इलेक्शन ड्युटी: एक अनुभव
*"इलेक्शन ड्युटी : एक अनुभवशाळा"*
" काय म्हंते ग्रामपंच्यायत इलेक्शन गुर्जी ? कुठी लागली होती डीवटी ? " इलेक्शन ड्युटी कॅन्सल करण्यात यशस्वी झालेला एखादा मित्र अशा पद्धतीनं तुमच्याशी जेव्हा संवाद साधतो, तेव्हा तुमच्या चौकशीपेक्षा , 'मी कसं जमवून घेतलं...... ' हे लक्षात आणून देणं हा त्याचा मुख्य हेतू असतो .
नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांचा धुरळा उडाला. सरपंचपदाच्या निवडणुकीपर्यंत तो खाली बसणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष, श्रेय, आशा -निराशा,वाद - संवाद इत्यादी अनेक गोष्टी आजूबाजूला अनुभवायला भेटल्या. निवडणुकीशी प्रत्यक्ष संपर्क असलेले उमेदवार-कार्यकर्ते आपल्या नियोजनावर आणि मिळालेल्या यशापयशावर चर्चा करताहेत . या सर्व गर्दीत एक समूह मात्र कायमच अनुल्लेखित राहतो, तो म्हणजे निवडणूक प्रक्रीया पार पाडणारा, हजारोंच्या संख्येने या जबाबदारीला लिलया पेलणारा मतदान अधिकारी आणि कर्मचारी वर्ग.
विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सार्वत्रिक मतदान प्रक्रियेच्या परिणामकारक संचालनासाठी आयोगाकडून नियुक्त केले जाते . हेच अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी या सारख्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यांना हे निवडणूक कामाचे आदेश मिळाल्यापासून तर मतदानाचे साहित्य जमा करून घरी पोहोचेपर्यंत काय खस्ता खाव्या लागतात, याबाबतीतले सर्वांचे अनुभव थोड्या फार फरकाने सारखेच .
सरकारी नोकरदारांना निवडणूक कार्य अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे इथे चॉईस नाही, हे सर्वांना करावंच लागते .
"सरकारी नोकरीसारखा आनंद जगात कुठेही नाही,फक्त इलेक्शन ड्युटी नको." परंतु हे शक्य नाही . तरीही आमच्या बांधवानी तलवार म्यान केलेली नसते . तिकडे निवडणूक आयोग निवडणुकीच्या नियोजनात गुंग असतो तर इकडे आमचे काही बांधव या सो -कॉल्ड डोकेदुखीतून सहीसलामत बाहेर राहण्यासाठी आपल्या तलवारीला धार लावत असतात . मग अगदी आयोगाने आस्थापनेकडून मागवलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आपले नाव जाणारच नाही, इथून तर संबंधित निवडणूक विभागाच्या आस्थापना लिपीकाशी कोणाच्या तरी वशिल्याने अर्थपूर्ण संवाद साधून हा प्रश्न तात्पुरता मिटवून टाकतात . पण यामध्ये सर्वांनाच यश येते असं नाही . काहीजणांना या पायरीवर अपयश आले तरी ते धीर सोडत नाहीत . पुढच्या टप्प्यावर ते यापेक्षा परिणामकारक गॅप शोधून फटका मारण्याची पोजीशन घेत असतात . मग एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीमार्फत साहेबांसोबत संवाद साधला जातो , गंभीर आजाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी आयुधांचा वापर केला जातो. ज्यांना यापैकी काहीच जमत नाही ,ते आमच्यासारखे निमूटपणे आयोगाचा आदेश शिरसावंद्य मानून अगदी पहिल्या प्रशिक्षण वर्गापासून पहिल्याच रांगेत हजर .
ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाकडून संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांना सर्वेसर्वा करून टाकण्यात आलेले असते . त्यामुळे शंका विचारणे, निकषांची माहिती करून घेणे इत्यादी गोष्टी फारशा शक्य होत नाहीत. सरकारी - निमसरकारी, सेवाजेष्ठता, वेतन, सूट, महिला-पुरुष इत्यादी निकष इकडे पोकळ ठरतात . येथे असं काहीच नसते . जो सापडला, तो घेरला अन जो सुटला त्याचं नशीब .या साध्या तत्वावर हे सगळं चालत असतं. नाही म्हणायला काही निवडणूक निर्णय अधिकारी नवनवीन प्रयोगही करून पाहतात . जसे यावर्षी एका तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुक चमु निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं, त्यामुळे आपले परिचित लोक घेता आले . समन्वयासाठी याचा फायदा झाला , तर एका तालुक्यात बऱ्याच महिला शिक्षिकांनाही या कामी नेमण्यात आले, त्यामुळे लिंगसमभावाचे तत्व जोपासण्यात आले . इतरत्र बहुतेकांना निमूटपणे सर्व सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. तसेही निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या लक्षणीय असते, बीएलओ तर शिक्षकच.
खरी गंमत सुरू होते निवडणुकीच्या अगदी पहिल्या प्रशिक्षण वर्गापासून .ह्या निवडणुकांची उतरंड लोकसभा-विधानसभा - जिल्हा परिषद /पंचायत समिती - नगरपालिका - ग्रामपंचायत अशा क्रमाने काठीण्यपातळी वाढविणारी असते . ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे गेलेला अधिकारी किंवा कर्मचारी त्याच्या आयुष्यातील कोणत्याही बिकट प्रश्नाला सहज तोंड देऊ शकतो . इतकी ही ग्रामपंचायत निवडणूक जीवनाचे सार शिकवणारी ठरते . काटकसर,तडजोड, संयम, समयसूचकता, नशीब, सहनशीलता, समन्वय इत्यादी मूल्ये शिकविणारी जणू पाठशाळाच .
मतदान केंद्राध्यक्ष व आवश्यकतेनुसार तीन ते चार इतर अधिकारी अशा कधीही एकमेकांना न भेटलेल्या चार ते पाच वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेल्या लोकांना दोन प्रशिक्षण वर्ग आणि सलग छत्तीस तास सक्तीचा सत्संग देण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो . या दोन दिवसांत निर्माण झालेले ऋणानुबंध अनेक दिवस स्मरणात राहतात .आत्ता ईव्हीएम मुळे ही संख्या आणि वेळ मर्यादित करण्यात आलेली आहे . पूर्वी मतदानाच्या दोन दिवस अगोदर किमान पाच ते सहा लोकांसोबत तीन दिवसांचा हा सक्तीचा सत्संग आयोगाकडून घडविण्यात येत होता .यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत कायदा व सुव्यवस्थेचे जबाबदारी सांभाळणारा एक पोलीस विभागाचा कर्मचारीही या समूहाचा एक अविभाज्य घटक असतो .यातील मतदान केंद्राध्यक्ष म्हणजे लग्नघरचा मुलीचा बाप असतो . त्याला सगळ्यांना झेलावे लागते, कारण मतदान प्रक्रियेदरम्यान तेथील प्रत्येक घडामोडीची सर्वस्वी जबाबदारी याचीच.पूर्ण टीममध्ये असलेले सर्व सहकारी सांघिककार्याची जबाबदारी पार पाडणारे मिळाले तर हा मतदान केंद्राध्यक्ष अगदी अंतर्बाह्य हुरळून जातो, मुलीला सासरकडील चांगले लोक मिळालेल्या वधू पित्यासारखाच.
समजा तुम्ही घटक असलेल्या पूर्ण मतदान चमूमध्ये ( पोलिसासह ) एकही माणूस तंबाखू - गुटखा खात नाही, बिडी - सिगारेट ओढत नाही, दारूचे तर नाव काढत नाही, औषध - गोळ्या आणि चष्मा घरी विसरत नाही अन............ रात्री झोपेत अजिबात घोरत नाही . अशी परिस्थिती असेल तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाला म्हणून समजा . स्वर्गसुख म्हणतात की काय ते यापेक्षा वेगळं काहीच असू शकत नाही .
