतच्या मातीतून निर्माण झाले. त्यामध्ये सोन्याळचे कै.रायापा कराजांगी, यांनी सुद्धा चलेजाव चळवळीत भाग घेतला होता.आजही तालुक्यातील अनेक मुले भारतीय सैन्य दलात सहभागी आहेत कारण ही वीरांची भूमी आहे.
श्री मंदिर प्रारंभीची पार्श्वभूमी
    श्रीमंत रामराव महाराज दुसरे झाले. त्यांनी नवीन राजवाडा बांधण्यास सुरुवात केली. अतिशय मोठा व संस्थान काळास शोभेल असा राजवाडा उभारला गेला. बाग बगीचा, राज दरबार, क्रीडांगण, अशा अनेक पैलूंनी शोभेल असा राजवाडा उभा राहिला राजवाड्यासमोर मंदिर असावे म्हणुन राजवड्यासमोर दीड-एक किलोमीटर अंतरावर एक छोटीशी टेकडी आहे. तिथे एक देवीची मूर्ती डोंगराच्या छायेत गुहेमध्ये अदिकालापासून आहे. तिथेच मोठे मंदिर बांधण्याचे ठरले. त्यानुसार १९१९ साली राजवाड्याच्या समोरच्या टेकडीवर मंदीर बांधण्यात आले. त्या मंदिराचा गाभारा व राजवाड्यावरील तिसऱ्या मजल्यावरील दरवाजा हे एकाच उंचीवर अगदी समोरासमोर येतील असे बांधण्यात आले. राजवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावरून मंदिरातील दिवा व मंदिरातली मूर्ती दुर्बिणीतून पाहिली तरी दिसू शकते अशी ती व्यवस्था होती. रोज मॉसाहेब तिथे जाऊन दर्शन घेत होत्या. मंदिर पूर्ण झाले. मंदिरामध्ये त्या डोंगरावर असलेल्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करावी असा संकल्प करून मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या गुहेत असलेली मूर्ती पुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण ते करत असताना वीज कडाडल्यासारखा एक मोठा आवाज झाला. सर्वजण पाहतात तर ती मूर्ती भंगलेली दिसली. मग मात्र त्यावेळेस या मूर्तीला पुढे आणण्यासाठी कोणीच हात लावेना. ती मूर्ती, ती जागा सोडण्यासाठी तयार नाही असाच त्याचा अर्थ होता! अनेकांना तसा दृष्टांत झाला! त्यावेळी या मूर्तीच्या मंदिराचा विचार त्यांनी काढून टाकला पण नवीन मंदिर पुढे बांधले असल्यामुळे हे मंदिर मोकळे कसे सोडायचे? म्हणून नवीन बांधलेल्या मंदिरामध्ये नवीन मूर्ती बसविण्याचे ठरले. १९१९ ला राजस्थान मधील कारागिराकडून अतिशय सुबक अशी शालीग्राम दगडातील मूर्ती तयार करून घेण्यात आली व या मूर्तीची नवीन मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याची पूजाअर्चां वगैरेचे सर्व अधिकार संस्थानचे गुरव यांच्याकडे सोपविण्यात आले. पण अशा भयाण,निर्मनुष्य जागेत डोंगरावर असलेल्या या मूर्तीची पूजा करण्यास गुरव ही धजेनात. रोज जाऊन पूजा करणे तर शक्य नव्हते. त्यामुळे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, आमवस्या, श्रावण महिना आणि नवरात्र या दिवशी गुरव लोक पूजेसाठी येत असत. त्यानंतर मंदिरांवरील लक्ष कमी झाले. मंदिर हे दुर्लक्षित झाले. या दरम्यान मागील गुहेतील मूर्ती सुद्धा गळ्यापर्यंत मातीमध्ये पूर्ण मुजली गेली होती. पण तिथे सुद्धा लोक फक्त अमावस्येला नैवेद्य वगैरे करण्यासाठी, श्रावणात ओटी भरण्यासाठीच जात होते. त्याच्यावरच पीठ, नैवेद्य, फुलं, उदबत्ती वगैरे लावली जात. डोंगरावर जाण्यास वाट सुद्धा नव्हती. गवताच्या बुंध्याला धरून हाताने धरत धरत वर जायचे. निर्मनुष्य वस्ती, भयाण शांतता अशा मनस्थितीत फक्त वर जायचे व त्याच मनस्थिती हळद-कुंकू वहायचे, नैवेद्य, उदकाडी इ. सर्व तिथेच देवीच्या चेहऱ्यासमोर अर्पण करून परत घाबरत मागे फिरायचे अशी परिस्थिती होती.
              डोंगरावर देवीला जाऊन येणे म्हणजे एक धाडस असायचे, म्हणूनच की काय, याच देवीची पावले ही जतच्या हद्दीत पादगट्टी तयार करण्यात आली. ती जत पासून अर्धा एक किलोमीटर अंतरावर माळावर पादगट्टी आहे व दुसरी पादगट्टी ही रामपूर हद्दीत आहे. बरेच जण डोंगरावर न जाता पादगट्टी वरच फुले, नैवेद्य, उदबत्ती, आरती लावून तिथूनच नमस्कार करत असत. पुढे अशी प्रथाच निर्माण झाली.
श्री मंदिरचां ऐकीव इतिहास
             या डोंगरावर गुहेमध्ये स्थित असलेल्या मूर्तीचा इतिहास कोणालाच पूर्णपणे स्पष्ट माहीत नाही. म्हणजे तिची स्थापना कधी झाली? किंवा ती कोणी केली ? ती तिथेच स्वयंभू उत्पन्न झाली का ? याबद्दल कोणतीच माहिती  उपलब्ध नाही. मात्र पूर्वीपासून तिला अंबाबाई देवी या नावानेच ओळखू लागले. जो उर्वरीत परिसर आहे तो अंबाबाईचा डोंगर म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्या देवी संदर्भात अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. हे बिळुर मधील अनेकांचे कुलदैवत आहे. तसेच रावळगुंड वाडीमधील अनेकांचे कुलदैवत आहे असे म्हणतात. बिळूरच्या भैरवनाथाची बहीण म्हणून सुद्धा ही ओळखली जाते.
             पूर्वी अरण्यामध्ये असताना दरोडेखोर चोरी करण्यासाठी जाताना या देवीला कौल लावत असत. पण एकदा दरोडेखोरांनी दरोड्यात यश न आल्यामुळे या मूर्तीवर आघात केला, त्यामुळे ती भंगली गेली.
           महाराष्ट्रामध्ये जी साडेतीन शक्तीपीठे व ज्या ६४ योगिनी आहेत, या चौसष्ट योगिनीपैकी ही एक योगिनी आहे. देवीरूपामध्ये जयंती हे नामदेखील एक आदिशक्तीचे रूप आहे. "जयंती' हे या जत गावचे पूर्वीचे नाव होते. कदाचित हे नाव तिच्यामुळे सुद्धा पडले असावे असे अनेकांचे मत आहे. जयंती म्हणजे सर्वोत्कृष्ट आणि जत आणि जत चा परिसर हा सर्वोत्कृष्टच आहे. या देवीचे रूप पाहिले तर ही अष्टभुजा मूर्ती, उग्र चेहरा, मोठे डोळे, मोठे ओठ असणारी आहे. एका हातात राक्षसाचे मुंडके आहे तर उजवा पाय हा राक्षसाच्या म्हणजे महिषासुराच्या देहावर ठेवला आहे. एका हातात त्रिशूल, एका हातात बाण, एका हातात धनुष्य, एका हातात तलवार ,एकात ढाल, तर एका हातात, गदा, अशी शस्त्रे आहेत. ही मूर्ती अतिशय उग्र आहे. एका संपूर्ण सपाट अशा दगडावर ही घडवलेली आहे. सध्या या मूर्तीवर कांतीलेप करून घेण्यात आला आहे. कारण ही मूर्ती भंग पावली होती.
         या देवीच्या उजव्या बाजूस सूर्य व डाव्या बाजूस चंद्र आहे. या मूर्तीवर कांतीलेप केल्यामुळे ही मूर्ती शस्त्रास्त्रासह पण शांत चेहर्‍याची दिसते. पूर्वी एखाद्या गरुडाच्या पंखाप्रमाणे हा डोंगर या देवीच्या वर उभा आहे असा भासत असे. या देवीसाठी हा संपूर्ण डोंगरच सावली देत आहे असे भासते. या मूर्तीच्या एकूणच रूपावरून ती महिषासुरमर्दिनीचे रूप आहे हे मात्र नक्की! या मूर्तीचे रूप अतिशय उग्र आहे. या महिषासुरमर्दिनी, डोंगर निवासिनी, अंबाबाईची नजर संपूर्ण जतवर आहे. तिचा जतला आशीर्वाद आहे. या मंदिरावर जाण्यासाठीची वाट ही अतिशय निसरडी होती. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालणेही अतिशय अवघड! मागील मंदिरातील मूर्तीस नमस्कार करून पुढील मंदिराला जर का प्रदक्षिणा घालायची असेल, तर संपूर्ण मंदिराला हात धरूनच घालावी लागे अशी परिस्थिती होती.
