भावपूर्ण श्रद्धांजली!




चेअरमन, दि फ्रेंडस् असोसिएशन जत.
(सन-१९७४ ते सन-२०२३)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
🟤 मा.श्री.जी. बी.तथा गुरुमूर्ती बाबूराव ऐनापुरे
एकाष्टीपूर्ती निमित्त
जीवन आणि कार्य : परिचय  मा. श्री. जी. बी. तथा आप्पासाहेब बाबुराव ऐनापुरे
- डॉ.श्रीपाद जोशी,जत यांनी लेख लिहिला होता.
हा लेख पुन्हा देत आहे.मा.श्री.जी.बी.ऐनापुरे साहेबांचे जीवनातील विविध प्रसंगांची आठवण
या क्षणाला होत आहे.
  मा.काकांजी च्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏🟧🟨 S.Art News Jath.... Subhash Shinde
🔵🟤🔴🟣🟡🟤🔵🟤🟣🟣🟡🔵🟤🔴
🟣 प्रास्ताविक :
साधारण दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सांगली येथील आरवाडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकांची सभा आटोपून मी परतत होतो. इतक्यात, 'अहो सर', अशी हाक माझ्या कानावर आली. मी मागे वळून पाहिले तर, श्री. आप्पासाहेब ऐनापुरे सायकलवरुन उतरत होते. एकमेकांचे क्षेमकुशल झाले. मी म्हणालो, 'अहो, रिक्षा नाही का करायची ? अशा उन्हात कशाला सायकलवरुन त्रास घेता?' त्यावर ते हसले आणि म्हणाले, 'अहो, दोन तास मी रिक्षा फिरवत बसलो तर शंभर रुपये जातील. पण भाड्याच्या सायकलवरुन फिरलो तर सहा-सात रुपयेच जातील. 'शिवाय कितीतरी कामे होतील मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो' 'बरे, येतो मी, अजून मार्केट यार्डात जायचे आहे.' असे म्हणून त्यांनी सायकल दामटली. मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच उभा राहिलो. भर दुपारच्या दोन वाजता जत तालुक्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेचे 'चेअरमन' सायकलवरुन फिरत होते. घरात एक कार, दोन मोटार सायकली, दोन स्कूटर्स, एक ट्रक असणारा हा माणूस म्हणजे काटकसर, साधेपणा, धडपड आणि उत्साह याचे मूर्तीमंत उदारहणच म्हणावे लागेल. खरे तर ते रिक्षातून फि शकत होते. पण बालपणापासून पै-पैसाठी झिजलेला हा माणूस पैशाची, वेळेची प्रतिष्ठा ठेवणारा. 'माझे जीवन हाच माझा संदेश 'असे म. गांधी तरुणांना सांगत, तसे श्री. आप्पासाहेब यांचे जीवनहाच त्यांचा तरुणांना संदेशआहे. त्यांचे थोरले बंधू कै. श्री. आण्णासाहेब यांच्या बरोबरीने त्यांनी
कष्ट करुन श्री. ऐनापूरे उद्योग समूहाचे मोठे जाळे विणलेले आहे. पण आज 'साठी' ओलांडलेले श्री. आप्पासाहेब सोळा वर्षाच्या तरुणाच्या उत्साहाने सर्वत्र वावरत असतात. आज अंगाखांद्यावर, कडेवर बसणारी नातवंड आली, तरी श्री. आप्पासाहेब धावत असतात. अथक कष्ट करतात. एकदा जे बालपणी पडिले वळण इंद्रियाते कायमच पडले. ते वयाची 'साठी' ओलांडून गेल्याचेही कोणाच्या लक्षात आले नाही.