मतदान चमुमध्ये जी अनुभवी मंडळी असते, ती आपल्या अनुभवाची प्रचिती इतरांना अगदी पहिल्या क्षणापासून देणे सुरू करते . म्हणजे निवडणूक साहित्य घेण्यासाठी पुकारा होत असताना दूर उभे राहून मतदान केंद्राध्यक्ष आणि इतरांची मजा पाहणे, शक्यतोवर स्वतःहून कुठलंही काम न करता सांगितल्यानंतरच त्या कामाला हात लावणे ,असे ते अनुभवाचे बोल असतात . प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचल्यावर तिथे असलेल्या स्थानिक लोकांमध्ये तलाठी,कोतवाल, ग्रा.पं. शिपाई यांचा समावेश असतो . दोन वेळ जेवण, नाश्ता, चहापाणी आणि आवश्यकतेनुसार इतर व्यवस्था करून देण्याबाबत ते आश्वस्त करतात आणि त्या सर्व बाबींच्या दर्जाबाबत एवढे वर्णन करतात की, क्षणभर सर्व सोडून इकडेच रहायला यावं की काय ? असा विचार मनाला स्पर्शून जातो .
मतदानाच्या अगोदरच्या रात्रीचं जेवण आणि मतदानाच्या दिवशीचं चहापाणी, नाश्ता ,जेवण आणि आंघोळीला गरम पाणी यासाठी ते ठराविक रक्कम बहुतेक अगोदरच घेऊन टाकतात ,फारशी रिस्क घेण्याच्या फंदात पडत नाहीत . ह्या सगळ्या सुविधा चांगल्या मिळाल्या तर ते तुमचं नशीब . बहुतेकदा या दोन जेवणांचा लाभ घेतल्यावर तुम्ही घरच्या जेवणाला आयुष्यात कधी नाव ठेवणार नाही.
केंद्रावर शांतता व सुव्यवस्थेसाठी मतदान चमुला लाभलेला पोलीस कर्मचारी चांगला मिळणे ही परमभाग्याची गोष्ट . काही सन्माननीय अपवाद वगळता इतर वेळेस मतदान चमुमध्ये फारसा न मिसळणारा ,सामान गोळा करायला गेल्यानंतर काहीतरी कारण सांगून मतदान केंद्राध्यक्षाची सही घेऊन रवानगी टाकण्यात पटाईत असतो . ही सगळी मंडळी तुमचे अनुभव-विश्व समृद्ध करत असतात .
यामध्ये जर का थोडीशी कसर राहिलीच तर निवडणुकीसाठी उमेदवारांनी नेमलेले मतदान प्रतिनिधी तुमचं राहिलेलं अनुभवविश्व दमदारपणे समृद्ध करून टाकतात . "साहेब ,आपल्या गावात अजिबात टेन्शन घ्याचं काम नाई . तुमी कायचीच फिकर करू नोका . " असं सांगून आपला विश्वास जिंकून घेण्यात ते उणीव ठेवत नाहीत परंतु त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त विसंबून राहीलं तर मतदान चमूला हा एजंट समूह हात दाखवल्याशिवाय राहत नाही .म्हणजे एखाद्या मतदारासोबत ओळखीचा पुरावा नसेल तर एकमेकांच्या विरोधी उमेदवारांचे एजंट एकत्र येऊन आपल्याला सांगतात की, " जाऊ द्या ना सायेब . आमी सबन वयखतो, आमच्याच गावातला हाये तो.... कानी रे ब्वॉ वसंता ? " पण तुम्ही जर का त्यांच्या गोड बोलण्यात अडकले तर नंतर हीच एजंट मंडळी तुम्हाला खिंडीत गाठल्याशिवाय राहत नाहीत .
" मंगा त्याले कसं जाऊ देलं ?" असा जाब विचारून ते तुमची आयुधं निष्प्रभ करून टाकण्यास मागेपुढे पाहात नाहीत .
थोडक्यात, मतदान केंद्रात बसलेली ही सर्व एजंट मंडळी म्हणजे मतदान चमुवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे असतात . तुम्हाला सदैव सतर्क ठेवण्यासाठी ते प्रेरणा देत असतात .