*श्री उष:काल*
            साधारणपणे  सन १९७०-७१ पासुन जतमधील कांहीं मंडळी नवरात्रामध्ये एकत्र यायची नऊ दिवस सकाळी श्री अंबाबाई दर्शन घेऊन आरती म्हणून परत जतला यायची.  वर्षभर दर शुक्रवारी श्री मनोहर गायकवाड पूजा करून येत दर शुक्रवारी श्री बाळकृष्ण शिंदे रात्री दर्शन घेऊन दिवा जळे पर्यंत ध्यान करण्यास जात असतं 
१९७४ मधील नवरात्राचा दुसरा किंवा तिसरा दिवस असेल, हे सर्वजण पहाटे श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन पुन्हा श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आले होते.पहाटेपासूनच बारीक पाऊस लागला होता. रोज येणाऱ्या पैकी काही जण आज आले नव्हते. पण तरीसुद्धा नियम चुकवायचा नाही म्हणून, कै.श्री. सुभाषदादा कुलकर्णी, श्री. मनोहर गायकवाड व पाच- सहाजण भिजत जाऊन आंबाबाईचे दर्शन घेऊन, श्री यल्लमा देवीचे दर्शन घेण्यासाठी आले. श्री यल्लमाचे देवीचे दर्शन घेतले असेल, तिथे प्रदक्षिणा पूर्ण केल्या व घराकडे निघणार तोच तिथे जत मधील शेतकी ऑफिस मधील तत्कालीन श्री प्रभाकर जोग साहेब हे आपल्या पत्नी मुलांसमवेत श्री यल्लमा देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. श्री जोग साहेब म्हणजे जिज्ञासू माणूस! त्यांनी सुभाष दादांना विचारले की, काय दादा कुठून आलात ? मग सुभाष दादांनी त्यांना "आम्ही डोंगरावरून आलो. इथेच एक अंबाबाईचा डोंगर आहे. नवरात्रामध्ये आम्ही दरवर्षी सकाळी देवीचे दर्शन घेण्यासाठी जातो, आरती  करून परत येतो". त्यांच्या सोबत मनोहर गायकवाडही होते त्यांची भेट झाली. त्यावेळी मनोहर गायकवाड यांनी जोग साहेबांना विचारलं," की तुम्ही पण उद्यापासून येणार का?" ! तेव्हा जोग लगेच आनंदाने म्हणाले,"उद्यापासून मी पण येतो, मलाही हाक मारत जा!" पाऊस होता, त्या वडाच्या झाडाखाली थोड्याफार गप्पाही झाल्या. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर सर्वजण घराकडे निघाले.
          दुसरा दिवस उजाडला. सर्वांनी श्री जोग साहेबांना हाक मारली. श्री जोग साहेब सुद्धा तयार होते. त्या दिवशी वातावरण ढगाळ होते. परंतु पाऊस नव्हता त्यामुळे कै.अशोकदादा शिंदे, कै.रेवणु शिवणगी, कै. सुरेश चव्हाण, कै. राम चव्हाण श्री.पापा उंटवाले, श्री बसु एकुंडे, व श्री आनंदराव जाधव ही काल न आलेली मंडळी सुद्धा आज आली होती. व सर्वाच्या गाठीभेटी झाल्या गप्पा मारत डोंगरावरती आले. पावसामुळे निसरडी वाट झाली होती. जोग साहेबांना त्याची सवय नव्हती, पण तरीही प्रयत्न करत ते डोंगरावर आले. देवीचे दर्शन घेतले. त्यांना असे भासले की, गरुडाच्या पंखाखाली एखादे पिल्लू जसे असावे, तसे त्या डोंगराच्या छायेत त्या कपाटीत देवीची मूर्ती होती! अगदी गळ्यापर्यंत चिखल-मातीने भरलेली मूर्ती! आदल्या दिवशीच्या पावसामुळे तर तिची अवस्था न बघण्यासारखी होती. अशातच, त्या मूर्ती वर हळद- कुंकू, कोणी पीठ, मिरची, मीठ, ठेवलेली! दगडी दिवा, त्यात तेल पाणी मिसळून जळक्या वाती, नारळ फोडून तिथेच करवंट टाकलेली, केसर टाकलेले! हे सारे श्री जोग साहेबांना काही भावले नाही. त्यांनी सर्वांना आपण ही घाण स्वच्छ करूया, अशी विनंती केली. लगेच सर्वांनी तयारी दर्शवली व त्या दिवशी सर्व मूर्ती स्वच्छ केली. आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला, सर्व घाण काढून खाली नेऊन टाकली. मूर्ती स्वच्छ केली, दर्शन घेतले.
              मग साहेबांनी पुन्हा सर्वांना बोलूवून आपण ही मूर्ती पूर्ण बाहेर काढू असे सांगितले. मग काय, दुसऱ्या दिवशी मूर्ती बाहेर काढण्याचा निर्णय घेऊन मंडळी घराकडे निघाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही सर्व मंडळी व आणखीन काही मित्रांसह सर्वजण कै.आनंदराव माने पाटील यांच्या वस्तीवरून पाटी, कुदळ, खो-या घेऊन आले. देवीची प्रार्थना करून, आजूबाजूचा परिसर स्वच्छ केली. कै. अशोक दादा शिंदेंनी इतर मूर्ती जवळील माती हळूहळू काढू लागले. जसजशी माती निघत गेली तसे मूर्तीचे रूप हळूहळू दिसू लागले! सूर्य, चंद्र, अष्टभुजा असलेली देवी ची मूर्ती दिसू लागली! पायात महिषासुर असे भवानी मातेचे रूप दिसले! एक विलक्षण आनंद सर्वांच्या मनात चेहऱ्यावर होता! आणि एक अकस्मित वीज चमकावी असा आवाज कडकडाट झाला. मूर्ती पडली की काय? असं वाटू लागले, पण मूर्ती आहे तिथेच होती! कदाचित देवीनेच हा होकाराचा कौल दिला असावा असे समजून पुन्हा जोरात तयारी झाली.
                दुसऱ्या दिवशी कै. सदाशिव जाधव हे सुद्धा सकाळी डोंगरावर आले. कै.अशोक दादा व बाकीचे सर्वांनी बैलगाडीतून शंभर विटा, दोन-तीन फरश्या सिमेंट, वाळू आणली. जयवंत साळेने हे छोटेसे देऊळ बांधले! पुढील मंदिरातील मूर्तीवरील हळद कुंकू यांचे कोटिंग साचले होते ते सुद्धा अशोक शिंदेंनी काढले. सुबक मूर्ती दिसू लागली. आसपास पडलेल्या भंगलेल्या मूर्ती ना चेहरा करून लावल्या. आता त्या मूर्त्या विसर्जित केलेल्या आहेत.
           सर्वांनाच विलक्षण आनंद झाला! आपण एक काहीतरी नवीन चांगले काम करत आहोत याचे समाधान होत होते. सुरुवात १९७४ चा नवरात्रापासून झाली. मग लगेच येणाऱ्या कोजगिरी पौर्णिमे दिवशी यात्रा करण्याचे ठरवले. खीर करायची म्हणून ठरले! मग सुभाष कुलकर्णी, रेवणू शिवणगी, प्रभाकर जोग व सर्व मंडळी बाजारपेठेतील सर्वांकडून गहू, गुळ व इतर साहित्य आणून, कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी महाअभिषेक महाप्रसाद करून या यात्रेला सुरुवात केली! गावातील सर्व भक्त बोलावले. हे सर्व भक्तगण यात्रेत आनंदाने सहभागी झाले. मग एकाचे दोन हात, दोनाचे दहा हात होत गेले! अशी कोजागिरी पौर्णिमा यात्रा सुरू झाली. मग मानेवस्तीवर श्रमपरिहार झाला. सर्वांनी आनंद व्यक्त केला. जोग साहेबांना तर खूप आनंद झाला. पुढील वर्षी या मंदिराचा जिर्णोद्धार करायचा हा मानस त्यांनी बोलून दाखविला. मग त्यांची ही कल्पना सर्वांनी उचलून धरली आणि मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प करून या यात्रेची सांगता केली.
एक ध्यास- संकल्पपूर्तीचा
         १९७५ साली जोरदार कामाला सुरुवात झाली. नवरात्रात नऊ दिवस मुक्काम करायचे ठरले. डोंगरावरच्या पायवाटेवर रुंद पायऱ्या करण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी साथ दिली. बरेच जण सर्व मुक्कामसाठी येत होते. रात्री सकाळी खाली पडलेले दगड फोडून, ते बाबा खान दरवेशी या गवंड्याकडून कोरडे रचून घेण्यात आले. डोंगर पोखरून मागे हटवत हटवत जागा वाढवायची होती. तीच माती रात्री मुक्कामाला आलेल्या कार्यकर्त्यांकडून भिंतीच्या ताटात भरायची व पुढेही जागा वाढवायची असा उद्योग नऊ दिवस रात्रंदिवस चालला असेल! ज्या देवळात प्रदक्षिणा घालताना पडण्याची भीती वाटायची, तिथे आज मोठ्या दिमाखात एक मंडप उभा आहे, हे सांगूनही कोणाला पटणार नाही. सर्व जातीचे लोक या कामास येत. पूजेसाठी व पिण्यासाठी मागील कुंडातील पाणी आणावे लागत असे. तेच पाणी सर्व मंडळी वापरत. मग या मंडळीकडून श्रमदानाने मोठा हौद केला. आंघोळीसाठी कै. आनंदराव माने पाटलांच्या विहिरीवर जावे लागे, तिथेच सर्वांना त्यांची आई व पत्नी अतिशय आनंदाने प्रेमाने चहापाणी करून देत असत! ही सर्व मित्र मंडळी अतिशय आनंदात, श्रमदानातून हे राऊळ उभा करत होती.हे श्रमदान दरवर्षी २९७५ ते १९८o पर्यंत चालूच राहिले जागा वाढत होती तसेच डोंगर माती वाहून जाऊ नये म्हणून केकाताड व वृक्ष रोपण केले. 