🔵 बालपण आणि शिक्षण :
श्री. आप्पासाहेब आणि अण्णासाहेब ऐनापुरे यांचे मूळ घराणे बार्शीचे. त्यांचे वडील श्री. बाबूराव ऐनापुरे हे जीवन व्यवसायासाठी १९२७ साली जतला आले. ते हॉटेलचा व्यवसाय करीत, श्री. आप्पासाहेबांच्या आई कै. श्रीमती गिरेव्वाबाई या श्री. बाबुरावांना व्यवसायात मदत करीत असत. त्यांच्या संसारवेलीवर दि. १४ एप्रिल १९२८ रोजी श्री. अण्णासाहेबांच्या रुपाने प्रथम पुष्प, सोनाक्काच्या रुपाने द्वितीय पुष्प तर दि. १६ ऑगस्ट १९३६ रोजी श्री. आप्पासाहेबांच्या रुपाने तृतीय पुष्प उमलले. पण सुदैवाने श्री. आप्पासाहेबांच्या पित्याचे छत्र चारच महिन्यात हरवले. श्रीमती गिरेव्वाबाईच्या जीवनावर मोठा आघात झाला. पदरी लहान मुले, घरात कर्ता पुरूष नाही. अशा स्थितीत अल्पकाळ त्यांनी घरगुती व्यवसाय केले आणि उदरनिर्वाह चालविला. कष्टाला सीमा नसलेले आयुष्य श्रीमती. गिरेव्वाबाई जगत होत्या. आणि त्यांची तीनही मुले सुखी नसलेने बालपण जगत होती. यातूनच त्यांचे अनौपचारिक शिक्षण खूपच झाले. श्री. अण्णासाहेब सहाव्या इयत्तेपर्यंत शिकले. १९४२ साली त्यांचे शिक्षण थांबले, त्यावेळी श्री. आप्पासाहेब सहा वर्षाचे होते. श्री. अण्णासाहेब मिळवते झाले आणि जत येथील प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये श्री. अप्पासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सुरु झाले. त्यात अनेक अडचणी होत्या. पण कष्टाळू गिरेव्वाबाईंनी त्यावर मात केली. श्री. आप्पासाहेब १९५२ साली सातवी इयत्ता पास झाले, आणि गावातील श्री, रामराव विद्यामंदिरात माध्यमिक शिक्षणासाठी दाखल झाले.
🔵 कष्टमय जीवनाचा ओनामा :
इ.स. १९५३ ते १९५६ या काळात ते श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होते. पण शिक्षण एके शिक्षण अशी त्यांची रोजनिशी नव्हती. त्या काळात ते गावातील स्टेशनरी व्यापारी श्री. गुराप्पा मोदी यांच्या दुकानात कामास जात असत. त्यावेळी त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. जोशी होते. त्यांच्या मदतीमुळे ते शाळेतील विद्यार्थ्यांना स्टेशनरी पुरवित. पुण्यातून पुस्तके खरेदी करुन शाळेत त्याचा विद्यार्थ्यांना पुरवठा करीत असत. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले, कै. श्री. आर. बी. पाटील सर यांनीही त्यांना सल्ला व मार्गदर्शन केले. १९५६ साली ते जुनी इ. ११ पास झाले. या सर्व काळात त्यांनी कष्टमय जीवनाचे नाना धडे गिरवले आणि भावी कष्टमयजीवनाचा आनोमा केला. शालांतपरीक्षा उत्तीर्ण होताच बंधूंच्या सल्ल्याने ते फार्मसी कोर्ससाठी कोल्हापूरात दाखल झाले. तेथे त्यांनी औषधाच्या दुकानासाठी लागणाऱ्या व्यावसायिक कौशल्याचे पाठ घेतले. त्यांच्या एकंदर बालपणावरच दुःखाचा सडा पडलेला दिसतो. पण यातूनच एक जिवट, चिवट, कणखर व्यक्तीमत्व घडले.