" साहेब, जाता जाता काई सोयसाय करून द्या लागीन काय ?" असं विचारत ते दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करतात .संधी मिळाली तर मतदारांना डोळ्यांनी प्रभावित करून एखाद्या संशयित मतदाराच्या हालचालीवरून अंदाज घेण्यातही पटाईत असतात .
लोकसभा आणि विधानसभेच्या मोठमोठ्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष उमेदवार मतदान केंद्रावर येण्याची शक्यता फार कमी असते पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदार चमूमध्ये सहभागी असाल तर ठराविक वेळेनंतर उमेदवार मतदान केंद्रात येऊन, " काय साहेब, बरोबर चालू हाये ना ! अरे बबन्या, सायबाले च्या - पान्याचं पाहा लागत होतं... " असं म्हणून निघून जातात . बबन्या मात्र वर पहायलाही रिकामा नसतो .
पाचपन्नास मतदारांमध्ये एखादा मतदार तुमच्या सहनशीलतेची कसोटी घेणारा नक्कीच राहतो . नाव सांगा असं विचारल्यानंतर, " काऊन ....... तेच्यात नाई का ? " अन ओळखीचा पुरावा मागीतला तर, " कारे ओ, तुमी मले वयखत ना का ? " असं त्या मतदान प्रतिनिधींना दरडावून विचारतात . हे सोपस्कार पार पाडल्यानंतर दोन नंबरचा अधिकारी "सही येते का ? " असं विचारून पेन देण्याच्या तयारीत असतो तर, " मंजे .....?मी काय अळानी दिसतो काय...... " असं म्हणतो . त्याच अधिकारी क्रमांक दोनने एखाद्याला विश्वासानं , " सही करा...... " असं म्हटलं तर, " नशीन कऱ्याची मले तं ? " असं उत्तर देऊन त्या अधिकाऱ्याची कशी जिरवली या अविर्भावात अंगठा दाखवतो .
काही मतदार मतदान कक्षातही तुमच्या सहनशीलतेची कसोटी पाहतात . काहीजण तिथे गेल्यावर निवांत उभं राहून सगळी मशीन व्यवस्थित पाहून घेतात, जणू गाभाऱ्यात जाऊन त्या सर्वसाक्षी ईश्वराला पाहण्याचा अनुभव घ्यावा तसं . नंतर केंद्रात उपस्थित सगळ्यांवर एक कटाक्ष टाकून शांततेत मतदान करतात . एखादा मतदान कक्षात जाऊन तसाच थांबतो . बराच वेळ वाट पाहून आपण काही सांगण्यासाठी सुरुवात करावी तोच, " मले सबन माईत हाये, पन इच्यार करू देसान की नाई जरासाक ? " असं म्हणून फिरकी घेतो .
मधातच एखादी मायमाऊली ओरडतच केंद्रात प्रवेश करते ."मतं मांग्याले भले सती पळता रे....... अन संडासं बांधून द्या म्हनो तं यक नाई आलं . यकटीच रायतो मी....... पैशे असते तं म्याच घेतला असता ना बांधून..... " असं म्हणत मतदान करुन बडबड करत निघून जाते .
दुपारनंतर डोलत मतदानाला येणाऱ्या सुधाकरांची फ्रिक्वेन्सी वाढते . " अय गोल्या..... मा नाव सांग रे या सायबाले का हायतं ? " असं एखाद्या एजंटला सांगून हा सुधाकर झलक दाखवून देतो . क्रमांक एकचा मतदान अधिकारी ओळखपत्र पाहून यादीत खूण करतो व अधिकारी क्रमांक दोन निमूटपणे त्याच्या बोटावर शाई लावतो . शाई लावताच ती शाई पुसत, " मी का बोगस वाटलो का तुमाले ? का डबल इन मतदान कऱ्याले ? मा आंगावर गुथा येतात . यालर्जी हाये मले शाईची ........ " असं म्हणून आवाज चढवतो, तुम्हाला प्रचंड संयमाचा परिचय द्यावा लागतो. तोपर्यंत अधिकारी क्रमांक तीन त्याला कक्षात पाठवतो . याला कक्षातही शांत रहाव वाटत नाही . " प्यानल तं भाऊचंच येनार हाये ना हो........ गुलाल तं आपलाच ." असं जोरात म्हणतो . त्याला शांततेत जायला सांगाव तर, " शिट्टी आयकू नाई आली मले आजून..... " असं म्हणत डोक्यातल्या शिट्टीच्या आवाजाचीच झलक दाखवतो. हसतहसत मतदान केंद्राध्यक्ष त्याला निरोप देतो . डोक्यावर बर्फ अन तोंडात साखर याचा वापर इथेच करावा लागतो . मनातल्या मनात मात्र, " आज येच्यात गुतेल हावो म्हनून सांग..... तू फक्त मले भाईर भेट्याले पायजे . " असं काहीसं गुणगुणत असतो . अशा अनेक प्रकारच्या सुधाकरांशी या मतदान यज्ञात तुमचा पाला पडतो .हे सगळं सहन करत मतदानाची वेळ संपत येते .