     हे सारे नवरात्र सण साजरा करत आहेत पण डोगंरावर भक्तगणांना जाण्याचा त्रास होत होता ही बातमी जेव्हा राजवाड्यावर समजली तेव्हा लागेचच डफळे घराण्यातील कै. सकलसौभाग्यवती श्रीमंत उषाराजे डफळे यांनी माँ साहेब यांचे स्मृती प्रत्यार्थ १९८१ मध्ये पायथ्यापासून ते देवळापर्यंत दगडी पायऱ्या बांधून दिल्या ही संपूर्ण व्यवस्था त्यांच्या मार्फत करण्यात आली! !आजही त्या पायऱ्या भक्तांसाठी आधार देत आहेत.
            १९८२ साली मंदिराच्या पायथ्याशी लिंगायत धर्माचे आचार्य संत कोळेकर महाराज यांनी चातुर्मासात अनुष्ठान केले. ते महाराज त्यावेळेला वयाने लहान होते, पदवीधरपण होते ! ते पहाटेपासून साधना करीत. येणाऱ्या भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन करत असत. दररोज एक कप कडूलिंबाचा रस पीत असत! कै.जोग साहेब व श्री. विवेक भिसे हे दोघे त्यांचे दररोज पूजेस जाताना दर्शन घेत होते आणि प्रेमाने विचारपूस करत होते. त्यावेळी चातुर्मासाची सांगता करताना, दहा बाय दहाचा खड्डा करून त्यात धगधगता अग्नी तयार केला! त्यावर बेलाची पाने टाकून, त्या निखाऱ्या वरून निष्ठांकपणे चालत गेले! त्यानंतर अनेक जण अग्नीतून घाबरत घाबरत चालून गेले! कै.जोग साहेब हे सुद्धा ओल्या कापडानिशी कुंडातील अग्नी वरून चालत गेले! त्यांना भीती वाटली नाही! हा एक वेगळाच अनुभव त्या वेळेच्या सर्व भक्तगणाना आता आला!
           आता या मंदिराची माहिती हळू हळू वाढत होती. नवरात्रात सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात वाजता आरती असायची. आता नवरात्रात गुरव पण येऊ लागले होते. कधी कधी मुसळधार पावसात नऊ बाय नऊच्या देवळात वीस वीस जण झोपत होते. ज्या अंगावर झोपले असतील तर त्याच अंगाने सकाळी उठावे लागे! वरून दगड- माती पडे! आणि पूर्ण आंधार! कंदील किंवा गॅस बत्ती असे काही वापरून काहीजण त्या डोंगराच्या कपाटीत झोपत असत. वरून दगड-माती ढासळे पण त्यांना सकाळीच लक्षात येई! इतके श्रमाने थकायला व्हायचे! कै.प्रकाश मोदी घरून जेवण आणत. ते सर्वजण एका झटक्यात संपवत ! सर्व डबे एका सायकल वर आणले जायचे त्यामुळे बरेच अन्न सांडलेले असायचे! तरीही एकमेकांना भाजी, भाकरी देऊन मस्त भोजन व्हायचे! अंबिका भक्त श्री. पापा उंटवाले यांनी सुद्धा १९८१- ८२ मध्ये देवळातच मुक्काम केला होता.
          १९८३ साली आता नित्य पूजा करण्यास प्रत्येक जण जमेल तसे सात- आठ दिवस पूजा करण्यासाठी डोंगरावर जात असे. इथे कुठलाही जातीभेद पाळला जात नसल्यामुळे ज्याच्यावर पाळी असेल तो फक्त मंदिरात येऊन पूजा करत असे. असेच एकदा श्रावण महिन्यात कै. आर जी कुलकर्णी हे देवी पूजेस गेले होते. पुढच्या देवळात त्यांना मूर्तीच दिसेना! ते घाबरले! कसेबसे गावात आले. त्यांनी ही घटना सुभाष कुलकर्णी यांना सांगितली. बघता बघता ही बातमी गावभर पसरली. सगळेजण डोंगराकडे पळत सुटले! खरोखरच मूर्ती गायब झाली का? यामुळे समाजाला वेगळे वळण लागण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यावेळीचे पोलीस इन्स्पेक्टर यांनी ही अतिशय गांभीर बाब लक्षात घेऊन, अविरत प्रयत्न करून, मूर्तीचा शोध लावला व सत्य बाहेर आणले!
न भूतो न भविष्यति
        मूर्ती गायब होण्यामागचं कारण खरे वेगळेच निघाले. खरं पाहिलं तर गुराखी आणि तिथले गुरव यांचा नैवेद्य खाण्यावरून कसला तरी वाद झाला होता आणि मग मूर्तीच नाही तर नैवेद्यं कसा मिळेल? असं म्हणून मूर्तीच काढूया म्हणून एका गुराख्याने ह्या मूर्तीवर घाव घातला आणि मूर्ती तोडली! मग ही मूर्ती तोडल्यानंतर, आता काय करायचे? म्हणून एका ठिकाणी मातीमध्ये ही मूर्ती मुजवण्यात आली. ज्यावेळी या संपूर्ण गोष्टीचा छडा पोलिस इनस्पेक्टर यांनी लावला, कारण दिवसभर डोंगरावर शक्यतो करून गुरव नाहीतर गुरे चारण्यासाठी आलेले गुराखी हेच असत! पोलीसांनी यांच्याकडे चौकशीच्या मोर्चा नेला असता सत्य समजू लागले. आणि गुग्गी नावाची मुलगी सापडली. ती प्रत्येकाची खोटीच नाव सांगू लागली ! पण तिला चांगला पोलीस हिसका दाखवल्यानंतर मग शेवटी तिने बाळ्या म्हारनुरचे नाव घेतले! त्याने पण सांगितले की सहज आडवी काठी घातली व झटका दिला आणि मूर्ती पायातून तुटली, त्यामुळे आम्ही सर्व घाबरलो. आणि ती मुजवली! लोकाचां खूप संताप पाहून रात्री परत एकदा ती मूर्ती काढून, मागच्या गुहेतील मातीखाली मुजवली. दोन्ही जागा दाखवल्या आणि शेवटी गुन्हा कबूल केला. तो गुग्गीला जीव मारण्याची धमकी देत असल्यामुळे
मार खाऊन सुद्धा ती खोटे बोलत होती! बिचारीला खूप मार सहन करावा लागला. पण शेवटी जाणून बुजून किंवा तिरस्काराने केलेला कोणताही गुन्हा नाही आणि हे सर्व अल्पवयीन असल्यामुळे व त्यांच्यावर कोणतीही  तक्रार कोणी न केल्यामुळे संपूर्ण वातावरण शांत झाले! वाईटातून चांगलं होतं असते! तसेच या घटनेमुळे या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशीच आई जगदंबांची इच्छा असावी म्हणून हे घडले असावे असे वाटते.
              त्यानंतर एक समिती नेमली गेली. नवीन मूर्ती बसवायचे ठरवले. पूर्वीचे मंदिर १९१९ मध्ये थोरले महाराजांनी बांधले होते. त्यांच्या वारसांची रीतसर परवानगी घेऊनच नवीन मंदिर बांधण्यास सुरुवात केली. तसेच हे देवस्थान पश्चिम देवस्थान कोल्हापूर यांच्या अंतर्गत येत असल्यामुळे तत्कालीन पश्चिम देवस्थानचे अध्यक्ष कै. विजूबाळ डफळे उमारणी सरकार यांच्या सुद्धा कानावर घातले, तर त्यानी पश्चिम देवस्थानकडून दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य प्राप्त करून दिले. लोक वर्गणी ही गोळा झाली. महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधिकारी श्री वैद्य साहेब यांनी राज्यमंत्री शिवाजीराव देशमुख साहेबांच्या सांगण्यावरून दोन दिवसात लाईट ची सोय केली. यावेळी कै. बाळासाहेब जाधव,कै. दीलीप इंगोले, कै.दत्त जेऊरकर , कै दत्ता कुलकर्णी, श्री.धर्मा माने, श्री.बसु चौगुले श्री.रमेश माळी श्री.गुरुबसु हत्ती श्री. विश्वनाथ शिंदे व इतर मंडळी सुध्दा सामील झाली. मंदिराचा आराखडा श्री. विश्वनाथ शिंदे यांनी तयार केला. श्री. गुरु महाजन यांनी या बांधकामावर देखरेख केले, श्री साखरे या गंवड्याने आराखड्यानुसार सुंदर मंदिर बांधकाम केले. यासाठी अनेक जणांनी श्रमदान केले! पूर्वीचे जे मंदिर होते १९९९ चे, ते संपूर्ण पाडले गेले आणि मग पुन्हा एकदा आतल्या आत दहा बाय दहाचा गाभारा ठेवून चांगले सुसज्ज मंदिर बांधण्यात आले. त्यावर अतिशय सुंदर असे शिखर बांधण्यात आले! आणि कळसाची सोय करण्यात आली.