🔵व्यवसायात पदार्पण :
कोल्हापूरातील फार्मसीचा कोर्स उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन परतलेल्या आपल्या भावाला श्री. अण्णासाहेब ऐनापुरे यांनी 'जत मेडिकल स्टोअर्स' हे औषधाचे जत तालुक्यातील पहिलेच दुकान काढून दिले. त्या काळात १९५७ साली सुरू झालेले हे औषधांचे जत तालुक्यातील पहिलेच दुकान होते. तोपर्यंत लोक विजापूर, मिरज येथूनच औषधे आणीत असत.. जत तालुक्याला पर्वणी ठरलेले हे औषधांचे दुकान श्री. आप्पासाहेबांनी कष्टपूर्वक, ग्राहकांची मने सांभाळून चोख व्यवहार ठेवून नावारुपाला आणले. याच काळात त्यांचा अनेक फर्मशी संबंध येत गेला. त्यातून त्यांनी अनेक व्यावसायिक कौशल्ये मिळविली. आज 'जत मेडिकल
 स्टोअर्स' हे दुकान चाळीस वर्षांचे झालेले आहे. मधल्या काळात नव्याने काही औषधांची दुकाने सुरू झाली. त्या सर्वांना प्रारंभीचे मार्गदर्शन श्री. आप्पासाहेब यांनीच केलेले आहे. आज तालुक्यात आणि जत शहरात औषधांची अनेक दुकाने निघाली आहेत. पण त्या सर्वांना प्रेमाने वाढविण्याचे मार्गदर्शन श्री. आप्पासाहेब यांनीच केलेले आहे. जत तालुक्यातील सर्व औषध व्यापारी यांना सोयीचे व्हावे म्हणून श्री. आप्पासाहेबांनी औषधांच्या विक्रीचा होलसेल विभाग सुरू केला आहे. सर्व औषध व्यापाऱ्यांशी, जिल्हा संघाशी तालुका संघाशी त्यांचे प्रेमाचे संबंध असून एक व्यावासायिक नीती आणि मूल्ये श्री. आप्पासाहेबांनी जपली आहेत. गेली एक्केचाळीस वर्षे ते या व्यवसायात मोठ्या विश्वासाहतेने उभे आहेत आणि ग्राहकांची मने त्यांनी मोठ्या कौशल्याने सांभाळली आहेत. त्यांचे पुतणे श्री. बाबुराव त्यांच्या समवेत दोन दशके काम करीत आहेत. तर आता पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे चिरंजीव रवींद्र दुकानाचे काम पहात आहे. मधल्या काळात श्री. आप्पासाहेब यांनी मे. शशिकांत आणि कंपनी, जे मे. श्रीशैल ट्रेडिंग कंपनी, श्री. ऐनापुरे ब्रदर्स ट्रान्सपोर्ट, मे. श्री. लक्ष्मी झेरॉक्स सेंटर अशा फर्मस्वा विस्तार करून श्री. ऐनापुरे परिवाराचा उद्योगसमूह मोठा केला आहे. श्री. ऐनापुरे उद्योग समूह आकराला आणण्यात वाढविण्यात श्री. अण्णासाहेब आणि श्री. आप्पासाहेब यांनी अविश्रांत परिश्रम घेतले आहेत. दीर्घ सचोटी, चिकाटी, कसोटी, कष्ट आणि जिद्द यांचे सुंदर फळ म्हणजे श्री. ऐनापूरे उद्योगसमूह होय
🔵कर्तबगारीचा कालखंड :
श्री. आप्पासाहेबांच्या एकसष्ट वर्षांचे अवलोकन केल्यावर प्रामुख्याने चार कालखंड दिसून येतात. (१) इ.स. १९३६ ते ५६प्रारंभकाळ वाण आणि शिक्षण या कालात त्यांनी पुढील जीवनासाठी लागणारी शिदोरी गोळा केली. कष्टपूर्वक शिक्षण घेतले. जीवनव्यवसाय निश्चित केला. (२) इ.स. १९५६ ते ७६ मध्यकाळ हा त्यांचा ऐन उमेदीचा कालखंड आहे.