मतदान संपल्याची घंटा वाजल्याबरोबर मतदान केंद्राध्यक्ष आणि सोबतच्या अधिकाऱ्यांना होणारा आनंद शब्दांच्या पलिकडचा असतो . फक्त तो त्याच वेळेला साजरा करता येत नाही . कारण मतदान केंद्रातील बरचसं काम अजून बाकी असतं आणि एजंट तुमच्या सोबत असतातच . आयोगाच्या निर्देशांप्रमाणे सगळ्या सामानाची बांधाबांध ,मशीन आणि पाकिटांचं सिलिंग करून बसमध्ये जाऊन बसताना आपलं वजन किमान पाच -एक किलोंनी कमी झाल्याचा भास प्रत्येकाला होत असतो .
यातील शेवटची लढाई बाकी असते ,ती म्हणजे मतदान साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी. तुम्ही अनुभवी असाल तर सांघिक जबाबदारीने हे काम लवकर पूर्ण करून घेता येते .परंतु यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी मोकळ्या जागेत तुम्हाला दुकान मांडून नव्यानं फॉर्म भरणे, मेणबत्ती-लाख यांच्या मदतीने पाकिटं सीलबंद करणे हा कार्यक्रम केल्याशिवाय पर्याय नसतो . हे सुरु असताना सगळे लोक भराभर साहित्य जमा करून परत जातात अन तुमच्याकडे कुत्सित भावानं पाहात असतात . चुकून नजरानजर झालीच तर, " अगोदरच जमीन का फाटली नाही ? " असा मनात प्रश्न येऊन जातो . परत जाणाऱ्या लोकांच्या नजरा बाणांपेक्षा कमी नसतात .
साहित्य परत घेण्यासाठी बसलेली कार्यालयातील मंडळी तुमच्याकडून ते घेताना व पोच देताना इतकं काही बोलून आणि राबवून घेतात की, या जन्मात यांच्यासारखे उपकार आपल्यावर कोणाचेच होणार नसतील असा भास होतो . क्वचितप्रसंगी आपल्याला न दिलेली एखादी वस्तू कुठे आहे ? असं विचारत तुमच्या सहनशीलतेला ते तपासून पाहतात .
यांच्यावरही एक आपला झोनल नामक बॉस असतो. प्रत्येक घडामोडीचं रिपोर्टींग करूनही शेवटी यांच्या सहीने निरोप घेतल्याशिवाय तुमची सुटका नाहीच .
एवढं सगळं झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि त्याची चमु आपल्या दोन दिवसाच्या आपसातील खर्चाच्या हिशोबात गुंग होवून पैशांची देवाण-घेवाण करते . ग्रामपंचायत निवडणूकीत कामाचा मोबदला मिळत असतो ( ?) हे त्यांच्या ध्यानातही राहत नाही . हे करून झालं की,एकमेकांचा निरोप घेताना या निवडणुकीतल्या अनुभवांची शिदोरी घेऊन, खांद्यावर भलीमोठी बॅग लटकवून घराच्या दिशेनं रवाना होतात...... पुढच्या निवडणुकीसाठी नव्याने अनुभवाच्या शाळेत ..
Comments
Post a Comment