          त्यावेळी रात्री मुक्कामाला राहून गॅस बत्तीच्या उजेडात हे बांधकाम पूर्ण केले. हे पूर्ण होईपर्यंत मंडळाचे कार्यकर्ते कै. जोग साहेब, तिथेच मुक्काम करून होते! कै. दत्ता कुलकर्णी ढालगावकर यांनी वडिलांच्या स्मरणार्थ मूर्तीची रक्कम देण्याचे मान्य केले. कै. श्रीशैलआप्पा सोलापूरे(बागलकोट) यांच्या माहितीप्रमाणे बागलकोटचे शिल्पकार कै. मयाचार्य यांनी पूर्वीच्या मूर्तीत सुधारणा करून अगदी सुरेख मूर्ती तयार केली! समोर देवीचे वाहन सिंह सुद्धा तयार करण्यात आला. दररोज नित्यपूजा व नित्य पौर्णिमा अभिषेक करण्याच्या अटीवर सांगलीतील कै. टिळक शास्त्री यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यानिमित्ताने मूर्तीची भव्य मिरवणूक गावातून डोंगरा पर्यंत काढण्यात आली. वास्तुशांती, सप्तशती हवन, मूर्ती प्रतिष्ठापना हा अत्यंत जंगी कार्यक्रम पार पडला होता ! आतापर्यंतच्या जतच्या इतिहासात पहिले तर, सर्व समाजातून, सर्व समावेशक अशी एवढी मोठी मिरवणूक आजपर्यंत निघाली नसेल! कै.सुभाष कुलकर्णी, कै. अशोक शिंदे यांच्या माध्यमातून १०८ बैल गाड्या आल्या होत्या. प्रत्येक बैलाला सजवलं गेलं होतं! अनेक रिक्षाचालक आपल्या रिक्षा घेऊन होते. प्रत्येक चौका चौकातून फुलांची, भांडाऱ्या ची उधळण होत होती. जिथे जाईल तिथे सुवासिनी घागरीतून पाणी आणून देवीला पादाभिषेक घालत होत्या. दुतर्फा प्रत्येक घरातून सुवासिनी आरती करत होत्या. अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध अशी ही मिरवणूक वाजत गाजत संपूर्ण जत ची ग्राम प्रदक्षिणा घालून यल्लमाच्या रोड मार्गे, अथणी रोड मार्गे मंदिराकडे आली! जत मधील प्रत्येक घरटी माणूस या मिरवणुकीत येऊन जतनगरीला शोभेल असा 'न भूतो न भविष्यति' असा हा कार्यक्रम झाला. आजही या मिरवणुकीची लोक आठवण काढत असतात.

*लोकशक्ती* 
               १९ ऑक्टोंबर १९८३ रोजी मूर्ती प्रतिष्ठापना झाली. कै. टिळक शास्त्री यांच्या सांगण्यावरून श्री प्रभाकर काशिनाथ जोग व श्री विवेक भिसे यांनी नित्य पूजेची जबाबदारी स्वीकारली. दर पौर्णिमेला अभिषेक व दर तीन वर्षांनी सप्तशती होम करण्याचा संकल्प करून श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचे ठरले.
  मातेच्या कृपेने सर्व शक्तींचा उत्कट आविष्कार बघता बघता साकारत गेला आणि लोकांनी लोकांसाठी लोक वर्गणीतून एक राऊळ बांधले. या डोंगर निवासिनी श्री अंबा मातेचे मंदिर उभे राहिले. त्यानंतर श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्याचा संकल्प झाला. रीतसर धर्मादाय आयुक्त सांगली यांचे कडून रजिस्ट्रेशन करून ट्रस्ट स्थापनेचा संकल्प करण्यात आला.
            १९८४-८५ पासून लोकवर्गणी जमा होऊ लागली होती पैशाचा व्यवहार पारदर्शी व्हावा यासाठी हे आवश्यक होते. १९८६ ला संस्थापक अध्यक्ष म्हणून कै. प्रभाकर काशिनाथ जोग व संचालक म्हणून कै. सुभाष कुलकर्णी, कै. सुरेश चव्हाण, कै. उदयसिंग संकपाळ,श्री. गुरु महाजन, श्री.विवेक भिसे, , व श्री.आनंदराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मंडळाचे सभासद म्हणून श्री मनोहर गायकवाड कै.पांडुरंग आलबाळ कै. बापूजी सांवंत कै.राजन जाधव, कै.बी.एल माळी सर श्री शहाजीबापु भोसले, श्री.मनोहर कोळी, श्री. दीपक शिंदे, श्री.दिलिप पट्टणशेट्टी,श्री तम्मा स्वामी श्री. अरविंद कोरे, श्री. अशोक कोळी श्री. य़शवंत कोळी, श्री.सुधीरदादा चव्हाण श्री. यशवंत शिंदे, श्री.प्रभाकर निटवे श्री. सदाशिव तंगडी श्री बसू राम चव्हाण श्री दत्ता भोसले श्री गोटू निंबाळकर श्री माणिक बिज्जरगी श्री गुरु बिज्जरगी अशा चाळीस एक सभासदांची नाव नोंदणी करण्यात आली. रजिस्टर नंबर ६२७/ १९८६ या क्रमांकाने हे नवरात्र उत्सव मंडळ  स्थापन करण्यात आले. आता यानंतर सर्वांची जबाबदारी मोठी होती. श्रम शक्तीतून एक भव्य असे मंदिर उभा राहिले होते. आज ते गावचे भूषण ठरले आहे. गावकरी सुद्धा आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना मित्रपरिवाराला न चुकता येथील दर्शन घडवून आणतात. लोक वर्गणीतून लोकांसाठी केलेले कार्य म्हणून शासकीय यंत्रणा सुद्धा प्रत्येक वेळेला धावून येत राहिली. त्यात कै. सुभाष दादा कुलकर्णी व कै. अशोक दादा शिंदे यांच्या मागणीप्रमाणे कै.श्री उमाजीराव सनमडीकर यांनी आपल्या आमदार फंडातून १९८७-८८ मध्ये अथणी रोड ते श्री अंबाबाई डोंगर असा डांबरीकरणाचा रस्ता अतिशय उच्च प्रतीचा करून दिला. या परिसरात एक मोठा पाझर तलाव ही तयार करण्यात आला. वनविभागा मार्फत सुद्धा त्यावेळचे तत्कालीन फॉरेस्ट ऑफिसर श्री अरुण माने यांच्यातर्फे बालोद्यान व वृक्ष लागवड करण्यात आली. आपल्या जतकडील वैशिष्ट्यपूर्ण लिंब व केकताड लावण्यात आली. त्यांनी मंदिराच्या समोरून पाहिले तर खाली डोंगरामध्ये केकताडीमध्ये ओम असे लिहिले होते! त्यास खास करून लहान मुलं पाहण्यास येत असत! हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. एक छोटीशी टेकडी जणू काही जतकरांचीही पर्वतीच असल्यासारखे झाले होते!
           स्तुत्य कार्यक्रमाला कधीही भगवंताचा आशीर्वाद लाभत असतो. याप्रमाणे करवीर पिठाचे श्री शंकराचार्य हे जत मध्ये १९८९ साली शारदीय नवरात्र उत्सवासाठी आलेले असताना, त्यांनी डोंगर देवासी अंबाबाई मातेचे दर्शन घेऊन अत्यंत समाधान व्यक्त केले! त्यांचा सुद्धा हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला!मंदिरात पूजेचे साहित्य व इतर साहित्य ठेवण्यासाठी१९९० मध्ये विजापूरचे कै. महिपतरव देशपांडे यांनी साहित्य ठेवण्यासाठी म्हणून कपाट भेट दिले. त्याचबरोबर श्री मनोहर गायकवाड यांनी देवीच्या सर्व साड्या धुऊन ईस्त्री करून देण्याचा संकल्प केला! कै. बाळासाहेब जाधव, कै.  राजन जाधव यांनी स्पीकर सेट दिला. श्री पुंडलिक पांढरे यांनी १९८३ पासून रंगविण्याची जबाबदारी घेतली. कै. भीमराव मोरे यांनी महाप्रसादासाठी सरपण देण्याची जबाबदारी घेतली. श्री गुरबसू हत्ती व कै. प्रकाश मोदी यांनी केलेली श्रमभक्ती न विसरता येण्यासारखीच आहे! गोंधळ जागरणाचे जबाबदारी कै. आप्पासाहेब देशपांडे, कै. आबा परीट त्यानंतर श्री बसू चौगुले यांनी घेतली. १९८३ पासून जतचा गोंधळी श्री नामदेव माने यांनी ही जबाबदारी स्वीकारली. नवरात्रात अष्टमी दिवशी न चुकता या व्यक्ती दिलेल्या मानधनांमध्ये प्रेमाने, आनंदाने गोंधळ घालून जात! सन १९९०-९१ उन्हाळ्याच्या दिवसात पूजेच्या व पिण्याचे  पाण्याची गरज भासू लागली यासाठी बोर पाडण्याचे ठरले. 'श्री चौगुले बोरवेल, इचलकरंजी' यांनी साडेचार इंच कूपनलिका पाडून दिले! त्याचबरोबर जत चे प्रसिद्ध व्यापारी श्री प्रकाश बिजरगी यांनी त्यावर विद्युत मोटार बसवून दिली, त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला! पाटलाच्या बांधातून आणावे लागणारे पाणी आता सरळ मंदिराच्या डोंगरावर मंदिरापाशी येऊन पोहोचले!