 याच काळात त्यांचा मित्र परिवार वाढला आणि त्यानी जीवन व्यवसाय करण्याबरोबरच समविचारी मित्रांच्या मदतीने फ्रेंडस् सर्कलची स्थापना केली. सांस्कृतिक क्षेत्रात मनोरंजन आणि समाज प्रबोधन करणे अशी कामे केली. आपले मित्र श्री बन्याबापू जोग, श्री सिध्दाप्पाण्णा बिजरणी, श्री .जी. आर. कुलकर्णी, श्री. येगाप्पाण्णा तंगडी, श्री. एस. सी. मोटगी, श्री. व्यंकण्णासोनार, श्री. जी.डी. मुल्ला, श्री. एस. आर. कुलकर्णी, श्री माळी बंधू (माडग्याळ), श्री. कोळी बंधू (जत), या सर्वांच्या मदतीने सुरु केलेल्या फ्रेंडस् सर्कलचे दि. फ्रेंडस् असोसिएशन या शिक्षण संस्थेत रुपांतर केले. जत येथे पहिली बालवाडी १९६६ साली सुरु काली. तर जत येथे १९६७ साली 'जत हायस्कूल' ही माध्यमिक शाळा सुरु केली. एक वर्षाच्या अंतराने न्यू इंग्लिश स्कूल, माडग्याळ, कुंभारी या शाळाही फ्रेंड्स सर्कलने सुरु केल्या तर गरीब, गरजू विद्यार्थ्यासाठी उदय वसतिगृष्ठ जव छत्रालय माडग्याळ ही दोन वसतीगृहे अनुक्रमे १९६८ व १९६९ साली सुरु केली. १९७७ साली मुचंडी येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. आज दि फ्रेंडस् असोसिएशन या संस्थेच्या एकूण चार माध्यमिक शाळा आणि १९८० साली सुरु केलेली बाल विद्यामंदिर ही प्राथमिक शाळा जत तालुक्यात भरीव शैक्षणिक कार्य करीत आहे. आपल्या सर्व फ्रेंडसी श्री. आपासाहेब हे रेशमी धाग्याने बांधले गेले आहेत. (३) इ.स. १९७६ १९९६ हा श्री आप्पासाहेबांच्या जीवनातील भरभराटीचा दिसा कालखंड आहे. या कालात त्यांनी जुन्या स्थापना केलेल्या संस्था यांना मित्रांच्या मदतीने थरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. सर्व शिक्षण केंद्रांना त्यांच्या त्यांच्या जागा इमारती उभ्या करून देण्याचा त्यानी प्रयत्न केला. संस्थेचे पहिले चेअरमन श्री बन्याबापू जोग हे १९७४ साली निवर्तले स्थानंतर संस्थेचे चेअरमनपद सन्मानाने त्यांच्या मित्रांनी त्यांच्याकडे सोपविले, ते त्यांनी सर्वांच्या सहकार्याने प्रतिष्ठतपणे सांभाळले आहे. आपल्या सर्वसहकान्यांची आणि शाखा प्रमुखांची मने त्यांनी प्रेमाने विणली आहेत. संस्थात्मक कार्यात एकमुखी निर्णय हे तत्त्व त्यांनी ठेवले आणि जपले आहे. आज संस्थेत १४० शिक्षक, शिक्षकेतर सेवक बंधू-भगिनी आहेत. त्या सर्वांची आणि संस्था संचालकांची एक 
 वाक्यता कौशल्याने सांभाळून श्री. आप्पासाहेबांनी चेअरमनपदाची प्रतिष्ठा जपली आहे आणि वाढविली आहे.
याच कालखंडात ते जत अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन, संचालक जत येथे स्थापन झालेल्या साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले. ज्ञान, संस्कार समितीचे संस्थापक झाले. जत मेडिकल असोसिएशन, जत केमिस्ट असोसिएशन, या संस्थांच्या स्थापनेत ते अग्रभागी राहिले आहेत आणि त्या त्या संस्थांचे कार्य चांगले चालण्यासाठी त्यांनी व्यावहारिक व तात्त्विक मार्गदर्शनही केलेले आहे. या संस्थातील खुर्चीवर बसतांना त्यांनी त्या त्या संस्थेची नीती मूल्ये, व्यावहारिक बाजू आणि जनसंपर्क तर सांभाळला आहेच पण खुर्ची सोडून ती फिरती राहील याचीही काळजी त्यांनी घेतली आहे. अगदी मित्रांच्याच आग्रहावरुन ते दि फ्रेंडस् असोसिएशन या संस्थेच्या चेअरमनपदी सलग पंचवीस वर्षे काम करीत आहेत. १९७२ साली जत तालुक्यात दुष्काळ पडला तर त्यावेळी शालांत परीक्षेस बसणाऱ्या आणि भोजनाची गैरसोय असणाऱ्या मुलांना मोफत भोजन देण्याची योजना श्री आप्पासाहेब व त्यांचे फ्रेंडस् सर्कल यांनी केली. यातून त्यांच्या आणि मित्रांच्या सामाजिक बांधिकलकीची कल्पना येते. अशाप्रकारे १९३६ ते १९५६ हा प्रारंभ कालखंड, १९५६ ते १९७६ हा रचना तथा मधला कालखंड आणि १९७६ ते १९९६ हा भरीव कार्याचा कालखंड पडतात. हे सर्व कालखंड दीर्घोद्योग, प्रयत्न, सातत्य, जिद्द, कष्ट यांनी भरलेले दिसून येतात. याच काळात त्यांनी जीवन बीमा निगम तथा विमा व्यवसायातही काही काळ कार्य केले आहे. आता त्यांच्या जीवनाचा चौथा कालखंड सुरु आहे.
🔵 गृहस्थ जीवन:
श्री आप्पासाहेबांचे गृहस्थीजीवन हा एक अभ्यासाचा व आदर्शाचा स्वतंत्र विषय होऊ शकेल. अशी स्थिती आहे. त्यांचा शुभविवाह गावातील श्री. तिप्पण्णा पट्टणशेट्टी यांच्या सुकन्या सुशीला यांच्याशी सन १९५८ मध्ये
 झाला. तसे म्हटले तर त्यांच्या सांसारिक जीवनाला यावर्षी चाळीस वर्षे होत आहेत. त्यांच्या संसारवेलीवर चार टपोरी फुले उमलली. १ चि. शिवपुत्र, २ चि मनोहर ३ चि. रवींद्र आणि चि. विजय, पण ही मुले साधारण नव्हती. यापैकी दोन मुले बधीरता घेऊन जन्माला आली चि. मनोहर व चि. रविंद्र हेच दोष नसलेले आहेत. भरल्या सुखी संसारात आता मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला. जत हे त्याकाळी सर्व सुविधांनी युक्त शहर नव्हते. जतमध्ये सर्व साधारण शिक्षण देणाऱ्या शाळाच होत्या. म्हणून श्री आण्णासाहेब यांनी या मुलांच्या शिक्षणाची सोय मिरज येथील मूक-बधीर विद्यालयात करण्याचा निर्णय घेतला. १९७२ ते १९८४ एवढा काळ आपल्या सौभाग्यवती सुशीला आणि चार मुले यांचा संसार श्री. आप्पासाहेबांनी सांगलीत विलिंग्डन कॉलेजजवळ जागा घेऊन थाटला. त्या बारा वर्षात ही चारही मुले आवश्यक प्राथमिक शिक्षण घेऊ शकली. तरीपण चि. रविंद्र सोडून इतर दोन मुलांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न होता. श्री. आप्पासाहेब जीवन व्यवसाय जत येथे 'जत मेडिकल स्टोअर्स चालवून करत होते. तर संसार सांगलीत सुरु होता. ही बारा वर्षे श्री आप्पासाहेब आणि सौ. सुशीलावहिनी यांनी मोठ्या धैर्याने काढली. साधारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न कोणत्या तरी प्रयत्नाने सुटू शकतो, पण या मुलांचे वय वाढेल तसे त्यांच्या पुढील व्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनू लागले. पण श्री. आण्णासाहेब आणि श्री. आण्णासाहेब यांनी मोठ्या समंजसपणे, धैर्याने आणि धोरणाने त्यांच्या भविष्याची आखणी केली. श्री शिवपुत्र यांनी श्री लक्ष्मी