                  दिवसांकडे दिवस जातच होते. हळूहळू या नवरात्र उत्सव मंडळाचे सभासद हे गाणगापूर यात्रेला चालत जात होते. या सर्वांच्या कल्पनेने मंदिराच्या डाव्या बाजूला श्री दत्त मंदिर व त्याचबरोबर श्रीगणपती आणि शिवपिंड स्थापन करण्याचे ठरले. 'अग्रवाल स्टोन क्रॅश' यांच्या वर्गणीतून मंदिराचे सभा मंडप तयार झाले. श्री.शशी मोदी यांनी पिंड, श्री मामलेदार यांनी दत्त मूर्ती व कै.राजू ओसवाल यांनी गणेश मूर्ती बसवण्यासाठी दिली.श्री राजाभाऊ बोर्गीकर यांनी यजमान होते त्याची सुद्धा धर्मशास्त्राप्रमाणे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच वेळी मंदिरासाठी एक कार्यालय पाहिजे म्हणून मागील मंदिराच्या पाठीमागे वर स्लॅब टाकण्यात आला व त्याच्या बाजूलाच भक्तांची व्यवस्था व्हावी म्हणून कार्यालय सुद्धा बांधण्यात आले. दरवर्षी नवरात्रात श्रमभक्ती व मदतीने वाढवलेली जागा. सन १९९२-९३ मध्ये यावर कै. गलगली यांनी एक फरशी लोड दिली. सभामंडपात घालण्यासाठी लागणारी फरशी पोलीस अधिकारी श्री रुपनुर यांनी दिली. आणि अशा सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर पूर्ण उभे राहिले. इथून पुढेही काही संकल्प करून मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे सर्वजण एक दिलाने, जिद्दीने करत होते. म्हणूनच उत्तरोत्तर या मंदिराची प्रगती होत गेली. यासाठी प्रत्येक वेळी जगदंबेचा आशीर्वाद लाभायचा. याची प्रत्येक वेळेस आम्हाला जाणीव व्हायची म्हणूनच ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी, डोंगर निवासिनी, श्री आंबाबाई म्हणून प्रसिद्ध आहे!

*प्रगती - प्रसिद्धीकडे वाटचाल*
           श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळातर्फे नित्यक्रम म्हणून रोज सकाळी आरती ,दर शुक्रवारी आरती आणि जोगवा, दर पौर्णिमेला अभिषेक, आणि दरवर्षी पंधरा दिवस नवरात्र उत्सव, दहा दिवस नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमा यात्रा करून याची सांगता होते. दर-तीन वर्षांनी नवचंडी होम असा मंडळातर्फे संकल्प त्या वेळेला करण्यात आला आणि तो आजतागायत चालू आहे. देवीचे दर्शन बाहेरूनच घ्यायचे ही प्रथा चालू राहिली. मंदिरामध्ये आत गाभाऱ्यात जाताना सोवळे नेसून जावे, असा नियम करण्यात आला. नावरात्रा चे आधी रंगरंगोटी व विद्युत रोषणाई केली जाते हे काम अरविंद कोरे आपासो तंगडी सदा तंगडी  सुनील फौजादार आनंदा चव्हाण हे इलेक्ट्रिक व मोटार दुरुस्ती खूप जबाबदारीने करतात साऊंड सिस्टीम चे काम  श्री पुंडलिक पांढरे श्री प्रकाश कोळी श्री अशोक कोळी करतात आदल्या दिवशी सर्व कार्यकर्ते मुक्कामाला  जाऊन मंदिर धुऊन घेतात. आब्याच्या ढाळे बांधले जातात तोरण लावले जाते हे  बसवराज एकुंडे व  आलेले सर्व सहकारी करतात.  नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी नवरात्र अभिषेक घटाची स्थापना आणि नवरात्रीचे अंखंड दीप प्रज्ज्वलित करून नवरात्र सुरू होते.रोज सकाळ संध्याकाळ  साडे सात  ला आरती असते त्या आधी भजन असते या मध्ये कै.बाळासाहेब जाधव कै बी.एल.माळी सर कै राम गुरव सोबत श्री ईश्वरा श्री सहदेव माळी मनू कोळी भूषण साळे  श्री राम चव्हाण श्रीमती शर्मा भाभी श्रीमती बामणे श्रीमती जमदाडे.सौ सिंधुताई माळी कु.प्राची जोशी यांचा सहभाग असायचा. या  उत्सवात महाअष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो.त्या दिवशी सर्वाँना उपवास करण्याचे आवाहन केले जाते बाजारपेठेतील भक्त त्या दिवशी साबुदाणा खिचडी चा प्रसाद करतात. त्याच दिवशी रात्री दिवटी उत्सव कुमारिका पूजन श्री नामदेव माने यांचा गोंधळ जागरणाचा कार्यक्रम हा संपूर्ण होतो.खंडे नवमी ला शस्त्र पूजन होते  विजयादशमी दिवशी नवरात्र उत्थापन होऊन    अभिषेक, सालंकृत पूजा असते. दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन रात्री बारा वाजता देवीचा दरवाजा हा विश्रांतीस्तव बंद राहतो. तो पुन्हा कोजागिरी पौर्णिमेच्या आधी रात्री बारा वाजता उघडला जातो.कोजागिरी पौर्णिमा आता डोंगर निवासिनी श्री आंबा मातेची यात्रा म्हणून भरवली जाते. त्या दिवशी  सकाळी महाभिषेक महापूजा देवी सहस्त्र नामावली पठान आणि दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.महाप्रसाद ची तयारी श्री अशोक मानेपाटील व सहकारी  करतात. जेव्हापासून हे नवरात्र उत्सव मंडळ हे कार्य करत आहे, तेव्हापासून कै .श्री आनंदराव माने पाटील त्यांच्या आई, त्यांच्या पत्नी आणि आज आता त्यांची मुले सुद्धा या संपूर्ण मंदिराला अतिशय मोलाचं सहकार्य करत आहेत. त्यामुळेच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी बारा वाजता जो महाप्रसाद केलेला असतो त्या नैवेद्याचा मान या माने पाटील कुटुंबीयांना आहे.तो वाजत गाजत त्यांच्या वस्ती पासून ते मंदिरा पर्यंत आणला जातो. त्याचबरोबर दसरा ते पौर्णिमेच्या दरम्यान नवरात्रामध्ये जे चार दिवस असतात, त्यावेळी नवरात्रातील कार्यकर्ते कार्य करत असतात त्यांना श्रम भोजन म्हणून  'तंगडी' परिवार, 'मुंडेचा' परिवार, 'मूलचंदनी' परिवारातर्फे  पूर्वी पट्टणशेट्टी,शिंदे परिवारातर्फे सुद्धा सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था असे! 
कोजागिरी पौर्णिमे दिवशी महाप्रसाद झाल्यानंतर रात्री संपूर्ण स्वच्छता करून दुसऱ्या दिवशी माने पाटील वस्तीवर वार्षिक सभा घेतली जाते. संपूर्ण हिशोब दिला जातो आणि पुढील वर्षाचे सर्व संकल्प करून त्यादिवशी मंडळा तर्फे सर्वांना आशीर्वाद म्हणून नारळ प्रसाद देऊन सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिला जातो.
             मंदिर राखण्यासाठी जो गडी ठेवण्यात आला आहे त्या गड्याचा पगार हा मंडळातील सभासदांच्या वर्गणीतून भागावला जातो. त्याबरोबर या वर्गणीतून पौर्णिमा अभिषेकसुद्धा केले जातात. हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. प्रथम कै. गोपा साळे याने राखणं दार म्हणून खूप काम केले. त्यानंतर कै. खांडेकर मामा, श्री.विनायक साळे व पुढे श्री गोपा चां मुलगा श्री भारत साळे यांनी राखणदार म्हणून अनेक वर्षे काम केले.आता श्री मल्लिकार्जुन जाधव काम करत आहे.
  १९९१-९२ मध्ये अधिक वैशाख महिना होता, त्यावेळी संगोरी, जिल्हा सोलापूर येथील तरुण, ज्ञानी, अभ्यासू, परमपूज्य गुरुनाथ महाराज यांनी मंदिरातील निवासगृहात एक महिना मुक्काम करून 'खंडित पितांबर १० सुरक्षित विचार चंद्रोदय या प्रक्रिया' ग्रंथाचे विश्लेषण केले. त्याचा लाभ सुद्धा श्री निगडीकर दादा यांनी घेतला होता. त्यांनी स्वतः जेवण करून घालून विद्यावसाचा आनंद त्यावेळेला लुटला होता. सन १९९३ साली 'परमपूज्य पटवर्धन महाराज', तळेगाव दाभाडे हे शक्तिपात दीक्षा देतात. त्यांनी देवळास भेट दिली त्यावेळेला गणपती मूर्ती, दत्त मूर्ती व शिवलिंग यात देवीचेच दर्शन होते आहे असे सांगून कल्याण चिंतले होते! त्यांच्यासोबत त्यांचे अमेरिकेतील शिष्य रॉबर्ट हे पण आले होते. कचरनाथ महाराज संप्रदाया तर्फे श्री राजपूत व श्री अशोक गायकवाड आपल्या गुरुबंधू सह दर शिवरात्री दिवशी शिवलीलामृत चे पारायण करून महाप्रसादाने सांगता करतात. श्री 'चिपळूणकर सर', सांगली यांना सुभाष दादांनी पाचारण केले होते. त्यांनी तिथे एक रात्र मुक्काम केला होता. रात्री स्वतः पेटी वाजावून भजने म्हटली होती. दिंमडी, पखवाज वाजवला होता. त्यांचे हे नैपुण्य पाहून सर्व मंडळ चकित झाले होते. दरवर्षी शादीय ज्ञानसत्रात समर्थ मंडळातर्फेचे जे मान्यवर येतात ते नक्कीच या मंदिराला भेट देत असतात.