झेरॉक्स सेंटर हे दुकान त्यांनी १९८७ साली सुरु करुन दिले. ते तहसिलदार कार्यालय आवारात ठेवले. तर त्याची दुसरी शाखा व बरोबर फोटोग्राफी हे दुकान गावात श्री. विजय यांना सुरु करुन दिले. सर्व पुतण्यांनी श्री. मनोहरांना अडत व शेती पूरक साधनांच्या दुकानाचे ट्रेनिंग देऊन सामावून घेतले. तर श्री रविंद्र यांना मेडिकल्स कामाचा अनुभव देण्यास सुरुवात केली. ही सर्वमुले मूक बधीरता सोडली तर साधारण माणसाप्रमाणेच आपला व्यवहार करतात. सर्व वाहने ही मुले चालवितात. श्री. शिवपुत्र तर झेरॉक्स मशीन आता दुरुस्त करतात, त्यांची ही कर्तबगारी फळाला येण्याचे कारण म्हणजे श्रीआप्पासाहेब यांनी आपल्या मुलांच्या 
 भविष्याची त्यांच्या बालपणीच उत्तम आखणी केली होती. मिरज येथे या मुलांना जीवनाला उपयोगी पडेल असेच शिक्षण मिळाले. आणि श्री. आप्पासाहेबांनीही मुलांवर विश्वास टाकला. आत्ता ही सर्व मुले मिळवती तर आहेतच तर गावातील स्वावलंबी, कर्तबगार मुले म्हणून ओळखली जातात. यापैकी श्री. शिवपुत्र यांचा विवाह चि. सौ. सुनंदा यांच्याशी, चि. मनोहर यांचा विवाह चि. सौ वैशाली तर श्री रविंद्र यांचा विवाह सौ. ज्योती यांच्याशी करुन दिलेला आहे. विशेष म्हणजे श्री. शिवपुत्र यांचे सुपुत्र सूरज व कन्या पौर्णिमा बोलके आहेत. रविंद्र यांची मुले किरण व तेजस ही बोलकी आहेत. आणि पुढील पिढ्यात मूक बधिरतेचा दोष राहिलेला नाही. आपले आणि आपल्या मुलांचे गृहस्थीजीवन असे सुंदर करण्याची किमया करुन दाखवून श्री. आप्पासाहेब आणि सौ. सुशिलावहिनी यांनी गृहस्थी जीवनाचा एक आदर्शच गावात निर्माण केली आहे. यात शंका नाही. कर्तबगार व मोठ्या पुरुषांची सर्व लक्षणे श्री. आप्पासाहेबांच्या ठायी आहेत पण त्यांचा उच्चार त्यांनी कोणत्याही व्यासपीठावरुन किंवा साध्या बोलण्यात कधी चुकूनही केलेला नाही. सामान्यांचे असामान्यत्व म्हणतात ते हेच होय.
🔵 सामाजिक कार्याचा आदर्श :
श्री आप्पासाहेब हे एक दीर्घोद्योगी गृहस्थ आहेत. आपण भले आणि आपले औषधांचे दुकान भले असे झाले असते तर ते एक व्यापारी एवढेच राहिले असते. पण त्यांच्यातील धडपडी, क्रियाशील सामाजिक माणूस त्यांना स्वस्थ बसू देत नाही. जत येथील मेडिकल असोसिएशन, शिवानुभव संस्था, व्यापारी संघटना, जत अर्बन बँक यांच्या व्यवहारात, स्थापनेत, कामात आणि त्या संस्था उत्तम चालाव्यात यासाठी त्यांनी इतरांबरोबर कष्ट घेतले आहेत. घरचे अनंत प्रश्न, मुलांचे अनेक प्रश्न, दोन ठिकाणी संसार त्यात शिक्षण संस्थेचा कार्यभार हे सर्व पेलून नेणारे त्यांचे मन खंबीर व सामाजिक बांधिलकी मानणारे किती उंच असावे, ते कळते. 'इंद न मम् 'ही दृष्टी, प्रसिद्धिची हौस नाही, आणि कार्यकर्ता ही त्यांची भूमिका असल्याने
आपल्या देणगीतून सुरु केला आहे. आत्तापर्यंत चार जोडप्यांचा या व्यासपीठावर गौरव झालेला आहे. गदिमा स्मृति व्याख्यानमालेचे ते गेली अठरा वर्षे अध्यक्ष आहेत. ज्ञानसत्रात त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे पन्नास विचारवंत आणून त्यांचा लाभ जतकरांना दिलेला आहे. या साऱ्या धडपडीतून एक तळमळीचा, त्यागी विचारी माणूस आपणांस श्री. आप्पासाहेबांच्यामध्ये असल्याने दिसून येते. नित्याच्या परिचयांमुळे आणि प्रसिद्धी पराङमुख स्वभावामुळे ते मनाने आणि कार्याने किती मोठे आहेत ते आपणांस जाणवत नाही. पण विचार केल्यावर कळते. श्री आप्पासाहेब हे जतमधील ‘सार्वजनिक काका' आहेत. तरुण मुले नव्या संस्था, मंडळे काढताना सल्ल्यासाठी त्यांच्याकडेच जातात.