           नवरात्र झाले की याच सर्व मंडळींना वेध लागतात ते गाणगापूर पदायात्रे चे! १९९४ साली श्री सदामामा यांनी जोग साहेबांना विनंती केली की तुम्ही पण या पदयात्रेला या! पण तेव्हा आठ दिवस पूजा कोण करणार हा प्रश्र्न होता! तेव्हा श्री अनिल देशपांडे हे व्यायाम साठी डोंगरावर रोज येत असत. श्री जोग साहेबांनी त्यांना विचारले, " आठ दिवस पूजा करणार का?" तेव्हा त्यांनी देवीची सेवा करणे हे भाग्य समजून मान्य केले व देव दीपावली पासून पूजेस प्रारंभही केला. मग ते ही मंडळात सामील झाले. पुढे जोग साहेबांना शारीरिक त्रास, पुत्र वियोग झाला. पण हे सारे सहन करण्याची ताकद केवळ जगदंबेनेच दिली असे ते नेहमीच म्हणायचे!
              पुढे१९९५ पासून ही पूजेची जबाबदारी श्री अनिल देशपांडे यांनी घेतली ती सेवा आजपर्यंत चालू आहे.
कै.गुड्डापूर स्वामी यांच्या कृपेने १९९६ मध्ये संन्यासिनी सत्यमेधा यांनी दीड महिना डोंगरावरील निवासात वास्तव्य केले होते. अनेक जणांना योगसाधना शिकवली होती. त्या स्वतः रांधण करून जेवत. इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते! त्या बी. ई. इलेक्ट्रिकल होत्या. त्या दिवसातून फक्त एक तास बोलत आणि बाकी काळ म्हणून मौन! असे त्यांचे एक महिना चालू होते. मौन महात्म्यावर त्यांचा फार भर होता. त्यांचा मंडळातर्फे सत्कार करून आशीर्वाद घेतला होता. तसेच 'श्री विद्यानंद महाराज', पुणे यांनी सुद्धा श्री दर्शन घेऊन हा परिसर साधना करण्यास उत्तम जागा आहे असे सांगितले, कारण त्यांना तशी प्रचिती आली होती. त्यांचा सुध्दा मंडळातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता! कै. अमलानंद महाराज यांना श्री पोतनीस सरांनी आमंत्रित केले होते. ते वर येऊ शकले नव्हते, पण त्यांचे शिष्य परमपूज्य श्री म.अ. कुलकर्णी यांनी देवीचे दर्शन घेतले. मंडळातर्फे यांचाही सत्कार करण्यात आला होता. अशा रीतीने दरवर्षी कार्य करत रौप्य मोहत्सवाकडे मंडळाची वाटचाल सुरू होती.
                १९९६ ला नवरात्र उत्सवामध्ये सकाळच्या आरतीला जागा अपुरी पडू लागली, मुक्कामास ५० कार्यकर्ते येत होते. त्यामुळे अडचण होत होती. हेच जागेचे उद्दिष्ट ठेवून मग मंडळातर्फे संपूर्ण अंबाबाई मंदिर परिसराचाव पुढचा भाग हा खालून भरून उत्तर व पूर्वेला वाढवायचा असे ठरले. १९९७ ला सुरुवातीची जागा वाढवली, कारण तीस- चाळीस फुटावरून खालून पिलर आणण्यात आले. तसेच समोरच्या बाजूने जागा स्लॅब घालून वाढविली. वर पत्रा शेड घालण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने श्री शशी मोदी यांच्याकडून सर्व स्टील वगैरे उधार घेतले होते. श्री प्रदीप जेऊरकर यांनी ते काम नवरात्राच्या आत पूर्ण करून दिले. आता नवरात्रामध्ये या सर्वांचे पैसे द्यायचे होते. जोग साहेबांना नित्य प्रश्न पडायचा की, एवढी वर्गणी गोळा होईल का नाही? ते कायम या चिंतेत असायचे! सदाभाऊ यांच्या जिभेवर मात्र साक्षात लक्ष्मी आहे असंच वाटायचं! सदैव गोड बोलून आणि डोकं शांत ठेवून सर्वांची चेष्टा मस्करी करत, हसत खेळत, सर्वांच्याकडून वर्गणी गोळा करत असायचे. श्री सदा मामा प्रत्येक वर्गणी देणाऱ्यास कार्यक्रम पत्रिका, हळदी कुंकवाचे पुडी, साखरेची पुडी, देऊन नमस्कार करून कोजागिरी पौर्णिमेच्या यात्रेचे निमंत्रण द्यायचे. देवीची सेवा म्हणून हळदीकुंकू व साखरेच्या पुड्या करायचे काम श्रीमती शालिनीताई पाटील या मनोभावे गेली ४० ते वर्ष करत आहेत.
याच नवरात्रात दशमी झाली असेल, मग पैसे द्यायची वेळ आली. मग जोग साहेबांनी विचारले, " सदामामा पैसे गोळा झालेत का नाही बघ? नाहीतर मला माझं घर विकून पैसे द्यावे लागतील!" तेव्हा कै. सदामांमा त्यांना एकच म्हणाले, "साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, जगदंबेनं आपल्याकडून हे करून घेतल आहे मग तीचं वर्गणी गोळा करून देईल. आतापर्यंत गोळा झालेली पैसे मोजले नाहीत, हे संपूर्ण पैसे तुमच्या पुढे ठेवतो, काय असेल ते भागवा!" ऐशी हजार रुपये द्यायचे होते तर, दसऱ्यापर्यंत ९० हजार गोळा झाले होते. हे पाहुन कै.जोग साहेबांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं! भक्तांच्या मनातली एखादी इच्छा किंवा त्यांनी एखादा संकल्प केला तर, ती पूर्ण करून देण्यासाठी आई जगदंबा कसा आशीर्वाद देते हे प्रत्येक वेळेला तिथे आम्हा सर्व मंडळींना जाणवत असतं!
                म्हणूनच इथून पुढचे सुद्धा बरेच संकल्प आई जगदंबेच्या कृपेमुळे प्रत्येक वेळेला पूर्ण झाले. आज पर्यंत सर्वांच्या सहकार्याने श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ हे उत्तरोत्तर प्रगती करत गेले. त्याच वेळेला १९९८ ला या नवरात्र उत्सव मंडळाचे श्री जोग साहेबांना संस्थापक अध्यक्ष ठेवून कार्याध्यक्ष म्हणून कै.राजन बापूजी जाधव यांची निवड केली व संचालक म्हणून  कै. सदाशिव जाधव, , कै. सुभाष कुलकर्णी, कै. अशोक शिंदे, , कै.बाळासाहेब जाधव, श्री.शहाजी बापू भोसले, श्री. गुरप्पा महाजन, श्री. प्रभाकर नटवे, श्री. शशिकांत मोदी, श्री.पांडुरंग कटरे यांच्या नावाने एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या संपूर्ण देखरेखीत पुढील कार्य सुरू झाले. रौप्य महोत्सवी वर्षात  कै. अशोक दादा शिंदे हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी अनेक जाहिरातीच्या माध्यमातून संपूर्ण शहराची फोनची डायरी काढण्यात आली. ती स्मरणिका काढली. संपूर्ण इतिहास आणि अनेकांचे मनोगतपर लेख देण्यात आले. अनेक जुन्या आठवणींचे फोटो त्यामध्ये देण्यात आले आहेत. नंतर स्वागत कमान ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्याच वेळी मार्केट कमिटी मार्फत स्पीकर सेट सुद्धा देण्यात आला. त्यावेळी कै. राजन जाधव यांच्या हस्ते शतचंडी होमाचे नियोजन करण्यात आले होते. बीड मधील सर्व ब्रह्मवृंदाने हा शतचंडी होम केला. अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम संपन्न झाला होता. आता अनेक तरुण मुक्कामाला वाढू लागले. श्री.सत्यजित शिंदे, श्री भारत गायकवाड, श्री.बापू गायकवाड श्री.अजित शिंदे, श्री. अनिल शिंदे, श्री. अजित माळी, श्री. प्रमोद क्षीरसागर, श्री. संतोष मोगली, श्री राजेंद्र माने श्री नरेंद्र कुलकर्णी श्री चतुर चव्हाण श्री. राहुल जाधव श्री प्रमोद क्षीरसागर श्री भीमराव देवकर हे सारे नवचैतन्य आले. तिथून पुढे असाच संकल्प करून या मंदिराच्या माध्यमातून गोशाळा, वृद्धाश्रम, मंगल कार्यालय असेल अशा अनेक संकल्पना त्यावेळेस करण्यात आल्या. अजून संपूर्ण मंदिराच्या भोवती जागा वाढवता आली तर ती वाढवावी, असाही संकल्प करून महोत्सव वर्ष संपन्न झाले होते.

*सामाजिक गरुड झेप*
            सन१९९९मध्ये  श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ आता सामाजिक कार्यामध्ये इतर क्षेत्रात भाग घेत होते. जत थोरली वेस दहीहंडी स्पर्धे मध्ये सुद्धा श्री अंबिका नवरात्र उत्सवाची टीम असायची. एकदा त्यानी विजयतेपद पटकवले.याच म़ंडळातील काही मंडळीनी जत ते गाणगापुर पद यात्रा कै.सदामामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होती. पाश्चीम महाराष्ट्र सांकृतिक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन जोगवा सादर केला. हा कार्यक्रम खूप गाजला. कै.बाळासाहेब जाधव यांच्या पहाडी आवाजातील जोगवा बी. एल. माळी सरांनी दिलेली सुंबळाची साथ व श्री अनिल फडणीस यांनी वाजवलेली सुरपेटी त्याचबरोबर श्री अशोक गायकवाड, दिलीप इंगोले, अशोक दादा, मनू कोळी, बसू चौगुले यांनी केलेला गोंधळाचे दिवटी नृत्य अगदी पारंपारिक असेच वाटत होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या कार्यक्रमाचे नाव झाले. जत मधील सर्व गायकासणास घेऊन जोगवा गीतांची रेकॉर्डिंग कॅसेट काढली होती निवेदन श्री पोतनीस सर श्री बाळू दादा  सौ.खापरे मॅडम श्री अनिल कुलकर्णी इतर गायक व संगीत अनिल फडणीस यशवंत जोशी बाळासो जाधव जनार्दन वाघमारे  यांनी दिले हा सांसकृतीक वारसा मंडळाने जपला.  ही गीते पाहून सांगली आकाशवाणी वर देखील जत ची डोंगर निवासिनी श्री अंबा माता हा माहिती मुलाखत  व गीतांचा कार्यक्रम झाला होता. अनेक गरजु विद्यार्थानां खेळाडूंना  मदत केली गेली.
 बाजारपेठेतील श्री.अंबिका भक्तांनीसुद्धा संकल्प करून अथणी रस्त्याला एक महाद्वार सन २००१-२ मध्ये उभा केले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्री. बाळासाहेब हुंचाळकर, श्री. अजित शिंदे व त्यांची सर्व मित्रमंडळी यांचा सहभाग होता. हे प्रवेशद्वार झाल्यानंतर पुन्हा एक दोन वर्षांनी याच मंडळींनी श्री अंबाबाईच्या पुढील मंदिरातील संपूर्ण गाभाऱ्यात मार्बल लावून दिले. दिवसेंदिवस वरची जागा कमी पडू लागली म्हणून पूर्व बाजूला संपूर्ण जागा वाढवण्याचे काम सन २००२-३ मध्ये हाती घेतले. हे सर्व काम कॉन्ट्रॅक्टर श्री. पांडा मळगे आणि यांच्या टीमने केले. या वर शेड कारण्याचे ठरले. त्याचे सर्व साहित्य श्री. मेघराज चौधरी, (रामदेव स्टील) यांनी संपूर्ण साहित्य उधारी वर दिले. याचे संपूर्ण काम हे श्री. लिंबाजी मिस्त्री निगडी यांनी अतिशय सुरेख करून दिले. अतिशय भव्य दिव्य सभामंडप तयार सन२००४-५ मध्ये झाला. जिथे मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा सुद्धा घालायला जागा नव्हती, आज त्या ठिकाणी एवढा मोठा मंडप उभा केलेला आहे! डोंगराला साजेल अशीच जागा वाढवली. अति वाढवली असती तर कदाचित नाकापेक्षा मोती जड दिसला असता, त्यामुळे जेवढी शक्य आणि सुरक्षित आहे, तेवढीच जागा वाढवली! यामध्ये सुद्धा प्रामुख्याने
 श्री. बाळासाहेब  हुंचाळकर  श्री. दुर्योधन कोडग, श्री. शशी काळगी, श्री.तानाजीराव पाटील, श्री.अजित शिंदे श्री तानाजीराव यादव श्री महादेव हंचालकर श्री दऱ्याप्पा पाटील डॉ विवेकानंद राऊत श्री राजू मनगोली श्री सुभाष गोब्बी यांनी व अनेक भक्तांनी उदारपणे देणगी रक्कम या मंदिराला दिली, म्हणून हे सर्व शक्य झाले. यानंतर याच्यावर सन २००६-७ मध्ये फरशी घालण्याचे ठरवले गेले. मारबल घालायची का साधी पॉलीश घालायची? या एकूण निवडीमध्ये आणि ग्रॅनाईट घालायचे ठरले. पुन्हा एकदा मंडळातील सर्व भक्तांना भाविकांना आवाहन केले आणि या आव्हानाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, नऊ दिवसांमध्ये लागणारे संपूर्ण पैसे गोळे झाले व हे फरशी कै.करिम मिस्त्री यांनी पूर्ण केले. यावेळी झालेली एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कै. बी. एल् माळी सर यांच्या शेजारी राहणा-या तिपेहळी च्या श्रीमती शिंदे आजी होत्या. आम्हाला कोणालाच माहीत नसताना त्या डोंगरावर दर्शनासाठी आल्या आणि कै. सदामांमापाशी जाऊन बोलू लागला की, "आम्हाला तुम्हाला काय तरी द्यायचं आहे, माझ्या नव-याच्या स्मरणार्थ" ! सर व वहिनी त्यांच्यासोबत होत्या. मग सदामामांनी त्यांना विचारलं, "आजी काय देणार आहे तुम्ही?" त्यांनी एका साध्या पिशवीत आणलेले एक लाख रुपये टेबलवर ठेवले. त्या वेळेला आम्ही सर्वजण एक क्षणभर सुन्न झालो! खरंच, त्यावर्षी लाख रुपये कमी पडत होते! ही सर्व माया तिचीच आहे, तिनंच पैसे पाठवले आणि एक लाख रुपये जगदंबे चरणी या कामासाठी अर्पण केले, त्यावेळी श्रीमती शिंदे आजीचा देवीची साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला व असा अनुभव प्रत्येक वेळेस मंडळाला आला.
              त्यानंतर पुढील२००८-९ साली दररोज दोन-चार व्यक्ती सपत्नीक सामूहिक आरती करायचे ठरले. त्यामुळे रोज दोन-चार जोड्यांना मंदिरामध्ये सोवळे नसून प्रवेश देऊन आरती सुरू केली. मंदिरामध्ये देवीच्या पाठीमागे कलाशिक्षक श्री आर. ए. पाटील सरांनी बनवलेली प्लायवूड ची प्रभावळ होती ती पाहून श्री शशि काळगी यांनी याजागी चांदीची प्रभावळ करूया असे बोलल्यावर, श्री तानाजीराव यादव व श्री दुर्योधन कोडग यांनी आरती झाल्यानंतर या चांदीच्या प्रभावळी साठी एक एक किलो चांदी श्री जगदंबे चरणी अर्पण करण्याचा संकल्प केला. त्या जोडीस अनेकांनी पण संकल्प केला. सर्व सराफी असोसिएशनकडून त्यावेळी चांदी गोळा करण्यात आली. संपूर्ण भक्तगणांना आवाहन केल्यानंतर साधारणपणे १५ किलो चांदी जमा झाली. त्यामध्ये अतिशय सुंदरशी प्रभावळ सांगलीचे ओतारी बंधू यांनी करून दिली. या प्रभावळीची मिरवणूक सुद्धा अशोक शिंदे यांच्या घरापासून संपूर्ण बाजारपेठ करत, थोराल्या वेशीतील मारुती मंदिरापाशी येऊन, सांगता करून, श्री जगदंबाचे चरणी कोजागिरी पौर्णिमे दिवशी अर्पण केली! स्वाभाविकच प्रभावळ झाल्यानंतर जगदंबेचा मुकुट करण्याचे २००९-१० साली ठरले त्याचबरोबर दागिने करायचे ठरले आणि हे सोन्याचे कार्य सुद्धा श्री कोडग, श्री.तानाजीराव यादव यांनी पुढे होऊन अतिशय सुंदर असे २६९ ग्रामचे सोन्याचे मुकुट तयार केले. या वेळीसुद्धा या सर्व मंडळींनी दहा ग्राम सोने दिले. त्याचबरोबर सर्व भक्त जतकरांनी स्वतः श्री जगदंबेच्या अलंकारासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने अर्धा ग्रॅम, एक ग्राम, किंवा एक गुंज सोनं असे सर्वांनी श्री जगदंब मुकुटसाठी अर्पण केले. यामध्ये आवर्जून नमूद करण्यासारखी एक घटना! अशी की एका वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तीकडे एक भांडी घासण्याचे काम एक महिला करीत होती. तिने त्या डॉक्टरांशी बोलून एका महिन्यचा ॲडव्हान्स पगार मागितला. त्या डॉक्टर मॅडमनी त्या स्त्री जवळ चौकशी केली की, " तुला ऍडव्हान्स पैसे का हवेत? तुला काही अडचण नाही ना? घरी कोणी आजारी आहे का?" तर त्या महिलेनं सांगितलं की मुकुट ठेवणार आहेत. मंडळाचे लोक आई जगदंबेच्या डोक्यावर मुकुट बसवणार आहेत. आणि त्यामध्ये माझा सुद्धा हातभार लागला पाहिजे म्हणून मला एक अर्धा ग्राम सोन तिथे दयायचं आहे! ही जी भावना एका सामान्य स्त्री मध्ये उत्पन्न झाली कारण तिचं प्रेम तेवढे या मंदिरावर! श्रद्धा होती देवीवर! या अशा आर्थिक परिस्थितीने सामान्य पण मनाने श्रीमंत असलेल्या भक्तांमुळे प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास येत गेली. या मुकुटासाठी एवढे सोने आले की, त्याच्यानंतर उरलेल्या सोन्यामध्ये देवीचे दागिने सुद्धा बनवण्यात आले होते.