🔵 जगमित्र श्री आप्पासाहेब
श्री आप्पासाहेब मित्रांचा घोळका करुन गप्पा मारत बसलेत. विनोद सुरु आहे. सहली सुरु आहेत असे दृश्य मात्र कोणालाच दिसलेले नाही. पण त्यांच्या जिवलग मित्रांची संख्या अगणित आहे. सांगून सवरुन ते मित्राचे काम करतील, पण श्रेय घेणार नाहीत. 'अहो सर, मी सांगलीला निघालो आहे. काही काम आहे काय ?' असे फोन आम्हाला अनेक वेळा ते सांगलीला निघाले की येतात. आपली मित्रांची, संस्थांची, सामाजिक सारी कामे करुन रात्री शेवटच्या गाडीने श्री आप्पासाहेब येणार, सकाळी सर्वांचे साहित्य, निरोप, वस्तू पोहोच करणार हे आज अखेर सुरुच आहे. त्यांचे खास जिवलग मित्र म्हणजे कै. डॉ. शीतलप्रसाद तथा एस्. डी. पाटील त्यांचे बँक व्यवहार, विमा व्यवहार, सांगलीतील व्यवहार श्री. आप्पासाहेब सांभाळणार. त्यांचे त्यांच्याशी इतके एकरुपत्व होते की, 'एक दिल के दो अरमान ' अशी मैत्री दुर्मिळ. त्यांच्या खास मित्रपरिवारात श्री. येगाप्पाण्णा तंगडी, श्री. आप्पासाहेब अंगडी. श्री. जी. आर. कुलकर्णी. श्री. राम पवार. श्री. हरी पाठक, श्री पीरसाो इनामदार, श्री सूर्यकांत अरळी. डॉ. एस् के. कलकडकर, डॉ. एस्. एस्. दोडवाड, जरश्रीसिद्धाप्पण्णा बिजंरगी, श्री. आण्णाय्या स्वामी, श्री. मोटगीअण्णा, श्री. जी. डी. भाई त्यांचे प्रथम
शिक्षक, मग नंतर मित्र श्री. किशोर कुळकर्णी, दिवंगत डॉ. बोर्गीकर शहासाहेब व आप्पासो हुजरे असे असंख्य नावे आहेत. ती इथे टिपणेही कठीण आहे. या सर्वांच्या घरापर्यंत, घरातील प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्योचे व घरचेच संबंध आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, मुंबई, जमखंडी, अथणी, इचलकरंजी आणि असंख्य गावात, महाराष्ट्रभर त्यांचा मित्रपरिवार विखुरलेला आहे. मागच्या पिढीत, बरोबरच्या पिढीत आणि तरुण पिढीत त्यांचे इतके मित्र आहेत की त्यांना जगमित्र म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि ही मित्रता निर्हेतूक, निर्मळ आणि निर्व्याज आहे.
🔵 निसर्गाचे स्वरूप:
श्री आप्पासाहेबांच्या स्वभावाचे जे असंख्य पैलू आहेत त्यात मैत्रीला पक्के, उत्तम स्मरणशक्ती, काटकसरी वृत्ती, कामाची अनेक पदरी पद्धती, दीर्घोद्योग, धडपडी स्वभाव, संयम, वडिलधाऱ्यांचा आदर, निवैरवृत्ती, समंजसवृत्ती, बंधूप्रेमाचा आदर्श असे अनेक स्वभाव धर्म सांगता येतील. त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरु होतो. आणि रात्री एक वाजेपर्यंत कामाचे विद्यापीठ सुरु असते. ते झोपतात केंव्हा आणि उठतात केंव्हा हे अनेकांना कोडे आहे. इतका उद्योगी असणारा हा माणूस आता थकला असे जाणवत नाही, त्यांच्या त्या शरीरात उत्साहाचे असे कोणते रसायन आहे हेच मोठे कोडे आहे. साधारणपणे ते सर्वांकडेच कुंटुंबवत्सल भावाने पाहतात. 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत, 'हीच त्यांची वृत्ती आहे.
आयुष्याची संध्याकाळ
आता श्री. आप्पासाहेब आयुष्याची एकसष्ट वर्षे पूर्ण करीत आहेत. अलंकारिक भाषेत ते वृत्तीने तरुणच आहेत. असे जरी म्हटले तरी वास्तव नाकारता येत नाही. 'तरुण असा, तरुण दिसा' हे एखाद्या तरुणाला म्हणता येईल, पण तरुण नसताना सारे आविष्कार तरुणांचे करणारे
श्री. आप्पासाहेब हे चिरतरुण आहेत हे खरे. पण आता त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ सुरु झालेली आहे. ही संध्याकाळ सुखासुखी रम्य झालेली नाही. त्यासाठी त्यांचा देह गेली एकसष्ट वर्षे अहोरात्र खपला आहे. मुले, सुना आनंदात संसार करीत आहेत. पुतण्यांची कर्तबगारी सुरु आहे. नातवंडे मांडीवर खेळत आहेत. जीवनातील कष्टाचे, कसोटी पाहणारे दिवस मागे पडलेत. एक कृतार्थ जीवन सुरु आहे. खरे तर ही कृतार्थ संध्याकाळ सुरु आहे.
२८ मे १९९६ रोजी म्हणजे दोन वर्षापूर्वी ऐनापुरे परिवार उद्योगाचे एक शिल्पकार आणि श्री. आप्पासाहेब यांचे थोरले बंधू अण्णासो निवर्तले. वडिलांचे छत्र बालपणीच हरपले होते. पण दीर्घकाळ आशीर्वाद देत राहिलेल्या श्रीमती गिरेव्वाबाई माता या १७ डिसेंबर १९९२ ला काळाच्या पडद्याआड गेल्या. गेल्यावर्षी जिवलग मित्र डॉ. एस्. डी. पाटील गेले. हे सारे धक्के त्यांनी संयमाने झेललेत. सर्वांना त्यांनी धीर दिलेला आहे. आज ऐनापुरे परिवाराचा ते एक बळकट, खंबीर, अनुभवी आधार आहेत. आणि गावातील अनेक संस्थांचे आश्रय स्थान आहेत. अशा प्रसंगी नव्या पिढीला अनुभवाचे दोन शब्द सांगण्याची त्यांची योग्यता मोठी आहे. रुढार्थाने जरी त्यांचे शिक्षण फारसे झालेले नसले तरी ते जीवन विद्यापीठाचे निरंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. आपले पुतणे, मुले आधुनिकतेचा स्वीकार करावीत यासाठी ते स्वागतशील दृष्टी ठेवून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या जीवनाची संध्याकाळ रम्य आहे. आणि रम्य असो ! त्यांच्या एकंदर आरोग्याकडे आणि शरीराकडे पाहिले तर आयुष्याचे शतक ते नक्की साजरे करणार यात शंका नाही. यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा ! जीवेत् शरद: शतम् !
🟣🔴🟤🟡🟣🔴🟤🟡🟣🔴🟡🟡🟣🔴


Comments