 *पर्यटन स्थळ-सांस्कृतिक भवन*
          कै. सुभाष दादा यांनी राजकीय हितसंबंधाचा वापर करून आमदार सनंमडीकरांकडून डांबरी रस्ता केला. तत्कालीन वन खात्याचे नामदार मंत्री कै.पतंगराव कदम यांचेकडून ५०,००० रूपये पहिल्यांदाच१९९६ ला सभा मंडप वाढवताना आणले. तसेच कै अशोक दादा यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ५००० लीटर पाण्याची टाकी मंजूर केली. सन २०१० मध्ये आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्पीकर सेट दिला. श्री प्रभाकर जाधव यांनी ५०,००० रू वाढीव बांधकामास दिले. अनेक नेते मंडळींनी मंडळासाठी ही कामं केली. अजून एक महत्त्वाचे काम कै.अशोक शिंदे ज्यावेळी जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष होते त्यावेळी केले. ते म्हणजे  त्यावेळेला या संपूर्ण अंबाबाई मंदिराचा परिसर हा पर्यटन तीर्थक्षेत्र  'क' वर्गात त्यांनी घातला होता. पण त्यावेळेला आर्थिक पर्यटन स्थळाला एवढे आर्थिक साह्य मिळत नव्हते. आलीकडच्या काळात आर्थिक साह्य मिळू लागले आहे. हा सर्व निधी वन खात्याकडे वर्ग होत आहे. हा संपूर्ण परिसर ज्यांच्या अखत्यारीत येतो, त्या वन खात्या मार्फत हे पैसे वापरले जातात. म्हणून त्यांनी पहिल्यांदा या संपूर्ण परिसराला कंपाऊंड करून दिले.
सन २०१३ मध्ये डिसेंबर महिन्यात मंडळाचे संस्थापक श्री जोग साहेब यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच बरोबर कार्याध्यक्ष श्री राजन जाधव यांची सुध्दा प्रकृती कारणामुळे फारसे लक्ष देऊ शकत नव्हते. श्री सदाशिव जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा मध्यवर्ती. बँकेचे माजी व्यवस्थापक अर्थ कमिटी चे सदस्य श्री रामचंद्र बाबुराव भोसले यांच्या कडे सर्वानुमते मंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले त्याचा मृदू स्वभाव व आर्थिक नियोजनाचा अनुभव व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची निस्वार्थी वृत्तीमुळे  पुढील सर्व कार्ये ही त्यांच्या मार्गदर्शनात होत गेली.
आता पुढील पिढीतील श्री सुजय शिंदे, श्री मोहन कुलकर्णी, श्री अजित जाधव, श्री अमर जाधव, श्री राहुल माने, श्री संजय कोळी श्री सनी महाजन श्री धीरज जाधव श्री विशाल गोंधळी श्री संजय माने पाटील श्री विजय माने पाटील श्री मानसिंग भोसले अथर्व देशपांडे ही मंडळी सुद्धा पूर्ण वेळ मंदिराच्या कामात लक्ष घालू लागली.
  त्यानंतर २०१५ मध्ये वनविभाग तर्फे एक बहुउद्देशीय सभागृह  मध्ये बांधण्यात आला. या संपूर्ण   बहुउद्देशीय सभागृह  बाजूने एक मोठी तटबंदी असे संसक्षक भिंत बांधण्यात आले. तसेच संपूर्ण क्षेत्रामध्ये प्लेविन ब्लॉक घालण्यात आले. सन २०१६-१७ मध्ये येणाऱ्या भक्तांसाठी मिनरल वॉटर प्लांट बसवण्यात आला. श्री गणपती पुळेचे धर्ती वर श्री डोंगर प्रदक्षिणा पथ बनवण्यात आला. भौगोलिक दगड माती प्रकार माहीत व्हावेत म्हणून  प्रदर्शनासाठी खालच्या बाजूला एक हॉल बांधण्यात आला. त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये तीन पागोडा बांधण्यात आले. येणाऱ्या पर्याटक व भक्तांसाठी दोन बाथरूम व चार संडास बांधण्यात आले. पार्किंग मध्ये रोडकोंक्रीटी करण केले. टेहाळणी टॉवर बनवण्यात आले.
            आज पर्यंतच्या सर्व वनविभागाचे रेंजर साहेब, फॉरेस्ट ऑफिसर , किंवा जिल्हास्तरीय वन खात्याचा अधिकारी, हे सर्व नवरात्रात उत्सवामध्ये नक्कीच भेट देतात. मंडळाचे कौतुकही करतात. खरे हे आहे की, वनविभाग सूद्धा कायम सहकार्य व नवनवीन उपक्रम राबवत असते. त्यामध्ये प्रामुख्याने श्री अरुण माने, श्री राजज्ञ साहेब, श्री चव्हाण साहेब, श्री पाटील साहेब, श्री शिंदे साहेब, श्री मोहिते साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच अनेक कामे या वनक्षेत्रामध्ये कामे केली.
              वनविभागातर्फे एक अतिशय सुंदर असे सिमेंटचे झाडाचे खोड दिसेल असे प्रवेशद्वार करण्यात आले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये वन विभागाचे सहकार्य हे प्रत्येक वेळेला 'अंबिका नवरात्र मंडळाला' लाभत असते. या बहुउद्देशीय सभागृहाचा उपयोग लहान मोठ्या समारंभासाठी होत गेला. त्यामुळे स्वाभाविकच पुन्हा एकदा सर्व मंडळाने संकल्प केला की या इथे आपण एक मंगल कार्यालय बांधावे. लगेच तयारी ही केली लोकांनी! लोकांसाठी बांधलेले हे मंगल कार्यालय कमी दरांमध्ये सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. याप्रमाणे खालच्या बाजूला १०० बाय ५० असा हा मोठा कल्याण मंडप, लग्न हॉल हा सन२०१६-१७ ला पत्रा शेड बनवण्यात आला.पहीलेंदाच धर्मादाय आयुक्त व मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्मीय सामुहीक विवाहाचे आयोजन करण्यात आले.
कालांतराने हा हॉल कमी पडू लागल्याने  त्याच बाजूला ४५ बाय ७० चा भोजन हॉल सन २०१८-१९ मध्ये बांधण्यात आला त्यासाठी श्री कोळी बंधूंनी एका लाख रू दिले   हे सर्व काम सातारचे श्री माहडिक यांनी काम पूर्ण केले व त्या अनुषंगाने लागणारे बांधकाम  हे वसंत मळगे यांनीपूर्ण केले.त्याच बरोबर मंदिराचे रेलिंग व कार्यालयाचे रेलिंग हे काम श्री आण्णाप्पा गोंघळी यांनी पूर्ण केले.
सन.२०   मध्ये आलेल्या सांगलीच्या महापुरात मंडळातर्फे कपडे अन्नधान्य वैद्यकिय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सन २०१९ २० मध्ये जागावर आलेल्या कोरोणा या संकट  काळात ही सनेटायझर व मास्क चे वाटप करून दोन वर्षे नवरात्र उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून सर्व खर्च समाज उपयोगासाठी केला. नित्य या संकटातून संपूर्ण देश पुन्हा उभा राहुदे म्हणून प्रार्थना करण्यात आली. सन २०२१ -२२मध्ये वसुंधरा वर्ष म्हणून  अनेक वृक्ष आणि शोभेची झाडे आता या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेली आहेत. त्यासाठी श्री सतीश चव्हाण यांनी पुढाकार घेतला.आता कार्यकर्ते सुद्धा नवनवीन निर्माण होत गेले पण आता दुःख एकच वाटत आहे, जे पूर्वीचे कार्यकर्ते होते, ते एकेक करून हळूहळू निखळू लागले ! या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण करत असताना आज या मंदिरासाठी ज्यांनी कार्य केले त्याची उणीव सतत भासत रहाणार! या सर्वांची आठवण नक्कीच होत राहणार! नवीन मुले, कार्यकर्ते घडत आहेत. काहींचे वारस पण आता सेवा करत आहेत पण त्याचबरोबर ज्यांचा आशीर्वाद हवा होता, ज्यानी संकल्पना केली होती, ज्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी स्वतःला झोकून देऊन पायाचे दगड झाले होते, आज ती माणसं नाहीत ! पण त्यांचा आदर्श त्यांचे प्रोत्साहन, त्यांचा आशीर्वाद सदैव सगळ्यांना प्रेरीत करत राहील! त्यांनी घालून दिलेल्या या आदर्श पथावर हे मंडळ नक्कीच अजूनही दैदीप्यमान कार्य यापुढेही करत राहील हे मात्र नक्की…
*माहिती संकलन* श्री. अनिल दाजी देशपांडे 
*शब्दाकांन* सौ. साधना श्रीनिवास हुल्याळकर बारामती.

Comments